मराठी माणसाचे उद्योग आणि धंदे



आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाच्या काही गरजा असतात. काही दैनंदीन, निरंतर असतात काही कधीतरी किंवा अचानक निर्माण होणार्‍या असतात. त्यासाठी प्रत्येकालाच कुणावर तरी अवलंबून रहावंच लागतं. अश्या स्वरुपाच्या निरंतर किंवा आकस्मिक सेवा-सुविधा पुरवणं हा देखील उद्योग-धंद्याचाच एक भाग असतो. यासाठी कायलागतं? तर एखादं कौशल्य किंवा ह्या सेवा-सुवीधा पुरवण्याची तयारी, सहज संपर्काचं एखादं माध्यम किंवा आवश्यक असेल तिथे एखादी जागा. ही ज्याची तयारी आहे तो कोणताही छोटा मोठा उद्योग-धंदा करु शकतो. अश्या उद्योग-धंद्याची समाजाला कायम गरज असते. गरज आणि ती गरज पुरवणार्‍या व्यक्तीची गाठभेट जिथं होते, तिथुन उद्योग-धंदा सुरु होतो.

भय्यागीरी
उत्तरेतला भय्या हा मातीच्या गोळ्यासारखा असतो. तो त्याचे तुंम्हाला पाहिजे तसे आकार बदलतो, पण त्याचा मातीचा गूण कधीच सोडत नाही. भय्या हा पृथ्वीतलावरचा सगळ्यात लवचीक, संयमी प्राणी आहे. तो रिक्षा-टॅक्सीत झोपतो, दिवसभर काम करतो, सार्वजनीक संडासात किंवा मोकळ्या जागेत सगळे विधी आटोपतो. वेळेला केळे किंवा चुरमुरे, वडापाव खातो, छप्पर असेल तर डाळ-भात स्वतः शिजवून खातो, एका गालावर मारलीत तर फक्त त्याजागी चोळतो. प्रतिकार करत नाही, सटकण्याच्या प्रयत्नात असतो. तो आपली चुक मान्य करतो, त्याला आंघोळीची, घामाची, कपडयांची पर्वा नसते. तो दुध तर देतोच पण प्रसंगी भटजीही होतो, मच्छी विकतो, भाजी विकतो, चणे-शेंगदाणे विकतो, पाणिपुरी बनवतो, पानपटटी चालवतो, वडापाव बनवतो, हार-गजरे विकतो, तो कपडे विकतो, धुतो, त्या कपडयाना इस्त्री करतो, पिठाची गिरण चालवतो, केस कापतो, सुतार बनतो, मेडीकल दुकान चालवतो, तो वकील बनतो. भय्या सगळ्या रुपात दिसतो. कारण तो फक्त काम आणि काम करतो. त्याला कामाची लाज वाटत नाही. त्याला लोक काय म्हणतील याची शरम वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रदेश सोडतांना प्रत्येक भय्या हा गरीब असतो. दरीद्री असतो. तो फार शिकलेलाही नसतो.

मराठी माणसाचे उद्योग
मराठी माणसाचे उद्योगाच्या संदर्भात काही समज आहेत. म्हणजे असे की, मराठी माणूस हा धंदेवाईक नाही (आणि जो धंदेवाईक नसतो तो सालस, सुसंस्कृत असतो!) व्यवसाय करणे म्हणजे लबाडी करणे, ग्राहकांना लूटणे, ते त्याच्या संस्कारात बसत नाही (फक्त त्याला लूटून घ्यायला आवडते) जे यशस्वी झालेली मराठी व्यावसायीक आहेत ते इतरांना घाबरवत राहतात. किंवा जे अयशस्वी आहेत ते धंदा कसा करावा याचे शिक्षण देत राहतात. त्यातले काही मराठी मराठी करत संघटना बांधतात राहतात (हा धंदा चांगला आहे!) बाकीचे फर्डे वक्ते बनतात. सचोटी, प्रामाणिकपणा याविषयी अखंड बडबडत राहतात (ज्याचा कदाचित उद्योग-धंद्याशी संबध नसावा). स्टॉक मार्केटला शिव्या देणे, पैशावर (तोंडी) थुंकणे, धंद्यावर लाथ मारणे हे काहींचे आवडते उद्योग. आपल्या व्यवसायाची इतरत्र कुठेही शाखा न खोलणे आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणे, चादर पाहुन हात-पाय पसरणे (खरंतर हात-पाय पाहुन चादर पसरणे किंवा थेट चादरीची घडी घालणे इ.) त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी माणसाच्या उद्योगाची भरारी इतरांच्या तुलनेत काही फुटापर्यंतच राहते.

मराठी माणसाचे धंदे
मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भुमीपुत्र, त्यामुळे पहिला मान त्याचा. तो मान चुकला की त्याचा पारा चढतो. हे पण समजू शकते, पण त्याचा मान चुकवला कुणी? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जबाबदारीची आणि कष्टाची वेळ सोडा चाहुल जरी लागली तरी तो मागे हटतो. खरंतर मराठी माणसानं ठरवलं आणि बेफाम काम करायची हिंम्मत दाखवली तर ब्रम्हदेवाचा बापही त्याला तसे करण्यासाठी रोखू शकणार नाही. पण मराठी माणूस असे करीत नाही. मराठी माणूस सणाला कर्ज काढतो, वर्षाला सत्यनारायण घालतो, श्रावण तर पाळतोच पण हल्ली मार्गशिर्षातले गूरुवारही घालतो, गणपती- शिमग्याला गावाला जातो, संध्याकाळी टिव्हीवरच्या टुकार सिरिअल्स पहातो, आणि रविवारची न चुकता कोंबडी सोलत बसलेला असतो. त्यावेळी भय्या, गुजराती, आणि मारवाडी, आणि दक्षिण भारतीय दिवसाचे बारा-पंधरा तास राबत असतो.
गणेशोत्सव, होळी(धुळवड), भंडारा, देव-धर्म आणि अस्मितेशी संबधीत जयंत्या-पुण्यतिथ्या, माघी गणेशोत्सव, लग्नकार्य, दुर्गोत्सव (म्हणजे थोडक्यात गरबा) या धंद्यात मराठी माणूस जेवढा ऍक्टीव्ह असतो तेवढा तो इतरवेळी कधीच नसतो. नवतरुण मंडळे स्थापणे, अध्यक्ष-उपाध्यक्ष बनणे, वर्गणी काढणे हा सगळ्यात आवडता धंदा या सगळ्यावर नजर टाकली तर लक्षात येतं की इथं कष्टापेक्षा मिरवणेच जास्त असतं.

धंद्याची गोष्ट
आपल्याला हे माहीत नाही का? की आज मुंबईत कोणताही धंदा करायला केवळ तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा कौशल्य असून चालत नाही, किंवा तुम्ही फक्त प्राणाणिक असूनसुध्द्दा चालत नाही. धंद्याला नुसती सचोटी किंवा भांडवल पुरत नाही. आहे त्या परस्थीतीशी जुळवून घेऊन पुढे व्हावे लागते. लवचिकता अंगात भिनवावी लागते. आज धंद्यासाठी कोणताही परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याला पैसे चारावेच लागतात, त्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, असा सार्वत्रीक अनुभव आहे. रस्त्यावर उद्योग-धंदा करणार्‍याकडून पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी पैसे खातात हे दिसतं. बाकी न दिसणार्‍या गोष्टीही बर्‍याच आहेत. प्रोटेक्शन मनी हा काय प्रकार आहे ते स्थानीक नगरसेवकाना विचारुन घ्या. सरकारी / कागदी यंत्रणेजवळ फक्त मराठीत बोललात म्हणून तुमचे काम होईल असे समजू नका (कदाचित त्यामुळे काम न होण्याचीच शक्यता जास्त). त्या व्यवस्थेला पाच-पन्नास रुपयांचे इंधन कायम पुरवीत जा. (इथे या वाक्याचा अर्थ लाच देणे असा वाटल्यास, तो तसाच समजावा!) जे आपण आज बदलू शकत नाही, त्याचा विचारही करणं सोडा. मला एक १९ वर्षांचा बबलू नावाचा तरुण माहीत आहे. जो उत्तरेतला भय्या आहे. ज्याने आत्तापर्यंत कोलकत्ता, बँगलोर, आणि मुंबई या देशातल्या तीन मोठया शहरात जाऊन वेगवेगळे धंदे केले आहेत. रस्त्यावर कुठेही धंदा मांडायला त्याला लाज आता भीतीही वाटत नाही. त्याला मुंबईतले एकूण सहा होलसेल बिझनेस माहीत आहेत. (तुम्हाला माहीती आहेत?)

मराठी माणसाने आपल्या मराठी बाण्याच्या आणि ताठ कण्याच्या गोष्टी बाजूला ठेऊन फक्त काम करायचे ठरवले तर आज जी त्याची भिकार अवस्था होत चालली आहे ती थांबण्यास मदत होईल. आता तरी कुणी अवतार घेण्याची त्याने वाट बघू नये. सरळ उद्योग-धंद्याला लागावे. नाहीतर मराठी माणसाला धंद्याला लागायला वेळ लागणार नाही !

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१०
---------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

Source : http://pravindhopat.blogspot.in/2010/02/blog-post.html
 — with Pravin Dhopat.

मल्टीनॅशनल कंपनी उभारणारा उद्योजक शेतकरी



भवरलालजी जैन यांच्या जाण्याने आपण देशातील प्रागतिक विचारांचा उद्योजक, शेतकरी गमावला आहे. भवलालजी जैन म्हटले म्हणजे जळगाव आणि त्यांची कर्मभूमी ठरलेली जैन हिल्स असे एक सूत्रच झाले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती कुठे नेऊ शकतो व त्यातून देशाला कशा प्रकारे विदेशी चलन मिळवून समृध्दी आणू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. सध्याच्या काळात शेतकरी आत्महत्या करतो आहे. खरे तर या शेतकर्‍यांपुढे सरकारने भवरलालजींचा आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे ठेवण्याची गरज आहे.

त्यांनी केलेले कृषी क्षेत्रातले काम प्रेरणादायी तर आहेच शिवाय शून्यातून शेतीतले साम्राज्य कसे उभारता येईल हे त्यांनी दाखवून दिले. जैन यांनी खानदेशासारख्या रखरखीत भागात म्हणजे आपल्या गावात राहून शेतीत ही प्रगती करुन दाखविली. कमीत कमी पाण्यात शेती करण्यासाठी ठिबक सिंचन पध्दती किती फायदेशीर आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी इस्त्रायलमध्ये जाऊन अभ्यास केला. आपल्याकडे हे तंत्रज्ञान सुधारित पध्दतीत कसे वापरले जाऊ शकेत याची आखणी केली. सरकारला हे पटवून दिले व त्यासाठी सबसिडी देण्याचा आग्रह धरला. जैन इरिगेशन ही कंपनी त्यासाठी स्थापन केली व आपल्याकडे ठिबक सिंचन पध्दतीचा पाया रचला. हे सर्व काम करणे काही सोपे नाही, परंतु भवरलालजींनी हे करुन दाखविले.

