ग्रामीण भागाचा `आयडॉल’ मच्छिंद्र

Small idea BIG MONEY's photo.


केवळ चौथी पास असलेल्या मच्छिंद्र नारायणराव कांडनगिरे या तरुणाने ग्रामीण शेती तंत्रज्ञानात घेतलेली झेप थक्क करणारी आहे. गेल्या पंधरा वर्षात सुमारे 750 लोखंडी बैलगाडय़ा बनवून त्याने एक विक्रमच प्रस्थापित केला आहे. त्याची ही यशोगाथा कोणाही बेरोजगारांनी प्रेरणा घ्यावी अशीच आहे.
अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद जवळच धाकटीवाडी हे मच्छिंद्र कांडनगिरेचे गाव. वडील नारायणरावांना थोडीशी कोरडवाहू शेती. त्यामुळे त्यांना मजुरीवर जावे लागे. कुटुंबाची परिस्थिती यथातथाच. त्यांना गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ व जालींदरनाथ ही तीन मुले. मोठा मुलगा गोरखनाथने दहावीनंतर आयटीआयचा फिटरचा कोर्स करून शिरुर ताजबंदला नाथ स्टिल इंडस्ट्रिजची सुरुवात केली. त्यावेळी मधला मच्छिंद्र शाळेत जात होता. त्याला शाळेची आवड होती,मात्र परिस्थितीमुळे गुरंही राखावी लागायची. यामध्ये त्याची ओढाताण सुरु झाली. चवथीची परिक्षा दिल्यानंतर त्याने शाळेला रामराम ठोकला. पूर्ण वेळ तो गुरं राखू लागला. त्याबद्दल त्याला कोणी रागावण्याऐवजी त्याचं कौतुकचं झालं. चार-पाच वर्षे गुरं राखण्याचे हे काम त्याने उत्तम पद्धतीने केले.
दरम्यान, गोरखचा धंद्यात बर्यापैकी जम बसला होता. त्याने सुरू केलेलं लोखंडी बैलगाडय़ाचं उत्पादन लोकप्रिय होत होते. त्याला हाताखाली माणसाची गरज भासत होती. मजुरीवरची माणसं गैरहजर राहिली की, कामाचा खोळंबा व्हायचा. त्यामुळे त्याने मच्छिंद्रला कामासाठी बोलावून घेतले. पुस्तकी ज्ञानात फारशी गती नसलेल्या मच्छिंद्रला तांत्रिक कामात खूपच गती होती. भावाने तयार केलेल्या लोखंडी वस्तूंना रंग देत देत मच्छिंद्र एक एक तांत्रिक काम शिकून घेऊ लागला. चार वर्षे भावाच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर तो सर्व प्रकारची कामे करण्यात निष्णात बनला. भाऊ सगळी कामे करतोय हे लक्षात आल्यानंतर गोरखने दुकानाची जबाबदारी मच्छिंद्रवर सोपविली व स्वतःचा लाईफ इन्शुरन्सचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.एकटय़ाच्या बळावर काम सरू केल्यानंतर मच्छिंद्रने शेतीतील अवजारे अधिक लोकप्रिय केली. मच्छिंद्रला शेतीतील अनुभव होताच, शिवाय विविध शेतकर्यांशी चर्चा करून त्यांच्या सोयीचे काय आहे हे लक्षात घेऊन तो अवजारे बनवू लागला. साहजिकच ही अवजारे शेतकर्यांच्या जास्तीत जास्त पसंतीला उतरू लागली. त्याने बनवलेल्या कोळपी, तिफणी व नांगरांना अधिकाधिक मागणी येऊ लागली.
बैलगाडीमध्येही त्याने व्यवहार्य सुधारणा केल्या. साडे तीनशे ते पावणेचारशे किलो वजनाची मच्छिंद्रने बनविलेली लोखंडी गाडी शेतकर्यांना आवडू लागली. गाडीच्या फळ्या, जू व आकरी फक्त लाकडाची. बाकी सामान लोखंडी. गाडीच्या दांडय़ा काहीजण लोखंडी वापरतात तर काही जण लाकडाच्या. बैलाला गाडीचे अनावश्यक ओझे होऊ नये, गाडी ओढताना त्यांना कष्ट पडू नयेत, हा विचार ही गाडी तयार करताना मच्छिंद्रने अंमलात आणला आहे. सुरुवातीच्या काळात खूपच स्वस्त असलेली ही गाडी आज 25 हजारांच्या आसपास आहे. इतर वस्तुंच्या वाढलेल्या किमती पाहिल्या तर ही किंमत तशी कमीच म्हणावी लागेल. मच्छिंद्र उद्योजक असूनही तो स्वतःला कारागीरच मानतो. त्यामुळे प्रत्येक कामात तो फक्त त्याच्या मजुरीचेच पैसे लावतो. त्यामुळेच नाथ स्टिल इंडस्ट्रिजमधून आजपर्यंत 750 पेक्षा अधिक बैलगाडय़ा विकल्या गेल्या आहेत. आजूबाजुच्या कुठल्याही गावात आपण गेलो तर मच्छिंद्रने बनविलेली बैलगाडी हमखास पहायला मिळते. नांदेडपासून बिदरपर्यंत ही बैलगाडी पोहचली आहे. एकदा बिदरचा लाकूड कटाई मशीन चालविणारा गृहस्थ कारने शिरुरवरून चालला होता. त्याने सडकेच्या कडेला उभी असलेली बैलगाडी पाहून कार थांबवली. बैलगाडीची किंमत विचारून व पैसे देऊन ती त्याने बिदरला लगेच पाठविली. असे अनेक किस्से मच्छिंद्रजवळ आहेत. त्याचा ग्राहक हाच त्याचा जाहीरातदार आहे. त्याचे उत्पादनच ग्राहकांना आकर्षित करते.
