'उद्योजक बनण्याचे बालपणीचे स्वप्न केले साकार'



परभणी - घरची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती; पण बालपणापासूनच उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले. अपार कष्ट, दुर्दम्य इच्छाशक्तीने हे स्वप्न अवघ्या पाच वर्षांत प्रत्यक्षात उतरविणाऱ्या अनिरुद्ध देशमुख या ग्रामीण युवकाचा प्रवास अचंबित करणारा आहे. 

पूर्णा (जि. परभणी) येथील नलिनी व शिवाजी देशमुख यांचा अनिरुद्ध हा मुलगा. अनिरुद्धची आई नलिनी शिवणकाम करून, मेस चालवून कुटुंबाचा गाडा कसाबसा ओढत होती. अनिरुद्ध व जान्हवी या मुलांचा सांभाळ, शिक्षण करीत अनिरुद्धने दहावीपर्यंत मौजे धनगर टाकळी येथील शाळेतून शिक्षण पूर्ण करीत परभणीच्या आयटीआयमधून 1998 मध्ये रेफ्रिजरेटर व एअर कंडिशन दुरुस्तीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरच्या बिकट परिस्थितीमुळे औरंगाबाद येथे कंपनीत नोकरी सुरू केली. त्याच वेळी नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन पदविका व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. दरम्यान 2006 ते 2010 पर्यंत पुणे येथे विविध कंपन्यांध्ये नोकरी केली; पण कायमच बालपणापासून उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनिरुद्धने वयाच्या तिसाव्या वर्षी अवघ्या चाळीस हजारांच्या गुंतवणुकीने वर्ष 2010 मध्ये ऍस्पिक थरमोप्रोसेस प्रा.लि. कंपनीची स्थापना केली. अवघ्या पाच वर्षांत त्याची उलाढाल तब्बल 13 कोटींपर्यंत गेली. विशेष म्हणजे दोन वर्षांत 16 ते 17 देशांतील मागणी पूर्ण करीत व्यवसाय सातामुद्रापलीकडे नेला.

सध्या चिंचवड (पुणे) येथील औद्योगिक परिसरातील कंपनीमध्ये 50 हून अधिक कामगार, कर्मचारी, अभियंते कार्यरत आहेत. उद्योगासाठी कुठल्याही बॅंकेकडे अथवा नातेवाईक, मित्रांकडे एकही रुपया न घेता स्वकष्टावर उद्योगाचे साम्राज्य उभे केले. त्यांच्या डेअरमी मशिनरी, फूड प्रोसेसिंग प्रोजेकेट्‌स, वॉटर प्युरिफायर उत्पादनांना प्रचंड मागणी आहे.

एका खेड्यातून थेट पुण्यापर्यंत केलेला प्रवास इतर युवकांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. विशेषतः नोकरीच्या मागे न लागता इतरांना नोकरी देण्यासाठी उद्योजक व्हावे, असे त्याने सांगितले.

स्वतःवर विश्वास असेल, जिद्द, कठोर परिश्रमाची तयारी असेल तर अशक्‍य ते शक्‍य करता येते. स्वतःला कधीच कमी लेखू नये. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील युवक उद्योजक होतो, हेच सिद्ध करावयाचे होते.

- अनिरुद्ध देशमुख
https://www.facebook.com/Aseptic-Thermoprosys-Pvt-Ltd-630983300323617/


Source : http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=4697046239705294353&SectionId=28&SectionName=ताज्या+बातम्या&NewsDate=20151127&Provider=-+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=%27उद्योजक+बनण्याचे+बालपणीचे+स्वप्न+केले+साकार%27