जळगाववर त्यांचे खरे प्रेम. त्यांचा जन्मही याच गावातला. त्यांनी आपल्या कंपन्या येथेच स्थापल्या, शेतीचे सर्व प्रयोग येथेच केले व ते पाहाण्यासाठी जगाला येथे आमंत्रित केले. मुळातच ते शेतकरी असल्यामुळे त्यांच्यातला शेतकरी नेहमीच जागा असे. विदेशात गेल्यावर तेथील तंत्रज्ञान आपल्या शेतकर्‍यांना कसे उपलब्ध होईल हे त्यांनी सतत पाहिले. सुरुवातीला त्यांनी शेतीला लागणार्‍या म्हणजे खते, बी-बियाणे, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स यांच्या जोडीला रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचा व्यापार केला. या उद्योगात त्यांनी चांगले पायही रोवले होते. परंतु त्यांचे मन काही यात रमेना. त्यांना शेतीतले प्रयोग करुन आपल्या शेतकर्‍यांना जागतिक पातळीवर नेण्याची खुमखुमी होती. त्यासाठी त्यांनी एकेकाळी उजाड असलेल्या व पाण्याची वानवा असलेला डोंगर घेतला. याचे नामकरण जैन हिल्स असे झाले. येथे त्यांनी शेतकर्‍यांसाठी विविध नवीन प्रयोग सुरु केले.

शेतकरी हा उद्योजकही असला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. त्यांनी हे स्वत: करुन दाखविले. कांदा निर्जलीकरणाची अन्नप्रक्रिया करून त्यांच्या गराची, रसांची, अर्काची निर्यात वाढवली. कराराच्या शेतीने क्षितिज आणखी रुंदावले. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव आधी जाहीर केला. शेतीउत्पन्नातील जुगार थांबवायला प्रत्यक्ष कृती केली. फळांची निर्यात थेट सुरू केली. उती संवर्धनाने केळी पिकाला नवसंजीवनी दिली, तर सौरबंब आणि जैन ज्योत या उत्पादनांनी सौरऊर्जेवरील उत्पादनांमध्ये नवे दालन उघडले. शेतकर्‍यांसाठी त्यांनी शास्त्रशुध्दरित्या जलसंधारण, मृद्संधारण, बांधबंदिस्ती, बंधारे, शेततळी, विहिर पुनर्भरण हे विषय प्रत्यक्ष राबवून त्यांमध्ये आश्चर्यकारक यश मिळवून दाखवले. शेतीमध्ये आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने विचार करून अद्ययावत प्रयोग शाळेची निर्मिती केली. ग्रॅण्डनैन नावाची उतीसंवर्धित केळी रोपांची नवी जात व्यापारी तत्त्वार वितरित करण्याचा पहिला मान भवरलाल जैन यांच्याकडे जातो. ताज्या पक्व केळीची निर्यात करून देशाच्या संपत्तीत मोलाची भरत तर पडते शिवाय शेतकर्‍यांच्या उत्पन्नात थेट भर पडते हे त्यांनी करुन दाखविले.

शेतावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके प्रशिक्षण आणि विस्तार केंद्र, पडिक जमिनीचा विकास, नापिक जमीन लागवडीखाली आणणे, मृदसंधारण, डोंगराळ व खडकाळ जमिनीवर लागवड करणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, जलसंधारणाचे व्यवस्थापन, खतपाणी, हरितगृहे व त्याच बरोबर सेंद्रीय आणि जैव खते तसेच जैव-कीटकनाशके हे सर्व एका छत्राखाली असलेले पाहण्यासाठी दर वर्षी किमान २५ ते ३० हजार शेतकरी ङ्गजैन उच्च तंत्र शेती संस्थानाफस भेट देतात आणि प्रेरणा घेऊन जातात.

भवरलालजींच्या उद्योगामुळे जळगावमध्ये सुमारे साडेचार हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्या या कामाची दखल केवळ देशानेच नाही तर विदेशातही घेतली गेली. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले तसेच उत्तर महाराष्ट्र, उदयपूर आणि कोकण कृषी विद्यापीठ तसेच तमीळनाडू कृषी विद्यापीठांनी भवरलालजींना सन्माननीय डी.लिट, डी.एस्सी या पदव्या दिल्या. त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचा विस्तार केवळ देशात नाही तर विदेशातही झाला. शून्यातून निर्माण होणार्‍या काही मोजक्या उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश करता येईल. जैन यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ उद्योजक नव्हते तर ते शेतकरीही होते व त्यांनी आपला उद्योग हा शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केला. हेच त्यांचे वैशिष्ट्य ठरावे.

- प्रसाद केरकर

---------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://prasadkerkar.blogspot.in/2016/03/blog-post_19.html

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’




ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...

देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.

स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्याकडे आता या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या नव्या युगात पारंपरिक रोजगारनिर्मितीबरोबरच नव्याने आकाराला येणाऱ्या उद्योगांनी रोजगारांची निर्मिती करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे. उद्योग सुरू करायचा म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर राज, विविध प्रकारचे कर, भांडवलाची कमतरता आणि गुंतवणुकीतील अडथळे तरुणांच्या वाटेतील काटे बनू नयेत, यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्नशील आहेत.

१. डोसेनिर्मितीतून करोडोंना गवसणी

केरळच्या छोट्या गावात जन्मलेला पी. एस. मुस्तफा इयत्ता सहावीमध्ये नापास झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. त्याचे वडील खूपच गरीब आणि कुटुंबात कमावणारे एकटेच होते. अशा प्रकारच्या मर्यादित आयुष्यात अभ्यास करून पुढे जाणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच असल्याची कल्पना मुस्तफाला होती. सरकारी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंग करून तो विदेशात गेला. पण, त्याचे मन तेथे त्याला स्वस्थ बसू देईना. भारतात परत येऊन त्याने आयडी या नावाने डोशांचे पीठ तयार करून विकण्यास सुरुवात केली. २००५मध्ये पीठविक्रीतून सुरू झालेला त्याचा व्यवसाय २०१४मध्ये १०० कोटींच्या घरात स्थिरावला. याविषयी बोलताना मुस्तफा म्हणतो,की 'जे काही मनात येईल, ते तडीस नेलेच पाहिजे. कारण उद्योगात उद्याचा दिवस कधीच उगवत नाही.'

२. मनात येईल ते करा..

इंजिनीअरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केलेल्या रिचा कार हिला सतत आपला काहीतरी उद्योग सुरू करावा, असे वाटत होते. पण, एकही कल्पना सुचत नव्हती. मात्र, एके दिवशी भारतीय महिलांना अंडरगारमेंट खरेदी करताना येणाऱ्या अडचणी तिने स्वतः अनुभवल्या. दुकानांमध्ये सेल्सवुमन नसणे, उपलब्ध कामगारांना योग्य साइझची माहिती नसणे आदी अडचणी येत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने महिलांच्या अंडरगारमेंटची ऑनलाइन विक्री करणाऱ्या स्टोअर जिवामेची (Zivame) स्थापना केली. त्यानंतर या उद्योगाला तिच्या आईनेच सर्वप्रथम विरोध केला. मात्र, रिचा आपल्या उद्योगाशी ठाम राहिली. आजच्या घडीला रिचा देशातील एका कंपनीची सीईओ आहे. तिच्या कंपनीला अर्थपुरवठा करण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग लागली आहे.

३. आपला मार्ग आपणच निवडावा

कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी तुम्ही जो उद्योग निवडला आहे तो योग्य आहे का किंवा त्या उद्योगाची सध्याची गरज कोणती आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. बहुतांश वेळा नव्याने काही सुरू करायचे असेल, तर आंत्रप्र्युनरशिप आणि स्टार्टअप या शब्दांचा वापर केला जातो. या दोन शब्दांमध्ये फारसा फरकही नाही. मात्र, नव्या युगाप्रमाणे बदलत्या व्यवसायाची परिभाषा समजण्यासाठी 'स्टार्टअप' या शब्दाचा वापर केला जातो. मूळातच स्टार्टअप म्हणजे अशाप्रकारचा व्यवसाय की जो एका विशिष्ट कल्पनेवर आधारीत असतो आणि ती कल्पना यापूर्वी कधीही प्रत्यक्षात आलेली नाही. समजा पुण्यातील एफ. सी. रोडवर मोठमोठी रेस्तराँ पूर्वीपासूनच आहेत. आणि गेल्या दोन दिवसांत आणखी एक रेस्तराँ तेथे उघडले, तर त्याला स्टार्टअप म्हणता येणार नाही. मात्र, एका तरुणाने असे मोबाइल अॅप बनवले, की ज्याच्या माध्यमातून एफ. सी. रोडवरील सर्व रेस्तराँमधील मेन्यू घरबसल्या पाहता येईल किंवा त्याची ऑर्डरही देता येईल, अन्य रेस्तराँच्या मेन्यूशी तुलनाही करता येईल, तेथील खाद्यपदार्थांचे रेटिंग करता येईल. अशाप्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपनीला 'स्टार्टअप' म्हणता येईल.

कोणे एकेकाळी फेसबुक आणि गुगल या कंपन्यांही 'स्टार्टअप' चा भाग होत्या. अतिशय अल्प भांडवलात सुरू केलेले हे उद्योग कमी कालावधीत कोट्यवधींना गवसणी घालण्याची हिंमत दाखवू शकतात. पारंपरिक उद्योगाच्या पद्धतींना फाटा देण्याची तयारी आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर, कोणतेही स्मार्टअप यशस्वी होऊ शकते, यात शंकाच नाही. मात्र, कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी योग्य ते नियोजन आणि भांडवलपूर्ती या बाबींवर पुरेसे काम करावेच लागते.

४. योग्य नियोचनाची आवश्यकता

स्टार्टअप प्रत्यक्षात आणण्यावर गांभीर्याने विचार करीत असाल, तर तुमच्याकडे कल्पनेची स्पष्टता असणे आवश्यक आहे. केवळ कल्पनेवर लक्ष केंद्रित न करणे हेच बहुतांश स्टार्टअप अपयशी होण्यामागील प्राथमिक कारण आहे. नियोजन करताना स्वतःला हे प्रश्न अवश्य विचारा...