गूळ बनविण्यासाठी लागणार्या कलई व त्या उचलण्यासाठीचे जॅक तयार करण्याचे कामही मच्छिंद्रने मोठय़ा प्रमाणात केले आहे. त्यासाठी अनेकदा तो शेतावर जाऊन काम करतो. त्याच्या या तंत्रज्ञानामुळे कलई हाताने उचलण्याचे कष्टाचे काम बंद झाले आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे बनवत असतानाच गेल्या दोन वर्षांपासून लोखंडी दरवाजे, खिडक्या, गेट व ग्रीलची कामेही त्याने सुरू केली. अचूकता हे मच्छिंद्रच्या कामाचे वैशिष्टय़ आहे. त्याच्या कामात शोधूनही दोष सापडत नाहीत. त्यामुळेच शेतकरी मोठय़ा विश्वासाने त्याने बनविलेली अवजारे खरेदी करतात. शेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या सोयीची अवजारे बनवण्याकडे त्याचा कल आहे. तीन फणी,चार फणी, पाच फणी तिफण व जोड कोळपेही मच्छिंद्रने शेतकरीप्रिय केले आहे. बाजारात अनेक स्वयंचलित तिफणी आल्या आहेत. या तिफणीद्वारे बियाणे व खत एकाचवेळी जमिनीत पडते. मात्र या तिफणी सदोष आहेत. यातील काही तिफणींचे फण योग्य प्रकारचे नव्हते. मच्छिंद्रने ते बदलून देऊन काम सोपे केले आहे. शेतकर्यांना हव्या त्या पद्धतीने बियाणे व खतं सोडणारी एक निर्दोष स्वयंचलित तिफण बनविण्याचा मच्छिंद्रचा प्रयत्न सुरू आहे. येत्या पेरणीपूर्वी अशी तिफण तयार होईल याची त्याला खात्री आहे. ही तिफण शेतकर्यांसाठी वरदान ठरेल यात शंका नाही.
एक कारागीर, तंत्रज्ञ म्हणून मच्छिंद्र श्रेष्ठ आहेच. परंतु माणूस म्हणूनही त्याचे तेवढेच मोल आहे. कारागीरांना असणार्या सर्व व्यसनांपासून तो दूर आहे. तंबाखूसारखं `साधं’ म्हणून ओळखलं जाणारं व्यसनही त्याला नाही. शब्दाला तो पक्का आहे. काम केव्हा होईल ते तो सांगतो. वेळ लागणार असेल तर तसे स्पष्टपणे सांगतो. टोलवा-टोलवी, थापेबाजी त्याला मान्य नाही. त्याच्या तोंडात साखर आहे. वागण्यात सभ्यता आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेला माणूस आपोआप जोडला जातो.
मच्छिंद्रच्या या कामाबद्दल त्याचे बंधू गोरखनाथ यांना निश्चितच अभिमान वाटतो. मच्छिंद्र मात्र आपल्या या यशाचे सर्व श्रेय गोरखनाथ यांना देतो. सध्या छोटा भाऊ जालिंदरनाथही मच्छिंद्रच्या मदतीला आहे. तोही चांगला तयार झाला आहे. त्यामुळे त्याच्या कामाची गती अधिक वाढली आहे. शनिवार, रविवार किंवा सण-समारंभाच्या दिवशीही सुट्टी न घेता काम करणारा मच्छिंद्र खर्या अर्थाने ग्रामीण भारताचा `आयडॉल’ म्हणावा लागेल.
चौथीच्या पुढे शिक्षण न घेतल्याबद्दल वाईट वाटते का? असं विचारल्यानंतर हसत हसत मच्छिंद्र म्हणाला, गेल्या दहा-बारा वर्षात माझ्या हातून झालेलं काम पाहिलं तर वाटतं, शिकलो नाही तेच बरं झालं. नोकरी लागली असती का नाही तेही माहीत नाही. लागली असती तर अधिक पैसे मिळाले असते मात्र कामाचं समाधान मिळालं नसतं. असा कष्टाचं महत्त्व सांगणारा मच्छिंद्र आजही आहे हे या देशाचे भाग्यच म्हणावे लागेल.
- महारुद्र मंगनाळे
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://navshakti.co.in/aisee-akshare/39742/
------------------------------------------

तीस हजार महिला झाल्या स्वयंसिद्धा

Small idea BIG MONEY's photo.

कोल्हापूर आणि परिसरातील तब्बल तीस हजार महिला आज स्वयंरोजगार, गृहउद्योग, शेती, बचतगट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. स्वतःला हतबल, परावलंबी मानणाऱ्या महिलांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या, त्या क्षमतांना ठिणगी देणाऱ्या कांचनताई परुळेकर आणि त्यांच्या स्वयंसिद्धाhttp://www.swayamsiddhakop.org या संस्थेविषयी.
-----------
पतीच्या अकाली निधनामुळे खचलेल्या बिस्मिल्ला मुजावर आज पर्स, पिशव्या विकून आपला संसार समर्थपणे चालवत आहेत. भिशीचे पैसे बुडाले म्हणून आत्महत्या करायला निघालेल्या अंजना घाडगे आता महिन्याला हजारो रुपयांचे अनारसे विकतात. मुलगी मतिमंद आहे म्हणून हताश झालेल्या आपटेबाई केटरिंगच्या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल करतात.
कोल्हापूरसारख्या परंपरावादी शहरातील हजारो महिलांच्या जीवनाला गेल्या वीस वर्षांपासून एक नवीन मार्ग मिळाला आहे. यात अडल्या- नडल्या गोरगरीब स्त्रिया आहेत, परंपरेच्या चौकटीचा उंबरठा कधीच न ओलांडणाऱ्या गृहिणी आहेत, शाळा सोडून घरी बसलेल्या मुली आहेत आणि निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा या चिंतेत असणाऱ्या प्रौढाही आहेत. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतो, हा विश्‍वास या महिलांना मिळाला आहे तो स्वयंसिद्धा या संस्थेच्या पाठबळामुळे. या क्रांतीमागची प्रेरणा आहेत कांचनताई परुळेकर. "स्वयंसिद्धा'च्या पुढाकाराने तब्बल तीस हजार महिलांच्या कर्तृत्वाला आज नवे धुमारे फुटले आहेत.
कोल्हापुरातील हरिजन सेवक संघाचे कार्यकर्ते बाळकृष्ण परुळेकर हे कांचनताईंचे वडील. सेवाभावी वृत्तीचे बाळकडू कांचनताईंना त्यांच्याकडूनच मिळाले; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वडिलांइतकाच प्रभाव पडला तो ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक व्ही. टी. पाटील यांचा! श्री. पाटील यांनी परंपरावादी कोल्हापूर शहरात स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली होती. बंडखोर; पण विचारी व्यक्तिमत्त्वाच्या कांचनताईंकडे पाटील यांचे लक्ष गेले. पाटील यांना मूलबाळ नव्हते; त्यांनी कांचनताईंनाच आपली मुलगी मानले. पाटील यांचा उदार; पण कणखर स्वभाव, समाजकारणात सक्रिय सहभाग असल्याने त्यांच्या घरी सर्व स्तरांतील लोकांचा राबता असे. त्याचाही प्रभाव कांचनताईंवर पडला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर कांचनताईंनी आधी ताराराणी विद्यापीठात आणि नंतर बॅंक ऑफ इंडियात नोकरी केली; पण हे काही आपले काम नव्हे, याची खोल जाणीव त्यांच्या मनात सतत जागी असायची. बॅंकेतील कामामुळे त्यांचा अनेक महिलांशी संबंध यायचा. पैसा जवळ असेल, तरच बाईला घरातील निर्णयप्रक्रियेत स्थान मिळू शकते, हे त्यांना कळत होते आणि त्यामुळे त्या अस्वस्थ होत होत्या. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे, असे त्यांना मनापासून वाटायचे; पण त्यासाठी काय करायचे हे मात्र स्पष्ट होत नव्हते.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुशिक्षितांच्या रोजगाराच्या संधीही कमी होत असताना ज्यांच्यापाशी पैसा, शिक्षण, अनुभव यापैकी काहीच नाही अशा महिलांना रोजगार मिळवून द्यायला हवा, त्यांना उद्योजक बनवायला हवे आणि त्यातून पुढे आणखी रोजगारनिर्मितीही व्हायला हवी, असे त्यांच्या डोक्‍यात घोळत होते. त्यांचे मानसपिता व्ही. टी. पाटील यांचे स्त्रीसक्षमीकरणाचे कामच त्यामुळे आणखी एक पाऊल पुढे जाईल, असे कांचनताईंना वाटत होते.
नोकरीचा राजीनामा दिल्यावर त्यांनी बाजारपेठेचा, विविध उद्योगांशी संबंधित संस्थांचा आणि त्यांच्या प्रशिक्षणकामाचा अभ्यास केला. तो अभ्यास पूर्ण झाल्यावर 1992च्या एप्रिल महिन्यात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली ः "ज्या महिलांना फावल्या वेळात काही काम करायचे आहे, त्यांनी येऊन भेटावे.''
या जाहिरातीला 136 महिलांनी प्रतिसाद दिला. तसेच, कोल्हापुरात छोटे उद्योग करणाऱ्या काही महिलांशीही कांचनताईंनी संपर्क साधला आणि या सर्वजणींचा एक मेळावा घेण्यात आला. बॅंक ऑफ इंडिया आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या महिलांना मार्गदर्शन केले. हा पहिलाच अनुभव या महिलांना खूप उत्साह देणारा ठरला. त्यांना काहीतरी करायचे होते आणि त्यासाठी कांचनताईंनी त्यांना एक हक्काचे व्यासपीठ दिले होते, "स्वयंसिद्धा'च्या रूपाने!
या महिलांपाशी अंगभूत असलेल्या कौशल्यांना पुढे आणण्यापासून "स्वयंसिद्धा'ची वाटचाल सुरू झाली. ज्या महिला काही उत्पादने करत होत्या त्यांची विक्री कशी होईल, यासाठी कांचनताईंनी प्रयत्न सुरू केले. ओळखीच्या लोकांच्या घरांमधून अशा वस्तूंचे स्टॉल्स लावण्यापासून या कामाची सुरवात झाली. मग एखाद्या समारंभाच्या ठिकाणी, तर कधी दिवाळीसारख्या उत्सवांच्या निमित्ताने विक्रीच्या नव्या जागा शोधण्यात येऊ लागल्या. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत गेला आणि "स्वयंसिद्धा'चे नाव व काम वाढू लागले. "महिलांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देणारी संस्था' अशी तिची ओळख झाली. काहीतरी करू पाहणाऱ्या महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून "स्वयंसिद्धा'ने आपले वेगळे अस्तित्व तयार केले; पण केवळ तिथवर मर्यादित न राहता महिलांची माणूस म्हणून समृद्ध वाढ होण्यासाठी, त्यांनी जगण्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, यासाठीही ही चळवळ नकळत काम करते आहे.