५. - माझ्या कल्पनेतील उत्पादन खरंच कोणाच्या उपयोगाला येईल का? - विशिष्ट उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उद्योगाचा मला स्वतःला किती फायदा होईल? - मी प्रत्यक्षात आणू पाहणाऱ्या कल्पनेवर सध्या कुणी काम करीत आहे का? जर तसे असेल, तर माझे नियोजन त्यापेक्षा किती वेगळे आणि प्रभावी आहे? - माझी कल्पना प्रत्यक्षात आणणे खरेच शक्य आहे का? - माझी कल्पना चांगलीच आहे..पण, ती लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल? - माझी कल्पना कायदेशीर दृष्ट्या किती योग्य आहे? ती प्रत्यक्षात आणताना कायद्यांचा भंग तर होणार नाही ना? - कल्पना प्रत्यक्षात आणण्यास काहीही धोका तर नाही ना? - व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याचे मार्केटिंग करण्यासाठी येणारा खर्च कोठून भागवता येईल? - जर मूळ कल्पना यशस्वी ठरली, तर गरजेप्रमाणे ती पुढे नेणे योग्य होईल का? - मी माझी कल्पना कॉपराइट किंवा पेटंटसारख्या तत्सम साधनांतून सुरक्षित करू शकतो का? - माझी कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी कच्चा माल आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे का? - ज्या कल्पनेवर मी किंवा माझा भागीदार काम करीत आहे, त्या बाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. कुणी आम्हाला मदत करू शकेल का?

६. पुढचे टप्पे

- उद्योगाचे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर तयार करून घ्या. उद्योगाच्या सुरुवातीलाच महागड्या ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याची घाई करू नका. - उद्योगाचे तपशील उदा. नाव, ठिकाण, बाजारपेठ आणि तुमच्या क्षेत्रात आधीपासून कार्यरत कंपन्या आणि स्पर्धकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करा. - या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही काय आणि कशाप्रकारे मिळवू इच्छिता याची यादी तयार करा. त्यामुळे काही वर्षांनंतर आढावा घेताना त्याची मदतच होईल. - सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक गुंतवणूक आणि वापराची पद्धती ठरवून घ्या. - आपल्या उत्पादनाशी मिळत्याजुळत्या अन्य उत्पादनांची तुलना करा. - बाजारपेठेतील सध्याच्या ट्रेंडची माहिती करून घ्या. - ज्या बाजारपेठेवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे, त्या विषयी संपूर्ण माहिती मिळवा. त्यासाठी बाजारातील एखाद्या तज्ज्ञाची मदतही घेतली जाऊ शकते. - पेटंट, कॉपीराइट आदी कायदेशीर बाबी कोण सांभाळणार याचेही नियोजन अवश्य करा. - तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची किंमत या विषयी ब्लू प्रिंट तयार करा.

६.१ - कोणत्या बाजारपेठेला टार्गेट करायचे आहे, त्या विषयी पूर्ण तयारी करा. - उद्योगाच्या संचालक मंडळातील नावे आणि मालकी कोणाकडे राहील, याचे नियोजन आधी करायला हवे. हे नियोजन आधीच केल्यास भविष्यात उद्योग यशस्वी झाल्यानंतर निर्माण होणारे कलह आणि भांडणे यातून मुक्तता होईल. - दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उद्योगाच्या जबाबदाऱ्यांविषयी आधीच स्पष्टता नसल्याने भविष्यात प्रगतीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे कोणता भागीदार काय काम करणार या विषयी स्पष्टता हवी. ..

७. फंडिंगचा फंडा

स्टार्टअप सुरू करण्यासाठी सर्वांत कठीण काम म्हणजे त्यासाठी आवश्यक भांडवलउभारणी करणे. कारण, एकवेळ उद्योगाचे नियोजन करणे तुमच्या हातात असते; मात्र त्यासाठी आवश्यक भांडवलउभारणी करण्यासाठी खूप वेळ जातो. जी कल्पना तुम्हाला खूप फायदेशीर वाटत असेल, ती कल्पना गुंतवणूक करणाऱ्यांच्या दृष्टीने फारशी उपयोगाची नसेल. स्टार्टअपसाठी आवश्यक पैसा १. प्रायव्हेट इक्विटी किंवा एंजेल इन्व्हेस्टर २. प्रायव्हेट इक्विटी ३. व्हेंचर कॅपिटलिस्ट या तीन माध्यमांतून उभारता येऊ शकतो.

८. असे मिळेल कर्ज

- जर तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर कंपनी कायद्याप्रमाणे तुमच्या कंपनीची सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. - त्यानंतर तुम्हाला केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तुमच्याकडून पालन झाल्यानंतर तुम्हाला परवानगी मिळेल. या विषयीची संपूर्ण माहिती dcmsme.gov.in येथे उपलब्ध आहे. - एकदा परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला बँका १ कोटी रुपयांपर्यंत विनातारण कर्ज देऊ शकतात. - बँका कर्ज देताना खाते उघडताना आवश्यक औपचारिकतांव्यतिरिक्त उद्योगाच्या प्रोजेक्ट रिपोर्टची मागणी करतात. - जर कंपनी एकाच व्यक्तिकडून चालवली जात असेल, तर त्या कंपनीला वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारी पातळीवरील लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची परवानगी गरजेची असते.

९. भांडवलाचे प्रकार

- प्रायव्हेट इक्विटी किंवा एंजेल इन्व्हेस्टर : नव्या जमान्यात नवीन उद्योगाचे प्रकार पुढे आले, तसे गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये नवे प्रकार आले. प्रायव्हेट इक्विटी किंवा एंजेल इन्व्हेस्टर हा त्यातीलच एक प्रकार होय. या प्रकारात एकादी व्यक्ती अथवा उद्योगातून दुसऱ्या उद्योगात करण्यात येणारी स्ट्रॅटेजिक गुंतवणूक असते. एंजेल इन्व्हेस्टर हे बहुतांश वेळा उद्योगजगतातील मोठे उद्योगपती असतात. कोणत्याही स्टार्टअपला ते आपल्या अनुभवाच्या आधारे जोखतात आणि त्यात गुंतवणूक करतात. - प्रायव्हेट इक्विटी : अशाप्रकारचे गुंतवणूकदार पूर्वीपासूनच कार्यरत आणि नफा मिळविणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. हे गुंतवणूकदार सर्वप्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यांना केवळ उद्योगातील नफ्याशी देणेघेणे असते. बिझनेस मॉडेल आणि त्याच्या आकारमानानुसार ते गुंतवणुकीची मर्यादा निश्चित करतात. अशाप्रकारचे गुंतवणूकदार बहुतांशवेळा स्टार्टअपकडून मोठ्या शेअअरची मागणी करतात आणि पूर्ण नियंत्रण ताब्यात घ्यायला धडपडतात. किमान ६ ते दहा वर्षांची गुंतवणूक करतात. - व्हेंचर कॅपिटलिस्ट : कर्ज घेऊन उद्योग सुरू केल्यानंतर सर्व उद्योगाची जबाबदारी कर्ज घेणाऱ्यावर येऊन पडते. मात्र, व्हेंचर कॅपिटलिस्टने गुंतवणूक केली असेल, तर त्याच्याकडून तज्ज्ञाची मदत मिळण्याची शक्यता असते. कोणत्याही स्टार्टअपच्या सुरुवातीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची आवश्यकता असते. अशाप्रकारची मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक व्हेंचर कॅपिटल फर्मकडून मिळू शकते. ही गुंतवणूक साधारणपणे दशलक्ष अथवा अब्ज डॉलरमध्ये असते. फ्लिपकार्ट आणि ओला या दोन कंपन्यांमध्ये मोठमोठ्या व्हेंचर कॅपिटलिस्टनी नुकतीच मोठी गुंतवणूक केली. कोणत्याही कल्पनेला उद्योगाचे स्वरूप प्राप्त करून देण्यात व्हेंचर कॅपिटलिस्टचा मोठा हात असतो. कमीतकमी गुंतवणुकीत सुरू झालेल्या उद्योगाला मोठे स्वरूप प्राप्त करून देण्यात यांचा वाटा असतो. चार ते सात वर्षांसाठी हे गुंतवणूक करू शकतात.

९. कंपनीची नोंदणी

आपल्या देशात कंपनीची नोंदणी करण्याचे काम प्रामुख्याने केंद्रीय वाणिज्य व्यवहार मंत्रालयाकडून केले जाते. आपल्याकडे एकल कंपनी (सोल प्रोप्रायटरशिप), प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड कंपनी या तीन प्रकारात कंपनीची नोंदणी करता येते. कर्ज मिळविण्यासाठी तिन्हीपैकी एका प्रकारात नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. कंपनी कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत कंपनीसाठी किमान दोन भागीदार आणि दोन भागधारकांची आवश्यकता आहे. भागधारकांकडे कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर असू नयेत. कोणत्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करता येत नाहीत.

१०. स्टार्टअपसाठी मिळवा फंडिंग

उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलाची जितकी आवश्यकता आहे तितकीच गरज कल्पनांची असते. या पार्श्वभूमीवर देशभरात दर वर्षी काही पेड तर काही मोफत स्टार्टअप परिषदांचे आयोजन करण्यात येते. या परिषदांमध्ये उद्योगांच्या नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होते. त्यातून तरुणांना प्रोत्साहन मिळू शकते. -
- Startup Saturday : प्रत्येक आठवड्यात आयोजित ही परिषद नोकरी करून नव्याने स्टार्टअपमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. अधिक माहितीसाठी संबंधितांनी startupsaturday.headstart.in येथे संपर्क साधावा.
- TiE Events : स्टार्टअपसाठी आयोजित बैठकांचे आयोजन येथे करण्यात येते. या खूपच लोकप्रिय कट्ट्यासाठीwww.tiecon.org येथे संपर्क साधावा.
- India Angel Network Events : जगभर विखुरलेल्या भारतीय आंत्रप्र्युनरना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणारे हे नेटवर्क आहे. या नेटवर्कची एखादी बैठकही नव्याने स्टार्टअप उद्योगात उतरणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. अधिक माहितीसाटी indianangelnetwork.com येथे संपर्क करावा.
- Startup Jalsa : हा जलसा खऱ्या अर्थाने नव्या स्टार्टअपसाठी जलसा ठरू शकतो. येथे मोठमोठे मेंटॉर्स आणि उद्योगजगतातील मोठ्या व्यक्ती सातत्याने एकत्रित येतात. अधिक माहितीसाठी संपर्क : startupjalsa.com

११. 'स्टार्टअप'साठी 'आयएएस'ला रामराम

बव्हंशी काहीतरी कमाविण्यासाठी स्टार्टअपची निर्मिती केली जाते. मात्र, काही जण वेगळ्याच कारणांसाठी स्टार्टअपची मुहूर्तमेढ रोवतात. रोमन सैनी त्यातीलच एक. वयवर्षे २४. चोविसाव्या वर्षी रोमनने एम्समध्ये डॉक्टरकी करणे आणि आयएएस होण्याची किमया करून दाखवली आहे. मात्र, त्यानंतर त्याने वेगळाच पायंडा पाडला आणि 'आयएएस'ला रामराम ठोकला. त्याने मित्र गौरव मुंजालच्या मदतीने यूट्यूबर मुलांना शिकविण्यास सुरुवात केली. जी मुले डॉक्टर, कम्प्युटर प्रोग्रॅमर अथवा प्रशासकीय अधिकारी बनू पाहात आहेत; त्यांच्यासाठी या शिकविण्या आहेत. यासाठी त्यांनी Unacademy.in नामक ई-ट्यूटर प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोमनच्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांना फॉलो करणारे १० विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

- अमित मिश्रा

----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

Source :
http://maharashtratimes.indiatimes.com/lok-sabha-election-2014/edit/samwad/Start-up/election2014articleshow/50789197.cms

‘कचऱ्यातून चामडे गोळा करणारा मुलगा’ ते ‘लेदर एक्सपोर्टर’



‘स्थळ – धारावी, मुंबई. ७० फूटाच्या झोपडीमध्ये आई-वडिल आणि पाच भावंडे असे सात जणांचे कुटुंब नांदत असते. चामड्याच्या कंपन्यांबाहेर पडलेल्या कचऱ्यातून गोळा केलेले छोटे-मोठे चामड्याचे तुकडे गावोगावच्या गटई कामगारांना विकून मिळणाऱ्या पैशात घर चालत असते. चिमुरडा राजेश वडिलांचे बोट धरुन कचऱ्यातील चामडे गोळा करायला जात असतो. दिवसांमागून दिवस जात असतात. अचानक या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळते आणि घराची जबाबदारी पेलवण्याच्या जाणीवेने लहान वयातच राजेश प्रत्यक्ष व्यवसायात उतरतो. मार्गात आलेल्या साऱ्या अडचणींवर मात करत, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर माणसं जोडतो. संधी कमावतो आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत एक दिवस लेदर इण्डस्ट्रीमधला मोठा एक्सपोर्टर म्हणून नावारुपास येतो.’ एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशी ही जीवनकहाणी आहे लेदर एक्सपोर्टर राजेश खंदारे यांची.

४१ वर्षांचे राजेश आज ‘राजदीप लेदर प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सिण्ड्रेला फूटवेअर’ या दोन कंपन्यांचे मालक आहेत. राजेश वयाच्या १३-१४ व्या वर्षापासून शिक्षण सांभाळून वडिलांना व्यवसायात मदत करु लागले होते. मात्र एक-दोन वर्षातच मुंबईतील चामड्याचे कारखाने बंद होऊ लागले आणि कचऱ्यामध्ये मिळणारे चामड्याचे तुकडे मिळेनासे झाले. “१९८९-९०ला व्यवसाय बंद झाला. इतकी वर्ष याच व्यवसायावर आमचं घर चालत होतं. त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला. अशातच काही लोकांनी आम्हाला सांगितलं की चेन्नईला चामड्याचे मोठे कारखाने आहेत. तिथे तुम्हाला चामड्याचे तुकडे नक्की मिळतील. हे ऐकून मी चेन्नईला जायचं निश्चित केलं. आई-बाबा नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यावेळी त्यांनी मला २५ हजारांचं भांडवल उभं करुन दिलं. मी ते घेऊन चेन्नईला गेलो आणि तिथे मला प्रगतीचा मार्ग मिळाला,” राजेश सांगतात.

ते पुढे सांगतात, “चेन्नईला मला मुंबईच्या तुलनेत खूप स्वस्तात चामडं मिळू लागलं. मग १५-२० हजाराचा माल घेऊन मुंबईला यायचं आणि इथे आणून तो विकायचा याचा मला चस्काच लागला. हळूहळू ओळखी वाढत गेल्या, मुंबईतल्या एक्सपोर्टर्सकडूनही मोठमोठ्या शीट्सची मागणी होऊ लागली आणि मी चामड्याच्या तुकड्यांऐवजी पूर्ण चामड्याच्या शीट्स आणू लागलो. बघता बघता माझा व्यवसाय वाढत गेला. ‘राजदीप लेदर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने मी मोठ्या प्रमाणावर लेदर ट्रेडिंग करु लागलो. माझ्या प्रामाणिकपणामुळे लोकांनीही मला खूप चांगल्या संधी दिल्या आणि १९९८-९९ पर्यंत माझ्या कंपनीची वार्षिक उलाढाल १५ ते २० कोटींच्या घरात गेली.”

चेन्नई ते मुंबई मालवाहतूक करण्यासाठी राजेश यांनी स्वतःचे तीन ट्रक घेतले आणि ‘राजदीप रोडलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ट्रान्सपोर्ट कंपनी सुरु केली. “हे ट्रक मी केवळ माझ्या मालाची ने-आण करण्याकरिता वापरले. २०११ -१२ पर्यंत म्हणजे सहा-सात वर्ष मी ही ट्रान्सपोर्ट कंपनी चालवली. दरम्यान, धारावीमध्ये २५ हजार फूटाच्या जागेवर लेदर फिनिशिंगचं एक युनिट सुरु केलं. इथे चामड्यावर प्रक्रिया केली जाते. लेदर टॅनिंग, फिनिशिंग, कलरिंगची कामं या युनिटमध्ये होतात. हळूहळू बाहेरच्या देशातील कंपन्यांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली आणि मी चामडं एक्सपोर्ट करु लागलो,” असं राजेश सांगतात.

यशाचं एक एक शिखर काबीज करणाऱ्या राजेश यांनी २००७ साली कच्च्या मालाच्या ट्रेडिंगबरोबरच मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. “इण्डस्ट्रीची जसजशी ओळख होत गेली तसतसं माझ्या लक्षात आलं की कच्च्या मालाच्या ट्रेडिंगमध्ये मिळणाऱ्या मार्जिनच्या दसपट मार्जिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मिळतं. त्यामुळे मी ‘सिण्ड्रेला फूटवेअर’ नावाने स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केली. आज फूटवेअरबरोबरच आम्ही चामड्याचे बेल्ट, बॅग, लेदर ऍक्सेसरीजही बनवतो आणि एक्सपोर्ट करतो. आजघडीला जगभरात जवळपास सगळीकडे आमचा माल एक्सपोर्ट होतो,” राजेश सांगतात.

राजेश यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. “मुळात सुरुवातच गरीबीतून झाली होती. आई-वडिलांनी दिलेले २५ हजार आणि त्यांचा आशिर्वाद एवढ्या भांडवलावर चिकाटीने चेन्नईचा रस्ता धरला होता. वाटेत अडथळे खूप होते. पण मी त्यांना फार महत्त्व देत नाही. कुठलंही काम करताना वाटेत अडचणी या येणारच. अनेकदा नफ्यामध्ये असलेल्या गोष्टीही सोडून द्याव्या लागतात. अशा परिस्थितीतही प्रामाणिकपणा आणि चिकाटी ठेवणं गरजेचं असतं. या प्रवासात तुम्हाला वाईटाबरोबर चांगली माणसंही भेटत असतात. ती जोडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मलाही अशी अनेक चांगली माणसं भेटली. फूटवेअर एक्सपोर्ट करणाऱ्या एका महिलेने मला सर्वप्रथम संधी दिली. त्यानंतर मलिक एक्सपोर्ट्सचं नाव मी आवर्जून घेईन. मला भेटलेल्या चांगल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला संधी दिली. त्यामुळेच मी हे यश संपादन करु शकलो. आजही मी पैशांपेक्षा माणसं जोडण्याला, ती जपण्याला अधिक महत्त्व देतो,” राजेश सांगतात.

गरिबीतून वर आलेले राजेश आजही आपले जुने दिवस विसरलेले नाहीत. म्हणूनच आपला व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राहून ते गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. ‘संत कक्कया विकास संस्थे’चे ते सचिव आहेत. “संस्थेच्या माध्यमातून आम्ही धारावीतील ‘श्री गणेश विद्यामंदीर’ शाळेतील २५०० दलित आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवितो. संस्थेद्वारे मुलांना स्कॉलरशीप मिळवून देण्याचं आणि त्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचं माझं उद्दीष्ट आहे. धारावीमध्ये चांगली शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठीही मी गेल्या ३-४ वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. एका शाळेचं बांधकाम सध्या सुरु आहे. विविध राजकीय पक्षांबरोबरही मी काम केलेलं आहे. मात्र याचा उपयोग मी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्यासाठी केला. धारावीतील लोकांना चांगलं राहणीमान अनुभवण्याची संधी मिळावी म्हणून येत्या काळात एक कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु करुन त्या अंतर्गत त्यांच्यासाठी नेरळमध्ये ५००० घरांचं गृहसंकुल उभारण्याची योजना आहे. १५-२० लाखांमधील ही घरं असतील,” असं राजेश सांगतात.

आपल्याप्रमाणेच गरिबीतून वर येऊ इच्छिणाऱ्या मुलांना आणि एकूणच तरुण पिढीला ते मोलाचा सल्ला देतात. ते सांगतात,“कोणत्याही परिस्थितीत चिकाटी सोडू नका, खोटया आमिषाला भूलू नका, त्वरित पैसा मिळवण्याच्या मागे लागू नका, मेहनत करुन पैसा कमवण्याची तयारी ठेवा. माझ्या गरजा आजही तेवढ्याच आहेत जेवढ्या धारावीतील झोपडीत राहताना होत्या. स्वतःच्या गरजा अनाठायी वाढवू नका. केवळ पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करु नका तर त्यांच्याप्रमाणे पैसाही कमवा आणि मुख्य म्हणजे कमवलेल्या पैशाची बचत करायला शिका.”

आजकाल आसपास घडणाऱ्या घडामोडींमुळे अप्रामाणिकपणाने वागून आणि भरपूर पैसा जवळ असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही असा समज समाजामध्ये रुढ होताना दिसतोय. मात्र मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक माणूसही यशस्वी होऊ शकतो, गरिबीवर मात करु शकतो याचे राजेश खंदारे हे एक उत्तम उदाहरण आहे.

- अनुज्ञ निकम

----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://marathi.yourstory.com/read/d97cf0a695/-39-son-collector-kacaryatuna-leather-39-to-39-leather-exporter-39-a-astonishing-journey

हमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक




तो. गरीब घरातला मुलगा. वडील एका कॉफीच्या मळ्यावर हमालींचं काम करायचे. आई घर सांभाळायची. तीन लहान बहिणी. हाच सर्वांत मोठा. सहावीत असताना नापास झाला. शाळा सोडून आता तु पण कामाला लाग म्हणून त्याचे वडील त्याला कामाला घेऊन जाणार होते. पण एका शिक्षकामुळे ‘तो’ सावरला. शिक्षकाने त्याला घडविला. त्यामुळेच तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इंजिनियर झाला. इतकंच नव्हे तर आयआयएम- बंगलोर मधून एमबीए झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केलं. पण आपल्यासारखीच आपल्या गावातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लाख रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरु केली. आज त्याची आयडी फ्रेश नावाची कंपनी शंभर कोटींच्यावर उलाढाल करीत आहे. जगात काहीच शक्य नाही असा निव्वळ म्हणणाराच नव्हे तर सत्यात उतरविणारा ‘तो’ म्हणजे पीसी मुस्तफा.