प्रशिक्षण संस्था म्हणून "स्वयंसिद्धा'चे कामही व्यापक आहे. उत्पादन तयार करण्यापासून ते विकण्यासाठीचे प्रशिक्षण महिलांना येथे देण्यात येते. दर बुधवारी संस्थेच्या आवारात या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचा बाजार भरवला जातो. घरगुती समारंभ, छोटे-मोठे मेळावे, प्रदर्शने यात विक्रीचा अनुभव गाठीस बांधलेल्या या महिला आज दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी जाऊनही विविध प्रदर्शनांत आपल्या उत्पादनांची आत्मविश्‍वासाने विक्री करत आहेत; पण कांचनताईंनी या महिलांना केवळ उद्योजक बनणे आणि काही पैसे कमावणे एवढ्यापुरते मर्यादित ठेवले नाही. एक व्यक्ती म्हणून व व्यावसायिक म्हणूनही त्यांची जडणघडण व्हावी, यासाठीही त्यांनी विशेष लक्ष पुरवले आहे. यातूनच या महिलांनी चांगले लिहावे म्हणून "स्वानंद सखी फीचर्स' ही लेखन कार्यसंस्था त्यांनी सुरू केली. त्यांना चारचौघांत चांगले बोलता यावे यासाठी "वाणीमुक्ती प्रकल्प'ही त्यांनी सुरू केला आहे. याशिवाय, दहावी नापास मुलींसाठी "स्वयंसिद्धा स्कूल', कायदेशीर सल्ला देण्यासाठी "सांगते विचारा', भाजी विकणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी "आरोग्यम्‌ धनसंपदा प्रकल्प', शालेय मुलींना लैंगिक शिक्षण देण्यासाठी "कळी उमलताना' आणि मुलांसाठी "वसंत फुलताना' असे प्रकल्प संस्थेतर्फे चालवण्यात येतात. ""महिलांनी फक्त आपल्यापुरता विचार न करता माझी गल्ली, माझे गाव, माझे राज्य, माझा देश इथपर्यंत विचार केला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकीने आपले काही तरी योगदान द्यायला हवे, तरच स्त्रीसक्षमीकरणाला खरा अर्थ येईल,'' असे कांचनताई मानतात.
कांचनताईंनी आपल्या कामाची व्याप्ती केवळ कोल्हापूर शहरापुरती मर्यादित न ठेवता राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी अशा तालुक्‍यांपर्यंत वाढवली. या गावांमध्ये फिरताना त्यांना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे बचत गटांची हलाखीची स्थिती. इथे असे गट मोठ्या प्रमाणात होते; पण त्यातून म्हणावे असे काही तयार होत नव्हते. नेमके काय करायचे या विवंचनेत असलेल्या या गटांना कांचनताईंनी योग्य मार्गदर्शन केले. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या बचत गटांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान देण्यास सुरवात झाली. ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक शेतीची किचकट भाषा समजणार नाही, याची कल्पना आल्यावर त्यांनी त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवायला सुरवात केली. एकदा तिला हे तंत्र समजले, की ती इतरांनाही शिकवते. बचत गटांच्या सभांमध्ये बोलणे जास्त आणि काम कमी होत असल्याने अशा सभांमध्ये नेमके काय करायचे याचा एक आराखडाच त्यांनी ठरवून टाकला. बचत गटाने केवळ आपल्यापुरते पाहायचे नाही, तर आपल्या परिसराचा, गावाचा विचार करायचा, आरोग्य- शिक्षण- स्वच्छता यावरही लक्ष ठेवायचे, याची जाणीव त्यांनी या महिलांना करून दिली. त्यामुळे एकीकडे उद्योग व शेतीच्या माध्यमातून बचत गटांची प्रगती होत असतानाच गावातही अनेक सुधारणा घडत होत्या. राधानगरी तालुक्‍यातील मल्लेवाडी येथील लक्ष्मी बचत गट हे अशा बचत गटांचे एक यशस्वी रोल मॉडेल मानता येईल. शेतीच्या, उद्योगाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मल्लेवाडीच्या महिलांनी केवळ आपल्या घराचाच नव्हे, तर गावाचाही चेहरामोहरा बदलून टाकला आहे. एवढेच नाही, तर पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये आता आधुनिक तंत्राची शेती करण्यात येत आहे.
बॅंका, शासकीय, निमशासकीय अशा सर्व स्तरांवरील संस्था, कांचनताईंना बचत गट, तसेच सामाजिक संस्थांमधील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलावतात. तेही फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर छत्तीसगड, त्रिपुरा अशा राज्यांमध्येही. "स्वयंसिद्धा'च्या ऐंशी प्रशिक्षण केंद्रांमधून आज विविध व्यवसायांचे आणि कार्मिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातच तीन हजाराच्या जवळपास महिला उद्योजिका यातून प्रशिक्षण घेऊन तयार झाल्या आहेत.
चर्चेत गुंतून पडण्यापेक्षा व्यवहार्य तोडगे काढण्यासाठी महिलांना उद्युक्त करण्यावर कांचनताई भर देतात. काय झाले पाहिजे, यापेक्षा हे असे करता येते, असे प्रात्यक्षिकासह उदाहरण ते त्यांच्याकडे येणाऱ्या महिलांसमोर ठेवतात. त्यांच्याकडे येणाऱ्या महिला परिस्थितीने गांजून निराश झालेल्या असल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे, हे कांचनताईंसमोरचे पहिले आव्हान असते. प्रश्‍नांमध्ये अडकून राहण्यापेक्षा उत्तरांकडे चला, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळेच केवळ महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यापुरते "स्वयंसिद्धा'चे काम मर्यादित नाही; तर जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलणे, समृद्ध जगण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, ही खरी या कामामागची ओढ आहे. "स्वयंसिद्धा'मधून आत्मविश्‍वास घेऊन बाहेर पडलेली बाई केवळ स्वतःचा विचार न करता इतर महिलांना सोबत घेऊन जाण्याचा विचार करते, यापेक्षा एखाद्या कामाचे वेगळे यश ते काय असू शकते?
-प्रिया आमोद
(युनिक फीचर्स)
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://www.saptahiksakal.com/…/2011…/5403336738838122233.html
------------------------------------------