केरळ मधल्या वायनड येथील चेन्नलोड हे एक छोटंसं खेडं. या गावातील अहमद हा एका कॉफीच्या मळ्यावर हमाली काम करायचा. बायको, एक मुलगा आणि तीन मुली असा एकूण अहमदचा परिवार. खेडं दुर्गम असल्याने चौथीपर्यंतच शाळा. हायस्कूलसाठी ४ किलोमीटर चालत जावं लागे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मुलं पुढे शिकायचीच नाहीत. अहमद पण चौथीपर्यंतच शिकला. आपला मुलगा मुस्तफाने तरी खूप शिकावं असं त्याला वाटे. मात्र इंग्रजी आणि हिंदीत तो अगदीच कच्चा होता. सहावीत असताना मुस्तफा नापास झाला. शिक्षण बास झालं, आता माझ्यासोबत कामाला चल. चार पैसे कमव, असं बोलून अहमद मुलाला कामावर घेऊन जाणार होता. मात्र मुस्तफाच्या शिक्षकांनी, मॅथ्थ्यू सरांनी अहमदला मुस्तफास एक संधी देण्यास सांगितले. अहमद तयार झाला. मॅथ्थ्य़ू सरांनी मुस्तफाला एकच प्रश्न विचारला. तुला नापास होऊन हमालकाम करायचं आहे की माझ्यासारखं शिकून शिक्षक व्हायचंय? मला तुमच्या सारखं शिक्षक व्हायचंय, मुस्तफा उत्तरला. या उत्तराने मुस्तफाचं आयुष्यंच बदलून गेलं.

मॅथ्थ्यू सर मुस्तफाला शाळा संपल्यानंतर सुद्धा शिकवित. त्यांच्या शिकवण्यामुळे मुस्तफा चांगलाच तयार झाला. त्याने सातवीत पहिला नंबर मिळविला. सगळेच शिक्षक अचंबित झाले. एवढंच नाही तर १० वी मध्ये सुद्धा तो संपूर्ण शाळेत पहिला आला. त्या विद्यार्थीदशेत त्याचं एकच ध्येय होतं मॅथ्थ्यू सरांसारखं बनायचं. सर त्याचे आदर्श होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुस्तफा कोझीकोडे(कालिकत) मध्ये गेला. पहिल्यांदाच गावातून शहरात तो गेला. शिक्षणासाठी पैसे नव्हते मग राहणं आणि खाणं तर दूरचीच बात. मात्र अहमदच्या मित्राने मुस्तफाची अभ्यासाप्रती तळमळ आणि गुणवत्ता पाहिली. त्याने एका धर्मादाय संस्थेच्या वसतीगृहामध्ये त्याची मोफत राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या महाविद्यालयात चार वसतीगृहे होती. तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाई. पण मुस्तफाला सकाळच्या न्याहरीसाठी एका वसतीगृहात, दुपारच्या जेवणासाठी दुसऱ्या तर रात्रीच्या जेवणासाठी तिसऱ्या वसतीगृहात जावे लागे. इतर मुलांना मुस्तफा निरुपयोगी, इतरांच्या अन्नावर जगणारा मुलगा वाटायचा. मुस्तफाने हा अपमान गिळला आणि शिक्षण पूर्ण केले. मुस्तफा संगणक विषयात अभियंता झाला. त्यासाठी दिलेल्या पात्रता परिक्षेत तो संपूर्ण राज्यात ६३ वा आला. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेतून त्याने अभियंत्याची पदवी मिळविली.
सुरुवातीला एका छोट्या कंपनीत काम केल्यानंतर मोटोरोला कंपनीने त्याला जॉब ऑफर दिली. काही दिवस बंगलोर येथे काम केल्यानंतर त्याची आयर्लंड येथे बदली झाली. आयर्लंडचा विमान प्रवास हा मुस्तफाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होय. आयर्लंड मध्ये मुस्तफाला आपल्या देशाची, येथील जेवणाची, कुटुंबाची, मित्रांची खूप आठवण येई. त्याला तिकडे जुळवून घेता आलं नाही. याचदरम्यान दुबई मधून त्याला सिटी बॅंकेची ऑफर आली आणि तो दुबईला गेला. त्यावेळेस त्याला लाखाच्या आसपास पगार होता. घरचं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवी वडलांकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम पाठवून दिली. आपल्या मुलाने एवढे सारे पाठवलेले पैसे पाहून अहमद ओक्साबोक्सी रडला. आलेल्या पैशातून त्याने सर्व देणी फेडली. मोठ्या मुलीचं लग्न देखील केलं. सन २००० मध्ये मुस्तफाचं सुद्धा लग्न झालं.

सर्व काही सुरळीत चाललेलं असताना २००३ मध्ये मात्र मुस्तफाला आपली मायभूमी खुणावत होती. त्याला आता समाजाची, आपल्या देशाची परतफेड करायची होती. आपल्या सारख्य़ा असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा होता. त्यासाठी त्याने उद्योजक बनायचं ठरविलं आणि तो दुबईहून परतला. मात्र काय उद्योग करावा हेच सुचत नव्हतं. सोबत होते बचत केलेले १५ लाख रुपये. एवढी चांगली नोकरी सोडून उद्योग करणार या मुस्तफाच्या विचाराला घरच्या सगळ्यांनीच त्याला विरोध केला. अपवाद होती फक्त मुस्तफाची बायको आणि त्याचा मामेभाऊ नासीर जो किराणामालाचं दुकान चालवायचा. दरम्यान मुस्तफाने एमबीए करण्यासाठी आयआयएम- बंगलोर मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मुस्तफाचा दुसरा एक मामेभाऊ शमसुद्दीन याने पाहिले की डोसा पिशवी मध्ये रबराने बांधून तो दुकानात विकला जातो. आपण अशाच प्रकारे डोसा बनवून विकूया असे त्याने मुस्तफाला सुचविले.

शमसुद्दीनच्या या सूचनेने मुस्तफाला अल्लाऊद्दीनचा चिराग सापडल्याचा आनंद झाला. त्याने २५ हजार रुपये गुंतवून कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नासीर, शमसुद्दीन, जाफर, नौशाद असे इतर चार मामेभाऊ आणि मुस्तफा अशा पाच जणांनी मिळून कंपनी सुरु केली. यामध्ये ५० टक्यांची भागीदारी एकट्या मुस्तफाची तर इतरांची ५० टक्के भागीदारी असे समीकरण ठरले. ५५० चौरस फुटांची जागा, २ ग्राइंडर, १ मिक्सर आणि एक सिलींग मशीन अशा अवजारांसहीत कंपनी सुरु झाली. कंपनीचं नामकरण ‘आयडी फ्रेश’ असं करण्यात आलं. आजूबाजूची २० दुकाने सुरुवातीचं लक्ष्य ठरलं. येत्या सहा महिन्यात या २० दुकानांमध्ये दररोज १०० पाकिटे गेली तर मुस्तफाने कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचे ठरविले. सुरुवातीला १० पाकिटे ठेवायचं निश्चित झालं. मात्र कोणीही दुकानदार कंपनी नवीन असल्याने पाकिट ठेवायला तयार नसत. विक्री झाल्यावरच पैसे द्या अशी शक्कल मुस्तफाच्या कंपनीने लढवली. लोकांना आयडी फ्रेशचे डोसे आणि इडली आवडल्याने मागणी वाढली. इतर दुकानांकडून मागणी आली. नवव्या महिन्यापासून दिवसाला १०० पाकिटे विकली जाऊ लागली.

पहिल्याच महिन्यात सगळा खर्च जाऊन कंपनीने ४०० रुपये नफा कमाविला. १०० पाकिटे विक्री होऊ लागल्यावर मुस्तफाने आणखी ६ लाख रुपये गुंतविले. २००० किलो क्षमतेची २००० पाकिटे दरदिवशी विकली जाऊ लागली. २००८ मध्ये मुस्तफाने आणखी ४० लाख रुपये गुंतविले. होस्कोट येथे २५०० चौरस फुटाची जागाच कंपनीने विकत घेतली. डोसा, इडली सोबत आता पराठे आणि वड्याचा देखील आयडी फ्रेश मध्ये समावेश झाला.
आज कंपनी ५० हजार किलोचं दरदिवशी उत्पादन करते. कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. ११०० कामगार कार्यरत आहेत. १० पाकिटांनी सुरु झालेली ही कंपनी आता दिवसा ५० हजार हून अधिक पाकिटांची विक्री करते. बेंगलुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरु आणि दुबई अशा महत्वाच्या शहरात ही उत्पादने उपलब्ध आहेत. येत्या ५-६ वर्षांत १ हजार कोटी रुपयांची कंपनी करण्याचा मुस्तफाचा मानस आहे. त्याचप्रमाणे ५ हजार युवकांना आपली कंपनी रोजगार देईल असा आशावाद मुस्तफाला आहे.

सहावीत नापास होऊन देखील आज १०० कोटी रुपयांची कंपनी चालविणारा एका हमालाचा मुलगा ही मुस्तफाची ओळख. परिस्थितीला दोष देत स्वत:च्या गरिबीचं समर्थन करणाऱ्या आणि यंत्रणेला दोष देणाऱ्या तरुणांसाठी मुस्तफा खऱ्या अर्थाने आदर्श ठरावा.

-प्रमोद सावंत ( Pramod Sawant )
सौजन्य : दै. मुंबई तरुण भारत, २९ एप्रिल २०१६.

----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

Source : https://www.facebook.com/prasawant/posts/10209084843907100

कोण म्हणते मराठी माणसाला उद्योग जमत नाही?



कोण म्हणते मराठी माणसाला उद्योग जमत नाही? 
मराठी उद्योजकाची ही गाथा वाचा आणि मग ठरवा !
शंतनुराव किर्लोस्कर

आधुनिक उद्योजक संस्कृतीचे प्रवर्तक व किर्लोस्कर उद्योगसमूहासह महाराष्ट्राचा औद्यागिक विकास साधणारे उद्योगमहर्षी!

१९२५-२६ दरम्यान एक महाराष्ट्रीयन तरुण मॅसेच्युसेट येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्याला परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध असतात. मात्र परदेशी जीवनाचे प्रलोभन समोर असतानाही तो तरुण आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट महाराष्ट्रातल्या गावात येतो, आणि वडिलांच्या छोट्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात करतो. तो तरुण म्हणजे शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर, आणि ते गाव म्हणजे किर्लोस्करवाडी. हेच शंतनुराव पारतंत्र्यामुळे शतकभर मागे असलेला देश, कर्मापेक्षाही नशिबावर अधिक विश्र्वास असलेल्या लोकांचा तत्कालीन महाराष्ट्र - या परिस्थितीत प्रामुख्याने महाराष्ट्रात उद्योजकतेचं रोपटं स्वत:च्या कष्टाने लावणारे महापुरुष बनले.