कर्मचा-यांना घर व गाडी वाटणारा चौथी पास उद्योजक


देशातील सर्वच कर्मचा-यांना हेवा वाटावा असा आपल्या कर्मचा-यांना बोनस देणारे सावजीभाई ढोलकीया हे फक्त चौथी शिकलेले आहेत. मात्र त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि नम्रतेने त्यांना आज भारताती एक यशस्वी उद्योगपती बनवले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोट्यवधीचा बोनस देणारे 'हरिकृष्ण एक्स्पोर्ट'चे मालक सावजीभाई ढोलकीया यांनी एवढा मोठा बोनस देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
माझ्या कर्मचा-यांच्या कर्तृत्वाच्या तुलनेत मी त्यांना दिलेले बोनस अगदीच नगण्य असल्याचे मत व्यक्त केले. मी फक्त चौथी पर्यंत शिकलेलो आहे. १२व्या वर्षी मी शिक्षणाला राम राम ठोकला आणि हि-यांच्या व्यवसायामध्ये काम करण्यास सुरुवात केली. मी स्वत: कसलेही शिक्षण घेतलेले नाही. मात्र मी रोज वाचन करतो आणि रोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो, असे सावजीभाई यांनी स्पष्ट केले.
मी माझ्या भावांसहीत सुरतमध्ये असेच काम करीत होतो. आम्हा चार भावंडांपैकी एकानेही दहावीच्या पुढे शिक्षण घेतेले नाही. माझ्या सर्वात छोटा भाऊ दहावी पास असल्याचे ढोलकीया सांगतात. देवाच्या कृपेने मला माझ्या घरच्यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही कर्मचा-यांना बोनस देण्यासाठी ५० कोटींचे बजेट निश्चित केले होते. मी सर्वांसाठी गाड्याच घेणार मात्र नंतर आमच्या लक्षात आले की कंपनीतील २०० कर्मचा-यांकडे स्वत:चे घर नाही, म्हणून त्यांना घर देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर ५०० कर्मचा-यांकडे घर आणि गाडी दोन्ही असल्याने आम्ही त्या प्रत्येकाच्या पत्नीसाठी हि-याचे दागिने देण्याचे निश्चित केले. गुजरातमध्ये अनेकदा नव-याला पाठिंबा देणा-या त्याच्या चांगल्या-वाईट परिस्थितीमध्ये ठामपणे त्याच्या पाठिशी उभ्या राहणा-या स्त्रीयांचे कौतुक केलेच जात नाही. म्हणून आम्ही मुद्दाम दागिने देण्याचा निर्णय घेल्याचे ढोलकीयांनी मुलाखतीमध्ये सांगितले.
मी खुप छोटा माणुस आहे तुम्ही मला मोठे केले आहे. आमच्या कंपनीच्या या निर्णयाची देशभरात चर्चा होईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र मला खात्री आहे की एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर इतर उद्योजकही त्यांच्या कर्मचा-यांना चांगल्या सोयीसुविधा देतील. आमच्या कंपनीमध्ये एक क्रिकेटचे मैदान आहे जे मी गांगुलीला लंडनमध्ये खेळताना पाहिल्यानंतर बांधले. येथे माझ्या कंपनीतील कर्मचारी क्रिकेट खेळातात आणि त्यांना मी पव्हेलियनमध्ये बसून पाहतो. आमच्या कंपनीत व्ययामशाळा आहे, सोना बाथची सोबतच अनेक खेळांचे कोर्टही कंपनीच्या आवारातच असल्याची माहिती ढोलकीयांनी दिली.
मी ज्यांना इतके काही देऊ केले आहे ते माझे कर्मचारी आहेत. ते मला तोट्यात जाऊन देणार नाहीत असा माझा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही प्रामाणिकपणे काम करणा-यांना सन्मानीत करण्याचे ठरवले. मी जेव्हा १९९१मध्ये कंपनी सुरु केली होती त्यावेळी आम्ही १ कोटी रुपयांचा माल निर्यात करत होतो. आता हाच आकडा ६०० कोटींपर्यंत गेला आहे. आमच्या व्यवसायातील या भरभराटीसाठी आमचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या कंपनीतील सर्व १२०० कर्मचा-यांच्या कामाचा लेखाजोखा तपासून आमची कंपनी पुढे नेण्यामध्ये कोणचा किती वाटा आहे याची माहिती गोळा केली. माझ्या मुलाने न्यूयॉर्कमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. मागील सहा वर्षापासून तो मला या व्यवसायात मदत करती आहे. कोणला कोणते बक्षिस द्यायचे हे ठरवण्यासाठी आमची एक पद्धत ठरलेली आहे. ते सर्व काम माझा मुलगाच पाहतो. प्रत्येकाच्या योगदानानुसार त्याला बक्षिस देण्यात येते. इतरांनीही आमच्या १२०० कर्मचा-यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जोमाने आपआपल्या श्रेत्रात प्रगती करावी. कर्मचा-यांकडे कौशल्य असते. मात्र मालकाने त्याच्या कौशल्याला वेळोवेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही सावजीभाई यांनी सांगितले.
माझे सर्व कर्मचारी वेळेवर कर भरतात. आमच्या कर्मचा-यांकडून १० कोटीचा कर भरला जातो. कर्मचा-यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. म्हणूनच आमच्या कंपनीमध्ये हिरा कापणा-याला डायमंड इंजिनिअरची पोस्ट दिली जाते. तर हिरा पॉलिश करणा-याला डायमंड आर्टिस्टची पदवी दिली जाते. या लोकांमध्ये खूप कला असूनही त्यांना फक्त ७० ते ८० हजार पगार आहे. म्हणूनच मी त्यांना इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. मी सोशल बिझनेस करतो. माझ्या कंपनीमध्ये २१ राज्यातील ३६१ गांवांमधील कर्मचारी काम करतात. त्यांचे प्रत्येकाचे पालक मला ओळखतात. मी सर्वांना हरिद्वारच्या यात्रेला घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्हा सर्वांचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत, असे सांगत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांविषयीची भावना देखील व्यक्त केली.
जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देता तेव्हा त्याच्यावरील जबाबदारी वाढते. मी एक व्यवसायीक आहे म्हणून मी कधी तोट्यात जाण्याच सौदा करणार नाही किंवा एखाद्याला उगच सहानभूती दाखवत नाही. मी इतर व्यवसायींकाना कर्मचा-यांना खुष ठेऊन व्यवसाय कसा करावा हे दाखवत आहे. मात्र त्यासाठी कर्मचा-यांनीही माझ्या कंपनीतील कर्मचा-यांसारखे कष्टाळू असावे असे मला वाटते. मी पहिल्यांदा एखादी वस्तू देतो आणि त्याचा मोबदला नंतर घेतो. पण बरेच जण याच्या उलटे करतात त्यामुळे कर्मचारी दु:खी होऊन मनापासून काम करण्याऐवजी करायचे म्हणून काम करतात. माझ्या कंपनीमधून अद्याप एकाही कर्मचा-याला काढून टाकण्यात आलेले नाही. कर्मचा-याला काही येत नसेल तर आमच्या गरजेनुसार त्याला प्रशिक्षण देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवतो. माझ्या कंपनीतून हिरे नाही तर माणसे तयार होऊन बाहेर पडली पाहिजेत, असे मला मनापासून वाटत असल्याचे मत ढोलकीया यांनी व्यक्त केले.
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://maharashtratimes.indiatimes.com/…/artic…/44931077.cms
------------------------------------------

बुटपॉलिशवाला ते उद्योजक



घरच्या प्रतिकूल परिस्थिती-मुळे वयाच्या आठव्या वर्षी त्याला बूटपॉलिश करून, स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागत होता. हे काम करता करताच तो शिकतही होता. त्याला कोणत्याही श्रमाची-कामाची लाज नव्हती. पण, आपण जगातला मोठा उद्योजक अशी कीर्ती मिळवायची जिद्द होती. निर्धाराने त्याने त्या दिशेने वयाच्या 20 व्या वर्षीच पहिले पाऊल टाकले आणि यशही मिळवले. त्याने काही ख्यातनाम विद्यापीठातून एम. बी. ए. ची पदवी मिळवलेली नाही. व्यवसाय आणि उद्योगात तो यशस्वी झाला, तो स्वत:च्याच व्यवस्थापनाच्या तंत्राची अंमलबजावणी करूनच! 50 वर्षांपूर्वी बूटपॉलिश करणारा हा मुलगा जगातल्या ख्यातनाम "आयमॅक्स' (https://en.wikipedia.org/wiki/IMAX_Corporation ), या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. या यशस्वी उद्योजकाचे नाव रिच गेलफॉंड (Richard Gelfond) !
परिश्रमाच्या बळावर जागतिक कीर्तीचा उद्योजक झालेल्या रिचने जीवनात अनेक उद्योग केले. त्यातही यशही मिळवले. न्यूयॉर्कमध्ये येऊन वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी स्वत:च्या मालकीचे वृत्तपत्रही त्याने सुरू केले होते. त्याचा खपही 25 हजाराच्या आसपास होता. त्यानंतर त्याने आणखी काही व्यवसायही केले. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक आणि संपर्काच्या तंत्रात आमूलाग्र क्रांती झाली. सारे जग जवळ आले आणि त्याला हे क्षेत्र खुणवायला लागले. मोठ्या पडद्यावर सुरेख प्रतिमांचे प्रक्षेपण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पडद्यांची आणि सूक्ष्म कॅमेऱ्याची निर्मिती करणारी आयमॅक्स ही कंपनी त्याने 1994 मध्ये विकत घेतली. ही कंपनी संग्रहालये आणि वैज्ञानिक प्रयोगशाळात मोठ्या पडद्यावर वैज्ञानिक विषयाशी संबंधित असलेले चित्रपट प्रदर्शित करायचा व्यवसाय करीत होती. रिचला या कंपनीचे हे तंत्र जगभर न्यायचे होते. त्याने ब्राईड वेशलर यांच्या सहाय्याने ही कंपनी घेतली आणि आयमॅक्स कंपनीचा चित्रपट व्यवसायाशी संबंध जोडला जावा, यासाठी प्रयत्नही सुरू केले. हॉलिवूडसह जगातल्या चित्रपट गृहात नव्या तंत्राने चित्रपट दाखवण्याची पद्धतच त्याने अंमलात आणेपर्यंत सुरू झाली नव्हती. हॉलिवूडचा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक जॉर्ज लूक्स याच्या समोर त्याने याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यांनाही हे नवे तंत्र लोकांना आवडेल याची खात्री नव्हती. पण त्यांनी रिचचा प्रस्ताव मान्य केला. हॉलिवूडचे चित्रपट आयमॅक्सच्या तंत्राने दाखवायला सुरुवात झाली. रिचने चित्रपटांच्या चित्रीकरणातही नवे तंत्र अंमलात आणायला सुरुवात केली. त्रिमिती (थ्री डायमेन्शन) तंत्राने चित्रपट निर्मिती केल्यास प्रेक्षकांना ते आवडेल, असा विश्वास त्याला होता. वॉरन ब्रदर्सच्या पोलर एक्स्प्रेस या चित्रपटाचे या नव्या तंत्राने त्याने चित्रीकरण करायला लावले. "डिस्नी फॅंटसी', "पोलर एक्स्प्रेस' आणि "अवतार' या तीनही चित्रपटांच्या निर्मितीत रिचचा सहभाग होता. या तीनही चित्रपटांनी त्याला अब्जावधी डॉलर्स मिळवून दिले. आयमॅक्सच्या 150 चित्रपट गृहांची संख्या आता सातशेच्यावर गेली आहे. ही कंपनी आता जागतिक झाली आहे.
- वासूदेव कुलकर्णी
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://dainikaikya.com/20130628/5248542733345831977.htm
------------------------------------------