शेती व नोकरी या व्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचं साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणेही त्या काळात धाडसाचे होते. अशा वातावरणात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्माण करून विकण्याच्या कामास सुरुवात केली. किर्लोस्करवाडी या गावी १९०३ मध्ये जन्म झालेल्या आपल्या मुलाचे नाव लक्ष्मणरावांनी ‘शंतनु’ असे ठेवले. ‘शं तनोति इति शंतनु’ - ज्याच्या स्पर्शाने कल्याण होते तो शंतनु.

शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे; साखर निर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स ते ऑईल इंजिन्सपर्यंत; इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून ते फोर्जिंग उत्पादनांपर्यंत - अशा सर्व क्षेत्रांत, उत्पादनांना शंतनुरावांचा स्पर्श झाला आणि त्या- त्या क्षेत्राचे, क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांचे कल्याणच झाले.

त्या काळात मराठी माणसाने समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला (नाट्य, संगीत, चित्रपट) या क्षेत्रांत प्रगती साधली होती. मात्र मूळ मराठी माणसाने, महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात आघाडी घेऊन नाव कमावले आहे असे उदाहरण अस्तित्वात नव्हते. पण शंतनुरावांनी ही पोकळी भरून काढली. केवळ भरून काढली असे नव्हे, तर त्यांनी उद्योग-विकास साधत महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. १९४६ मध्ये शंतनुरावांनी किर्लोस्कर इलेक्ट्रीक कंपनी व किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड या कंपन्याची अनुक्रमे बंगळूर व पुणे येथे स्थापना केली. पुढील काळात त्यांनी किर्लोस्कर न्युमॅटिक्स; किर्लोस्कर कमिन्स, किलोस्कर ट्रॅक्टर्स, किर्लोस्कर सिस्टिम्स याही उद्योगांची स्थापना केली, विस्तार केला. जगात जिथे जिथे शेती चालते, त्या प्रत्येक खंडात, असंख्य देशांत, किर्लोस्करांचे पंप, ऑईल इंजिन्स, शेती संयंत्रे आजही वापरली जातात. आज किर्लोस्कर समूहात २५ पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. हॅबुर्ग (प. जर्मनी), मनिला र्(फिलिपाईन्स), मलेशिया, मॉरिशस आदी देशांमध्येही किर्लोस्कर समूहाचा विस्तार झालेला आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात परदेशांत कारखाने स्थापन करण्याचे अनोखे धाडसशंतनुरावांनी केले होते. आजच्या ‘मर्जर’, ‘अॅक्विझिशनच्या’ जमान्यातला लोकांनाही या धाडसाबद्दल आश्र्चर्य वाटते.

पारंपरिक शेती करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना यंत्रांचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे मोठे अवघड काम होते.शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही, तर त्यांनी ‘उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक, आधुनिक शेतीचा प्रसार’ केला.बैलांपेक्षा ट्रॅक्टर्सचे नांगर जास्त कार्यक्षम आहेत, विदेशी ऑईल इंजिन्सच्या मोठ्या धुडापेक्षा छोटी, उभी किर्लोस्कर इंजिन्स अधिक उपयुक्त आहेत, या गोष्टींचा शंतनुरावांनी प्रचार केला. तसेच शेंगा काढण्याचे यंत्र, उसाचा चरक आदींचाही त्यांनी प्रचार केला. यांत्रिक शेतीचे महत्त्व शेतकर्‍याला समजावून सांगण्यासाठी ते खेडोपाडी, घराघरांत शेती-वाडींत फिरले, शेतकर्‍यांना प्रत्यक्ष भेटले; अनेक प्रदर्शनांतून, कार्यशाळांतून, छोट्या-मोठ्या सभा-संमेलनांतून त्यांनी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतही केला. यातून शेतकर्‍याला जणू त्यांनी अश्म (दगड) युगातून यंत्र युगाकडे नेले. यातूनच देशाचे कृषी उत्पन्नही वाढले. हे सर्व करत असताना त्यांनी ‘मी समाजसेवा करतोय’ असा आव आणला नाही. तर ‘एक अद्ययावत, आधुनिक, सच्चा व्यावसायिक भाव’ त्यांच्या कार्यात होता.

कोट्यावधी रुपयांचे परदेशी चलन भारतात आणणार्‍या पहिल्या काही उद्योजकांपैकी एक म्हणजे शंतनुराव होत. जर्मनी, अमेरिका, आफ्रिका, व युरोप खंडातील काही देश-आदी देशांशी औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्यात किर्लोस्करांचा सिंहाचा वाटा आहे. ‘शेतकरी अशिक्षित असला, तरी तो अज्ञानी व मूर्ख नाही. त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या, तर तो आपली उत्पादने नक्की वापरेल, हा विश्र्वास मनामध्ये बाळगून शंतनुरावांनी आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून अनेक देश पादाक्रांत केले. १९४०-४१ च्या दरम्यान शेअर बाजारात मराठी कंपन्यांना कोणीही भाव देण्याच्या तयारीत नव्हते, पण किर्लोस्करांना ‘भाव’ मिळाला, त्या नावालाच झळाळी प्राप्त झाली.

स्वत:च्या प्रगतीबरोबरच त्यांना सेवा देणार्‍या सुमारे ५०० लघुउद्योजकांची काळजीही त्यांनी वाहिली. हे लघुउद्योजक शंतनुरावांनीच निर्माण केले व त्यांना सातत्याने काम मिळेल असे पाहिले. आपल्या उद्योगातील कामागारांसाठी त्यांनी वसाहती, गावे वसवली. त्यांच्या विकासाचा नियोजनबद्ध प्रयत्न केला. १९५२, १९७२ या वर्षीच्या दुष्काळांमध्ये महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी आपले कारखाने, उद्योग बंद केले, पण उद्योगमहर्षी शंतनुरावांनी आपल्या शेअर (समभाग) धारकांना डिव्हिडंड वाटून विश्र्वास सार्थ ठरवला, एक आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवले. पुढील ५० वर्षांत कशा प्रकारचे उद्योग अपेक्षित आहेत, आणि त्यासाठी कशा प्रकारचा प्रशिक्षित समाज घडवायला हवा याचा अंदाज शंतनुरावांनी त्या काळात बांधला होता. त्या दूरदृष्टीतूनच त्यांनी किर्लोस्करवाडी, कोएल, हरिहर, बेळगाव, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी आदर्शवत प्रकल्प निर्माण केले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शंतनुरावांनी आधुनिक, व्यावसायिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कृतीशील प्रचार महाराष्ट्रात केला आणि‘उद्योजक’ या शब्दाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

शंतनुराव केवळ आपल्या समूहाचीच भरभराट करू पाहणारे स्वार्थी उद्योजक नव्हते. ते सामाजिक व सांस्कृतिक आस्था असणारे ‘मराठी माणूस’ होते. आपण राहतो त्या शहराचा सर्वांगीण विकास साधणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे असं त्यांनी मानलं. ज्ञानप्रबोधिनी या शैक्षणिक व अन्य सामाजिक क्षेत्रांत कार्य करणार्‍या पुण्यातील संस्थेला त्यांनी सढळ हाताने मदत केली. बाळासाहेब पंतप्रतिनिधी स्मारक, राजा केळकर वस्तुसंग्रहालय या संस्थांनाही त्यांनी उभारणीसाठी सहकार्य केले. पानशेतच्या पुरामध्ये पुणे बुडाले, त्या वेळीही त्यांनी पुणे शहराला निरपेक्षतनेने सहकार्य केले. पिंपरी-चिंचवड आज एक महत्त्वाचे उद्योग केंद्र बनले आहे, ती एक श्रीमंत महानगरपालिका बनली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत औद्योगिक विकासात शंतनुरावांचा महत्त्वाचा वाटा आहे. युद्धकाळातही त्यांनी एक देशभक्त उद्योजक म्हणून देशनिष्ठेचे भान राखले. शंतनुराव हे रसिक होते. त्यांची पाश्र्चात्य संगीतावर प्रीती होती, चित्रकलेवर भक्ती होती, ते साहित्याचे अभ्यासक होते. या विविधांगी कार्याचे श्रेय त्यांनी घेतले नाही, ते प्रसिद्ध पराङमुखच राहिले. ‘कॅक्टस अँड रोझेस’ या आत्मवृत्तपर पुस्तकातून त्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी व अनुभव अभिव्यक्त केले आहेत. तसेच प्रसिद्ध लेखक श्री. सविता भावे यांनी ‘कालापुढती चार पाऊले’ या ग्रंथातून शंतनुरावांचे समग्र चरित्र वाचकांसमोर ठेवले आहे.

सुव्यवस्थित वेशभूषा, भेदक नजर, उत्कृष्ट कार्यक्षमता, एखाद्यावर विश्र्वास टाकल्यावर त्याला पूर्ण मदत करण्याचा दिलदार स्वभाव ही वैशिष्ट्ये असलेले शंतनुराव केवळ पूंजिपती नव्हते, तर संचालकांचे, हजारो कामगारांचे, लाखो समभाग धारकांचे पोशिंदे होते. खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार १९५० च्या दरम्यान करणारे ते द्रष्टे उद्योजक होते. त्यांचे कारखाने, अनेक कंपन्या, त्यांची उत्पादने, कामगार यांच्या माध्यमातून शंतनुराव आजही उज्ज्वल भारताची ग्वाही देत आहेत.

‘गरजा कमी कराव्यात’ या प्रकारची मानसिकता असताना ‘बदलत्या काळानुसार गरजा वाढवाव्यात, आणि अधिक काम करून उत्पादकता वाढवावी, पर्यायाने दरडोई उत्पन्न वाढवावे’ हा महत्त्वपूर्ण विचार शंतनुरावांनी कृतीत आणला. आध्यात्मिक भारताकडून औद्योगिक भारताकडे झालेल्या वाटचालीत शंतनुरावांचा व किर्लोस्कर उद्योग समूहाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.

----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

Source : https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=795626030546065&id=790108967764438&substory_index=0

ग्रामीण महिला उद्योजिका २०० रु.ने सुरवात आता लाखोंची उलाढाल



नुसत्या आवळा कॅन्डीपासून सुरुवात करून पुढे आवळ्याची अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने बनवत त्यांच्यातली उद्योजिक विकसित होत गेली. फक्त २०० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला त्यांचा छोटेखानी व्यवसाय बघता बघता लाखों रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला. साक्षरता अभियानातून अक्षरओळख झालेल्या जालना जिल्ह्य़ातल्या सीताबाई मोहिते यांचा मार्केटिंग फंडा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सीताबाईंचा हा प्रवास.