गरीब मराठी शेतमजुराचा मुलगा बनला जागतिक उद्योजक



पयोद. पयोद म्हणजे पाणी घेऊन आलेला एक ढग. कदाचित शहरी माणसाला या शब्दाशी एवढं जुळता येणार नाही पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी पयोद म्हणजे आयुष्यच असते जणू. सध्या उन्हाची काहिली वाढलीय. त्यामुळे पाण्याचं मूल्य आपल्या प्रत्येकाला जाणवत असेलच. त्या पयोदवर त्याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल, त्याच्या मुलांचं शिक्षण, आईवडलांच्या आजारावर उपचार, सणासुदीचा खर्च सारं काही अवलंबून असतं. हाच पयोद शब्द त्याने आपली नवीन कंपनी सुरु करताना निवडला आणि आठ वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक महिलांच्या घरी हा पयोद सुख-समृद्धी आणि विकासाच्या रुपाने बरसत आहे. हा पयोद बरसविणारे आहेत पयोद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे (http://payodindustries.com/index.html) अध्यक्ष देवानंद लोंढे.
कवठे महांकाळ या सांगलीतल्या एका खेडेगावात देवानंदचा जन्म झाला. कवठे महांकाळ तसा दुष्काळी भाग. त्यामुळे शेती पेक्षा शेतमजूरी करणे हा तेथील प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय. देवानंदचे आई वडील देखील शेतमजूरीचे काम करीत असत. देवानंदने स्वत: शेतात राबून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूर विद्यापीठातून तो सिव्हील इंजिनियर झाला. पाणी आणि पाणी व्यवस्थापन हे त्याचे स्पेशलायझेशनचे विषय होते. याच विषयाच्या अनुषंगाने तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार बनला. त्याला युनिसेफ बरोबर काम करण्याची संधी देखील मिळाली. ८० देशांमध्ये कामानिमित्ताने संचार करता आला. पण नोकरी किती दिवस करायची हा प्रश्न त्याने स्वत:लाच विचारला. लहानपणापासून त्याने आपल्या आई बाबांना शेतात राबताना पाहिले होते. जर ही गुलामगिरी झुगारायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे मनाशी पक्कं झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरी सोडून दयानंद लोंढेंनी व्यवसायात उडी घेतली.
मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी व्यवसाय कोणता करावा याचे काही ठोकताळे मनाशी त्यांनी मांडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरातून आल्याने आंतरराष्ट्रीय चलनातच व्यापार करायचा हे मनाशी पक्कं होतं. असं उत्पादन असावं जे भारतात खूप कमी उद्योजक तयार करत असतील आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे या उत्पादनातून सामाजिक संदेश गेला पाहिजे. हे सर्व विचारचक्र आणि संशोधन दोन वर्षे चालू होते. संशोधनातून एक उत्पादन समोर आले ते म्हणजे हातमोजे तयार करणे. एकतर भारतात हातमोजे तयार करणारे खूपच कमी उद्योजक आहेत. हातमोजे तयार करुन ते निर्यात करायचे त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय चलन मिळणार होतं. आणि हातमोजे घालून सुरक्षितता बाळगा हा संदेश आपसूकच समाजात जाणारा होता. त्यामुले हाच व्यवसाय करण्याचा निर्णय झाला.
पण खरी परिक्षा तर पुढेच होती. उद्योग करण्यासाठी भांडवल लागतं. हे भांडवल बॅंका देतात. भांडवल मिळावे यासाठी देवानंद यांनी वित्तीय संस्थांना प्रकल्प सादर केले. आणि वित्तीय संस्थांनी कर्ज नाकारलं. कर्ज नाकारण्याचं कारण होतं दलित समाजातील एक तरुण, उद्योग पण उभारु शकतो यावर नसलेला विश्वास. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नोकरी, मानमरातब, उच्च शिक्षण सामाजिक व्यवस्थेने तयार केलेल्या दलित या घटकासमोर निष्प्रभ झाले होते. अजूनही जात व्यवस्था आपल्या भारतीय मानसिकतेत कशी दबा भरुन बसली आहे याचं हे मूर्तीमंत्त उदाहरण आहे. मात्र जर व्यवस्था आपल्या नाकारत असेल तर आपण आपली व्यवस्था प्रस्थापित करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या जगाला दिलेलं बाळकडू दयानंद लोंढेंनी वापरलं आणि स्वत:च उद्योगासाठी लागणारा पैसा उभारला. यासाठी आपलं राहतं घर, जमीन, बायकोचे दागिने त्यांना गहाण ठेवावं लागलं. आणि त्यातून उभी राहिली पयोद इंडस्ट्रीज प्रा. लि.
आज पयोद कडे ८५० हून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. जपान आणि काही युरोपियन देशांत पयोदचे हातमोजे निर्यात होतात. ओबेरॉय, ऑर्किड, ताज ही भारतातील पंचतारांकित हॉटेल्स, वाहने तयार करणाऱ्या कंपन्या हे पयोदचे भारतातील प्रमुख ग्राहक आहेत. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी पयोद जपते. हातमोजे सारखी वस्तू निर्जंतूक आणि स्वच्छ असावी यासाठी धूळ आणि धूर नसलेल्या ठिकाणीच पयोद हातमोजे तयार करायला देते. पण ग्रामीण भागात हे दोन्ही घटक अविभाज्य आहेत. जर कोणती महिला पयोदकडे रोजगारासाठी आली तर मशीन देताना पयोद दोन गोष्टी करते. धूराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पयोद संबंधित महिलेला गॅस कनेक्शन मिळवून देते आणि धूळ टाळण्यासाठी तिला फरशी टाकण्यासाठी संबंधित कंपनीशी भेट घालून देते वा कार्पेट मिळवून देते. हे सगळं करण्यासाठी जर कोणाकडे पैसे नसतील तर पयोद कच्चं कर्ज देखील देते ते देखील नाममात्र मासिक हफ्ता घेऊन. ग्रामीण भागामध्ये आजदेखील न्हाणीघर बाहेर असतं ते देखील व्यवस्थित झाकलेलं नसतं. परिणामी लज्जास्तव पहाटेच्या अंधारात कित्येक महिला स्नानादी आटोपून घेतात. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागामध्ये शौचालयासोबत न्हाणीघर देखील व्यवस्थित असावं यासाठी पयोद मदत करते.
त्याचबरोबर २५ गावांत पसरलेला पयोदचा पसारा पाहण्यासाठी दूर दूरचे लोक येतात. त्यांना पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारी न ठेवता पयोद दोन मुलांना मार्गदर्शन करण्याचा रोजगार देणार आहे. यातून उद्योजकीय सहल ही संकल्पना पयोद राबविणार आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन अंतर्गत ते कच्चा माल देखील हिंगणगावातच तयार करणार आहेत. नद्या स्वच्छ करण्याचा प्रकल्प टाटा समूह राबवत आहे. महाराष्ट्रात पयोद या प्रकल्पात टाटाचे सहाय्यक आहेत. तरुणांना रोजगार आणि लोकांना प्यायला स्वच्छ पाणी देणे हाच यामागे हेतू आहे.
एकेकाळी देवानंद लोंढेंना वित्तीय संस्था कर्ज द्यायला नकार देत होती. आज व्हेंचर कॅपिटल कंपनी पयोदमध्ये ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला तयार आहे. स्वत:च्या हिंमतीवर लढा देत चाळीशीच्या आतच या तरुणाचा व्यवसाय वर्षाला ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल करतो. निव्वळ दलित असल्यामुळे व्यवस्थेने नाकारलेल्या या तरुणाने स्वत:चीच व्यवस्था तयार केली. असे अनेक देवानंद लोंढे (https://web.facebook.com/Devanand-Londhe-1516302118676820/) उद्योजक म्हणून उभे राहून समृद्धीचे पयोद महाराष्ट्रावर बरसावेत ही सदीच्छा.
-- प्रमोद सावंत
https://web.facebook.com/prasawant
सौजन्य : दै. मुंबई तरुण भारत, दि. १ एप्रिल २०१६.
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : https://web.facebook.com/prasawant/posts/10208899487593308
------------------------------------------