आज ग्रामीण भागातील अनेक अशिक्षित महिला शेतावर केवळ शेतमजूर म्हणून राबताना दिसतात तर शहरातल्या असंख्य अशिक्षित महिला मोलकरणीचे काम करत कष्टाने पोट भरतात. पण ही परिस्थिती बदलण्याचा पवित्रा जणू जालन्याच्या सीताबाई राम मोहिते यांनी घेतला. साक्षरता अभियानातून अक्षरओळख झालेल्या आणि जगाच्या शाळेतच अनुभवाने शिकलेल्या, अत्यंत ग्रामीण भागात वाढलेल्या सीताबाई राम मोहिते यांच्या कामाची घोडदौड पाहून थक्क व्हायला होतं.

सीताबाईंचे मूळ गाव जालना जिल्ह्य़ातील घोडेगाव. ग्रामीण भागात बालपण गेल्याने सीताबाईंना शाळेची पायरी चढण्याची संधीच मिळाली नाही. लग्न होऊन घोडेगावला सासरी आल्या. सासरची चार एकर शेती आणि खाणारी तोंडे अकरा. भरपूर कष्ट करून जेमतेमच भागत होते. कुटुंब वाढल्यावर चार एकर शेतीत भागणं अवघड हे सीताबाई व त्यांचे पती राम मोहिते यांनी जाणलं. आणि वेगळं काहीतरी करण्याचं स्वप्न बघितलं. तडक जवळच्या सिंधी काळेगावात जाण्याचा निर्णय घेतला. एकत्र कुटुंबातून बाहेर पडण्याच्या त्यांच्या निर्णयानं घरात वादळ निर्माण झालं. शहाण्णव कुळी मराठा समाजातल्या महिलेने गाव सोडून दुसऱ्या गावात जाणे घरच्यांना अजिबात पटेना. एवढं काय नडलंय? आहे त्यात सुखी रहावे! हा दृष्टिकोन होता. सीताबाईंची मुलगी केवळ तीन वर्षांची होती, घराबाहेर पडल्यावर तुमच्याबरोबर तिचेपण हाल होणार म्हणून तिला तुमच्याबरोबर अजिबात पाठवणार नाही असा हेका सासरच्यांनी धरला. मुलीच्या प्रेमाखातर तरी घर सोडून जाणार नाहीत हा सासरच्यांचा अंदाज साफ चुकला. जिद्दीच्या सीताबाईंनी लेकीला सासरीच ठेवून जाण्याचा निर्धार पक्का केला. मुलीला सासरी सोडून सीता-रामाची जोडी अंगावरच्या कपडय़ानिशी स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडली. तिथूनच त्यांच्या कष्टमय जीवनास सुरुवात झाली. पडेल ते काम करण्यास सुरूवात केली. शेतावर मजुरीकाम, ऊसतोडणीचे काम, माल वाहून नेण्याचे काम, अनेक अंगमेहनतीची कामे दोघेही करू लागले. त्यासाठी त्यांना दिवस पुरेना. सीताबाई रोज पहाटे उठून जवळच्या मार्केटमधून डोक्यावरून भाजी आणत व सकाळी नऊ वाजेपर्यंत भाजी विकून टाकत. त्यानंतर शेतावर कामाला जात असत. त्या वेळी त्यांना शेतात कामाची मजुरी ७ रुपये मिळत असे. केवळ मजूर म्हणून किती दिवस काम करणार? मग छोटय़ाशा जागेत त्यांनी १९९८ साली रोपवाटिका सुरू केली. फळरोपे बनवायची आणि विकायची. पण हे काम केवळ सहा महिनेच चालायचे, एरव्ही सहा महिने काय करायचे? काहीतरी नवीन वेगळे, स्वत:ची नवी ओळख देणारे करायचे होते, पण काय करावे समजत नव्हते, कारण काहीही नवीन सुरू करायला भांडवल हवे असते, तेच नेमके सीताबाईंजवळ नव्हते.

असंच एकदा एका धाब्यावर जेवताना तिथे विकायला असलेली आवळा कॅन्डी सीताबाईंच्या पसंतीस उतरली. ती कुठे बनते याची माहिती घेऊन सीताबाई पोहोचल्या थेट नांदेड जिल्ह्य़ातील लिमगाव येथे. तेथे त्यांनी आवळा कॅन्डी कशी बनवायची याचं प्रशिक्षण घेतलं. आवळा कॅन्डी कशी बनवायची ते समजले, पण भांडवल कुठे होते? सीताबाई गतस्मृतींना उजाळा देत म्हणाल्या, ‘‘केवळ २०० रुपये भांडवल वापरून पहिल्यांदा आवळा कॅन्डी बनवायला घेतली. १०० रुपये आवळे व १०० रुपयांची साखर. एवढय़ाशा भांडवलात बनलेला माल खूपच कमी होता. शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते, तेथे फ्री टेबल मिळणार कळल्यावर केवळ १-१ रुपयांची आवळा कॅन्डीची पाकिटे बनवली. एवढीशी आवळा कॅन्डी टेबलावर दिसणारसुद्धा नाही म्हणून शेतातला हरभरा, कांदे, वाळलेली बोरे, आदी गावरान मालही विकायला ठेवला. आवळा कॅन्डी बनवल्यावर जो पाक उरला होता, त्याचे सरबत ५ रुपये ग्लासप्रमाणे विकले. सगळा माल विकून झाल्यावर १२०० रुपये मिळाले. ‘कच्चा माल मातीच्या भावे, पण पक्का माल मात्र चार पटीने घ्यावे’ याची प्रचीती आली. जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कमीतकमी भांडवलातसुद्धा व्यवसाय करता येतो हे पटले.’’पहिल्याच विक्रीत मिळालेले १२०० रुपये घरखर्चाकरता न वापरता त्यांनी भांडवल म्हणून वापरले. आवळा कॅन्डीबरोबर, आवळा सुपारी, आवळा सरबत, आवळा चूर्ण, आवळा मुरंबा, आवळा ज्यूस, आवळा लोणचे, आदी पदार्थ बनवून वेगवेगळ्या प्रदर्शनांत विक्री सुरू केली. हल्लीच त्यांनी आवळा-गुलाब गुलकंद बनवलाय, व तो औषधी असल्याने लोकांच्या पसंतीस उतरलाय. अत्यंत दर्जेदार उत्पादने बनवणाऱ्या सीताबाईंच्या या उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली.

आणि त्यांनी कारखाना काढण्याचं धाडस त्यांनी केलं. बँकेकडून २५-३० लाख रुपयाचं कर्ज घेतले आणि ‘भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योगसंस्था’ उभारली. या कामात त्यांना त्यांच्या पतीचा सक्रिय पाठिंबा आहे. रोपवाटिकेचा विस्तार करून पेरू, डाळिंब, लिंबे, मोसंबी, आंबा, चिकू, अंजीर, पपई, आदी फळांची रोपे सेंद्रिय पद्धतीने बनवण्यासाठी ‘अनसुया फळ रोपवाटिका’ सुरू केली. येथे लोक ऑर्डर देऊन रोपे घेऊन जातात. पर्यावरणाचे जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या सीताबाईंनी पतीच्या मदतीने गांडूळ कल्चर, गांडूळखत व गांडूळ व्हिर्मिवॉश आदी उत्पादने बनवणारा ‘भोलेश्वर बायोअ‍ॅग्रोटेक प्रकल्प’ सुरू केलाय. त्यांच्या कामाचा आवाका आणि झपाटा पाहून आपण स्तंभित होतो. वर्षभर महाराष्ट्रभर भरणाऱ्या प्रदर्शनात सीताबाई यांच्या उत्पादनांचा स्टॉल असतोच, पण आता मोठय़ा शहरातील मॉलमध्ये किंवा मोठय़ा दुकानांमध्ये माल पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या सर्व उत्पादनांना वर्षभर टनावारी मागणी येत असते, एकामागे एक ऑर्डर पूर्ण होत असतात. त्यांच्या कारखान्यात व रोपवाटिकेत एकावेळी ३० ते ३५ मजुरांचा राबता असतो. अति मोठी ऑर्डर आल्यास आणखी काहींना हंगामी कामावर घ्यावे लागते व तरच ऑर्डर वेळेत पूर्ण करता येते.

सीताबाईंच्या यशाचे गमक त्यांच्या मार्केटिंगच्या कौशल्यात आहे. उत्पादन करणं फार अवघड नसतं पण मार्केटिंग ही प्रत्येक महिला उद्योजिकेपुढची मुख्य समस्या असते. पण सीताबाईंचा मार्केटिंगचा फंडा छोटय़ा मोठय़ा उद्योजिकांना विचार करायला लावणारा. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर मार्केटिंगचे गणित अगदी सोपे. ‘शेजाऱ्याकडून सुरुवात करा, शेजाऱ्याकडून गावाकडे, गावाकडून तालुक्याकडे, तालुक्याकडून जिल्ह्य़ाकडे, जिल्ह्य़ाकडून राज्याकडे असे मार्केटिंगचे जाळे पसरावे.’ त्या सांगतात, ‘मी जिथे जाईन तिथे माझी उत्पादने घेऊन जाते. रेल्वे, बस प्रवासात, बचत गटाच्या सभांना, हळदीकुंकवाला, अगदी लग्नकार्यातसुद्धा माझा माल विकून येते. सुरुवातीला तर मी जालना ते औरंगाबाद बसने व कधी ट्रेनने प्रवास करून बसमध्ये-ट्रेनमध्ये माल विकत असे. आपण लोकांपर्यंत गेल्याशिवाय लोकांना माल कळणार कसा? महिन्यातले काही दिवस कलेक्टर कचेरी, जिल्हा परिषदा, टेलिफोन ऑफिस, आदी मोठमोठय़ा ऑफिसांत अगदी तारखेनुसार वेळापत्रक बनवून माल विकला. त्यानंतर ऑफिसचे लोक कारखान्यात येऊन माल घेतल्यास २० टक्के सवलतीच्या दराने मिळणार याची खात्री पटताच कारखान्यात येऊन माल घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला घरोघरी जाऊन मार्केटिंग केले. दुपारच्या वेळेत महिला गप्पा मारत बसतात, तेथे जाऊन माल विकला. एका महिलेला कळले की दहा महिलांपर्यंत ती माहिती पोहोचते.

पण सीताबाईंनी आणखी एक फंडा वापरला तो उधारी वसुलीसाठीचा. बचतगटाच्या सभांमध्ये माल विकला जायचा, पण उधारी वाढू लागली. मग या वसुलीसाठी त्यांनी त्यांच्यातल्याच एका भांडखोर महिलेकडे ही जबाबदारी सोपवली. तिच्या नादी कोण लागणार या विचारानं उधारी तर वसूल होते. पण त्या भांडणामुळे दुखावलेल्या महिलांची समजूत तर घालायला पाहिजे कारण पुढची ऑर्डर मिळायला हवी मग त्या त्यांच्यातल्याच एखाद्या गोडबोल्या बाईला त्यांच्याकडे पाठवतात. आणि बिझनेस सुरू रहातो.’

कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना आज सीताबाई महाविद्यालये व उद्योजक परिषदांमध्ये ‘मार्केटिंग’, ‘उद्योगाची गुरुकिल्ली’ अशा विषयांवर आत्मविश्वासाने बोलतात. यशस्वी उद्योजकांची अनेक सूत्रे त्या बचतगटातल्या महिलांनासुद्धा सांगतात. आता तर महिन्यातले १०-१५ दिवस त्या व्याख्यानासाठी फिरतीवर असतात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. भल्याभल्या व्याख्यात्यांना जमणार नाही अशा खणखणीत आवाजात, आत्मविश्वासाने त्या आपलं म्हणणं मांडतात. ‘‘उद्योग करायचा तर वाहून घ्यावं लागतं. उद्योग करायचा तर लाज बाळगू नका, जाल तिथे उत्पादन विका, दर्जा महत्त्वाचा, दर्जा टिकवा, दर्जा वाढवला तरच किंमत वाढवा, गिऱ्हाईक सांभाळा, डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवा. उद्योगातील प्रत्येक काम शिका, प्रत्येक मशीन वापरायला शिका, उद्योजकाला प्रत्येक कामाची माहिती पाहिजे, कामगार एखादे दिवशी आले नाहीत तर उत्पादन थांबता कामा नये. सर्व कामांची सवय ठेवा. नियमितपणा, शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास, धडाडी, आदी गुणांमुळेच माझी वाटचाल प्रथम सायकल-लूना-मोटारसायकल ते बोलेरो गाडीपर्यंत झाली आहे. आणि हे कुणालाही शक्य आहे.’’
सीताबाईंच्या यशाची पावती म्हणजे २००५ साली त्यांना पहिला ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर आतापर्यंत त्यांना एकूण ७५ पुरस्कार मिळाले आहेत. पण २००७ साली मिळालेला ‘जिजामाता कृषीभूषण पुरस्कार’, २००९ सालचा मिटकॉनचा ‘महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार’, २०११ सालचा ‘दूरदर्शन सह्य़ाद्री कृषीसन्मान पुरस्कार’ यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले गेले. त्यांचे पती रामभाऊ मोहिते रोपवाटिकेचं बरेचसं काम बघतात, त्यांनासुद्धा महाराष्ट्र कृषी विभागाचा २००२ सालचा ‘शेती मित्र पुरस्कार’, २००४ सालचा ‘समता भूषण पुरस्कार’ व २००५ सालचा ‘कृषी भूषण पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं आहे.

२००९ चा महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्काराचं स्वरूप म्हणजे एक सुवर्णपदक व थायलंडची सहल असं होतं. सीताबाईंना थायलंड हा देश आहे व तो बघायला आपण जाणार हेसुद्धा माहीत नव्हतं. पण या पुरस्काराच्या प्रक्रियेदरम्यान व थायलंड सहलीमध्ये आलेल्या अनुभवांनी त्यांना खूप समृद्ध केलं. मिटकॉनतर्फे घेण्यात येत असलेल्या या पुरस्कारासाठी ७०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील १३० प्रवेशिका निवडण्यात आल्या व त्यातून मुलाखती घेऊन चार सुवर्णपदकांसाठी व चार रजतपदकांसाठी निवड होणार होती. मुलाखत म्हणजे परीक्षा असे त्यांना सांगितल्यावर ती लेखी का तोंडी हा त्यांचा पहिला प्रश्न होता. लेखी असल्यास देणार नाही, कारण लिहिता येत नाही असे त्यांनी प्रामाणिकपणे मुलाखतीच्या पॅनेलला सांगितले. त्यांचा ग्रामीण वेश, डोक्यावरून पदर पाहून इतर उद्योजिका त्यांच्याबद्दल कुजबुजत होत्या. मुलाखतीनंतर स्टेजवरून उद्योगाविषयी माहिती देण्यास सांगितली गेली. सीताबाईंनी आत्मविश्वासाने, निर्भयपणे, ग्रामीण भाषेत स्वत:चा उद्योग कसा वाढवला ते सांगितले. सगळ्या शहरी ‘हायफाय’ उद्योजिका चकित झाल्या. मनोगत संपताच आधी त्यांच्याबद्दल कुजबुजणाऱ्या स्त्रियांनी अभिनंदनाचा वर्षांव केला व निकाल जाहीर होण्याआधीच तुम्हीच खऱ्या विजेत्या असा किताब बहाल केला. पुरस्कार मिळाला, दहा दिवसांत पासपोर्ट बनवायला सांगितले. तेही दिव्य सीताबाईंनी मोठय़ा कौशल्यानं पार पाडलं. पासपोर्टसाठी जन्मतारखेचा दाखला पतीने ग्रामपंचायतीतून मिळवला. इतर कागदपत्रे गोळा केली, दिवस फारच कमी होते. सीताबाई थेट कलेक्टरना भेटल्या व त्यांचे शिफारसपत्र मिळवले. त्यांच्या विभागातल्या लोकांना नागपूरहून पासपोर्ट मिळतात, त्यामुळे नागपूरला पोहोचल्या. तेथे पासपोर्टला ४५ दिवस लागणार असं कळालं. पण सीताबाई डगमगल्या नाहीत. त्या थेट पासपोर्ट ऑफिसच्या उच्च महिला अधिकाऱ्यांना भेटल्या त्यांना अडचण समजावून सांगितली. आणि सीताबाई संध्याकाळी ५ वाजता तिथून बाहेर पडल्या ते पासपोर्ट घेऊनच.

थायलंडचा अनुभवही असाच. पर्यावरणाबाबतही सीताबाई जागरूक आहेत. सेंद्रिय पद्धतीने रोपे बनवणे, झाडे लावणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग इ. पर्यावरणपूरक कार्य चालू असते. त्यांनी केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेमुळे दरवर्षी दोन लाख लिटर पाणी जमा होते. त्यांच्या या यशाचे श्रेय त्या आपल्या पतीला देतात. पतीचा सक्रिय पाठिंबा व सहकार्याची भूमिका याचा त्यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्या सगळ्या महिलांना सांगू इच्छितात, ‘प्रत्येकाला नोकरी मिळेलच असे नाही, नोकरीत लोक रिटायर होतात, पण उद्योगात निवृत्ती नसते. नोकरी केल्याने केवळ एकच कुटुंब चालते, पण उद्योगाने १०-१५ कुटुंबे चालतात. त्यामुळे प्रत्येकीने उद्योगव्यवसायाचा विचार करावा.’

सीताबाईंकडे ना होतं शिक्षण ना पुरेसं भांडवल. पण अनुभवातून त्या शिकत गेल्या. नावीन्यपूर्ण उत्पादनं काढत गेल्या. (अलिकडेच त्यांनी आवळा दंतमंजन हे नवं उत्पादन आणलं आहे.) अपार मेहनत, चिकाटी, नवीन शिकण्याची ऊमी व आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी उद्योगाच्या रूपाने आयुष्यातला नवा अध्याय लिहिला. जो अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.

- प्रा.शैलजा सांगळे
chaturang@expressindia.com
----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=236429%3A2012-07-06-10-24-01&catid=389%3A2012-01-16-09-23-47&Itemid=393

'उद्योजक बनण्याचे बालपणीचे स्वप्न केले साकार'



परभणी - घरची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती; पण बालपणापासूनच उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले. अपार कष्ट, दुर्दम्य इच्छाशक्तीने हे स्वप्न अवघ्या पाच वर्षांत प्रत्यक्षात उतरविणाऱ्या अनिरुद्ध देशमुख या ग्रामीण युवकाचा प्रवास अचंबित करणारा आहे. 

पूर्णा (जि. परभणी) येथील नलिनी व शिवाजी देशमुख यांचा अनिरुद्ध हा मुलगा. अनिरुद्धची आई नलिनी शिवणकाम करून, मेस चालवून कुटुंबाचा गाडा कसाबसा ओढत होती. अनिरुद्ध व जान्हवी या मुलांचा सांभाळ, शिक्षण करीत अनिरुद्धने दहावीपर्यंत मौजे धनगर टाकळी येथील शाळेतून शिक्षण पूर्ण करीत परभणीच्या आयटीआयमधून 1998 मध्ये रेफ्रिजरेटर व एअर कंडिशन दुरुस्तीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरच्या बिकट परिस्थितीमुळे औरंगाबाद येथे कंपनीत नोकरी सुरू केली. त्याच वेळी नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन पदविका व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. दरम्यान 2006 ते 2010 पर्यंत पुणे येथे विविध कंपन्यांध्ये नोकरी केली; पण कायमच बालपणापासून उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनिरुद्धने वयाच्या तिसाव्या वर्षी अवघ्या चाळीस हजारांच्या गुंतवणुकीने वर्ष 2010 मध्ये ऍस्पिक थरमोप्रोसेस प्रा.लि. कंपनीची स्थापना केली. अवघ्या पाच वर्षांत त्याची उलाढाल तब्बल 13 कोटींपर्यंत गेली. विशेष म्हणजे दोन वर्षांत 16 ते 17 देशांतील मागणी पूर्ण करीत व्यवसाय सातामुद्रापलीकडे नेला.

सध्या चिंचवड (पुणे) येथील औद्योगिक परिसरातील कंपनीमध्ये 50 हून अधिक कामगार, कर्मचारी, अभियंते कार्यरत आहेत. उद्योगासाठी कुठल्याही बॅंकेकडे अथवा नातेवाईक, मित्रांकडे एकही रुपया न घेता स्वकष्टावर उद्योगाचे साम्राज्य उभे केले. त्यांच्या डेअरमी मशिनरी, फूड प्रोसेसिंग प्रोजेकेट्‌स, वॉटर प्युरिफायर उत्पादनांना प्रचंड मागणी आहे.

एका खेड्यातून थेट पुण्यापर्यंत केलेला प्रवास इतर युवकांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. विशेषतः नोकरीच्या मागे न लागता इतरांना नोकरी देण्यासाठी उद्योजक व्हावे, असे त्याने सांगितले.

स्वतःवर विश्वास असेल, जिद्द, कठोर परिश्रमाची तयारी असेल तर अशक्‍य ते शक्‍य करता येते. स्वतःला कधीच कमी लेखू नये. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील युवक उद्योजक होतो, हेच सिद्ध करावयाचे होते.

- अनिरुद्ध देशमुख
https://www.facebook.com/Aseptic-Thermoprosys-Pvt-Ltd-630983300323617/


Source : http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=4697046239705294353&SectionId=28&SectionName=ताज्या+बातम्या&NewsDate=20151127&Provider=-+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=%27उद्योजक+बनण्याचे+बालपणीचे+स्वप्न+केले+साकार%27