नोकरदार युवती कशी बनली अब्जाधीश उद्योजिका


देशात ऑनलाइन बिझनेस झपाट्याने पसरला आहे. उल्लेखनिय म्हणजे ऑनलाइनमध्ये करियरकडे तरुणाईचा वाढता कल दिसत आहे. एका ऑनलाइन सर्वेनुसार मागिल दोन वर्षांत ऑनलाइन बिझनेसमध्ये येणार्‍या महिला-पुरुषांच्या संख्येत 60 टक्के वाढ झाला आहे. अनिशा सिंह ही तरुणी देखील त्यातीलच एक आहे. अनिशाने विदेशातील नोकरी सोडून मायदेशातच स्वत:चा ऑनलाइन बिझनेस सुरु केला आहे. अनिशाने एक वेबसाइट सुरु केली असून ती आज कोट्यधीश बनली आहे.
अनिशा सिंह, फाउंडर आणि सीईओ (Mydala.com)
अनिशा सिंह आज कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीन आहे. अनिशा विदेशातील नोकरी सोडून मायदेशी परतली. तिने 2009 मध्ये आपला स्वत:चा बिझनेस सुरु केला. सेंट्रा सॉफ्टवेअर, बोस्टनमध्ये नोकरी करून अनिशाने करियरची सुरवात केली. परंतु, अनिशामध्ये लपलेला एक बिझनेसमन तिला स्वस्त बसू देत नव्हता. देशातही अनिशाने महिले किनिस सॉफ्टवेअर सोल्युशन्समध्ये नोकरी केली आहे. ही कंपनी ई-लर्निंग सोल्युशन्स देते. ही फॉर्च्यून लिस्टेड कंपनी आहे.
अनिशाने 2009 मध्ये 'Mydala.com'नामक एक वेबसाइट सुरु केली. आज ही देशातील टॉप वेबसाइट आहे. ही वेबसाइट गिप्ट कूपन उपलब्ध करून देते. अनिशाने पॉलिटिकल कम्युनिकेशनमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. याशिवाय तिने अमेरिकन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टनमध्याून 'इन्फॉर्मेशन सिस्टम'मध्ये एमबीए केले आहे.
अनिशा सिंहला वुमन लीडरशिप अवार्ड(2014) आणि लीडिंग वुमन इन रिटेल (2012) या दोन पुरस्काराने सन्मानितही करण्‍यात आले आहे.
Mydala.com
फाउंडर मेंबरः अनिशा सिंह, अर्जुन बासु, आशीष भटनागर
मर्चेंट्स (व्यापारी)- दोन लाखांहून जास्त
यूनीक व्हिजिटर्सः 5 कोटी
रजिस्टर्ड युजर्सः 2.5 कोटी
कस्टमर ट्रान्झक्शन प्रतिमाहः 40 लाख
फंडिंगः 43 कोटी 78 लाख रुपये
प्रतिमाह उत्पन्न: 300 कोटी
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://divyamarathi.bhaskar.com/…/BUS-BSP-these-five-indian…
------------------------------------------

ऐन दुष्काळात 10 गुंठ्याच्या शेतीत तब्बल लाखाचं उत्पन्न!



बीड : मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने फक्त 10 गुंठ्यात तब्बल एक लाखाचं उत्पन्न घेतलंय. एकूणच मराठवाड्यात सततच्या दुष्काळामुळे पारंपरिक शेतीमधील उत्पादनात घट होत आहे. या आपत्तीवर मात करत आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथील रवींद्र देवरवाडे या तरुण शेतकऱ्याने फक्त १० गुंठ्यातील शेतीमध्ये एक लाख रूपयांच्या सिमला मिरचीचं उत्पादन घेतलंय. कमी पाण्यात येणारं पीक म्हणून रविंद्र देवरवाडेंनी शेडनेटमध्ये ढब्बू मिरचीचा पर्याय निवडला.

10 गुंठ्यात लाखाचं उत्पन्न देणारं शेडनेट
आंबेजोगाईतील रविंद्र देवरवाडे समाजसेवेत पदव्युत्तर शिक्षण (एमएसडब्यू) घेतलंय. शिक्षण झाल्यावर त्यांनी काही अहमदनगरच्या स्नेहालयमध्ये काही महिने नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीला राम राम ठोकून गावी परतले. देवरवाडे २०११ पासून वडिलोपार्जीत शेती कसत आहेत. त्यांना ३० एकर शेती आहे. एकत्र कुटुंब विभक्त झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला सहा एकर शेती आली, सुरवातीला ते आपल्या शेतात पारंपरिक म्हणजे ऊस आणि सोयाबीन अशी पिके घ्यायचे. मात्र पाण्याची कमतरता असल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाची जोड शेतीला देऊन पिक पद्धतीमधे बदल केला.

शेडनेेटमधील फायद्याची शेती
शेडनेट शेतीतील जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेडनेटमधील पिकांचा पर्याय निवडला. 10 गुंठ्यांमध्ये शेडनेटची उभारणी केली. शेडनेटमध्ये सुरवातीला टोमॅटोचं पीक घेतलं. मात्र भाव स्थीर नसल्याने म्हणावा असा फायदा झाला नाही. मात्र त्यामुळे निराश न होता, त्यांनी ढोबळी मिरचीची लागवड करण्याचा पर्याय निवडला.

त्यासाठी त्यांनी सांगलीच्या एका नर्सरीतून तब्बल साडेतीन हजार रोपं आणली. ड्रिप आणि मल्चिंगचाही वापर केला. रोपं, खते, मजुरी असा सर्व एकत्रित खर्च हा 30 हजार रूपयांपर्यंत आल्याचं देवरवाडे सांगतात.

रविंद्र देवरवाडे यांना शेडनेटच्या उभारणीसाठी साडेतीन लाखांचा खर्च आला तर ढोबळीच्या लागवडीसाठी आठ हजारांचा खर्च आला. दिवसभरातील तापमानाचा अंदाज घेऊनच शास्त्रीय पद्धतीने ते मिरचीला पाणी देतात.

बाजारभावाचा अभ्यास करून त्यांनी ढोबळी मिरचीच्या पिकाची निवड केली. आतार्यंत त्यांनी तब्बल सहा टन मिरचीची विक्री स्थानिक बाजारात आणि लातूरला करतात. त्यांच्या मिरचीला सरासरी रूपये १५ ते २० रुपये भाव मिळाला. सहा टनाचे त्यांना जवळपास एक लाख पंधरा हजार रूपये मिळालेत. त्यांना आणि आणखी सात टन उत्पादन निघेल अशी आशा आहे. बाजारभाव फार पडले नाहीत तर त्यांना एक लाख रुपयांचं निवळ उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीसाठी पायपीट करण्याऐवजी शेतीतच काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय योग्य असल्याची खात्री आता सर्व देवरवाडे कुटुंबाला पटलीय.

उच्च शिक्षण घेतलेले ग्रामीण भागातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरात भटकंती करतात. मात्र नोकरीलायक शिक्षण असूनही शेतीतच लाखोंचं उत्पन्न घेता येतं तसंच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुष्काळातही आर्थिक समतोल कसा टिकून राहतो याचं उदहारण रवींद्र देवरवाडे यांनी घालून दिलंय.
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा
https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611862/
------------------------------------------
Source : http://abpmajha.abplive.in/maharashtra/success-story-of-beed-farmer-206080
------------------------------------------