नुसत्या आवळा कॅन्डीपासून सुरुवात करून पुढे आवळ्याची अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने बनवत त्यांच्यातली उद्योजिक विकसित होत गेली. फक्त २०० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला त्यांचा छोटेखानी व्यवसाय बघता बघता लाखों रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला. साक्षरता अभियानातून अक्षरओळख झालेल्या जालना जिल्ह्य़ातल्या सीताबाई मोहिते यांचा मार्केटिंग फंडा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सीताबाईंचा हा प्रवास.
आज ग्रामीण भागातील अनेक अशिक्षित महिला शेतावर केवळ शेतमजूर म्हणून राबताना दिसतात तर शहरातल्या असंख्य अशिक्षित महिला मोलकरणीचे काम करत कष्टाने पोट भरतात. पण ही परिस्थिती बदलण्याचा पवित्रा जणू जालन्याच्या सीताबाई राम मोहिते यांनी घेतला. साक्षरता अभियानातून अक्षरओळख झालेल्या आणि जगाच्या शाळेतच अनुभवाने शिकलेल्या, अत्यंत ग्रामीण भागात वाढलेल्या सीताबाई राम मोहिते यांच्या कामाची घोडदौड पाहून थक्क व्हायला होतं.
सीताबाईंचे मूळ गाव जालना जिल्ह्य़ातील घोडेगाव. ग्रामीण भागात बालपण गेल्याने सीताबाईंना शाळेची पायरी चढण्याची संधीच मिळाली नाही. लग्न होऊन घोडेगावला सासरी आल्या. सासरची चार एकर शेती आणि खाणारी तोंडे अकरा. भरपूर कष्ट करून जेमतेमच भागत होते. कुटुंब वाढल्यावर चार एकर शेतीत भागणं अवघड हे सीताबाई व त्यांचे पती राम मोहिते यांनी जाणलं. आणि वेगळं काहीतरी करण्याचं स्वप्न बघितलं. तडक जवळच्या सिंधी काळेगावात जाण्याचा निर्णय घेतला. एकत्र कुटुंबातून बाहेर पडण्याच्या त्यांच्या निर्णयानं घरात वादळ निर्माण झालं. शहाण्णव कुळी मराठा समाजातल्या महिलेने गाव सोडून दुसऱ्या गावात जाणे घरच्यांना अजिबात पटेना. एवढं काय नडलंय? आहे त्यात सुखी रहावे! हा दृष्टिकोन होता. सीताबाईंची मुलगी केवळ तीन वर्षांची होती, घराबाहेर पडल्यावर तुमच्याबरोबर तिचेपण हाल होणार म्हणून तिला तुमच्याबरोबर अजिबात पाठवणार नाही असा हेका सासरच्यांनी धरला. मुलीच्या प्रेमाखातर तरी घर सोडून जाणार नाहीत हा सासरच्यांचा अंदाज साफ चुकला. जिद्दीच्या सीताबाईंनी लेकीला सासरीच ठेवून जाण्याचा निर्धार पक्का केला. मुलीला सासरी सोडून सीता-रामाची जोडी अंगावरच्या कपडय़ानिशी स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडली. तिथूनच त्यांच्या कष्टमय जीवनास सुरुवात झाली. पडेल ते काम करण्यास सुरूवात केली. शेतावर मजुरीकाम, ऊसतोडणीचे काम, माल वाहून नेण्याचे काम, अनेक अंगमेहनतीची कामे दोघेही करू लागले. त्यासाठी त्यांना दिवस पुरेना. सीताबाई रोज पहाटे उठून जवळच्या मार्केटमधून डोक्यावरून भाजी आणत व सकाळी नऊ वाजेपर्यंत भाजी विकून टाकत. त्यानंतर शेतावर कामाला जात असत. त्या वेळी त्यांना शेतात कामाची मजुरी ७ रुपये मिळत असे. केवळ मजूर म्हणून किती दिवस काम करणार? मग छोटय़ाशा जागेत त्यांनी १९९८ साली रोपवाटिका सुरू केली. फळरोपे बनवायची आणि विकायची. पण हे काम केवळ सहा महिनेच चालायचे, एरव्ही सहा महिने काय करायचे? काहीतरी नवीन वेगळे, स्वत:ची नवी ओळख देणारे करायचे होते, पण काय करावे समजत नव्हते, कारण काहीही नवीन सुरू करायला भांडवल हवे असते, तेच नेमके सीताबाईंजवळ नव्हते.
असंच एकदा एका धाब्यावर जेवताना तिथे विकायला असलेली आवळा कॅन्डी सीताबाईंच्या पसंतीस उतरली. ती कुठे बनते याची माहिती घेऊन सीताबाई पोहोचल्या थेट नांदेड जिल्ह्य़ातील लिमगाव येथे. तेथे त्यांनी आवळा कॅन्डी कशी बनवायची याचं प्रशिक्षण घेतलं. आवळा कॅन्डी कशी बनवायची ते समजले, पण भांडवल कुठे होते? सीताबाई गतस्मृतींना उजाळा देत म्हणाल्या, ‘‘केवळ २०० रुपये भांडवल वापरून पहिल्यांदा आवळा कॅन्डी बनवायला घेतली. १०० रुपये आवळे व १०० रुपयांची साखर. एवढय़ाशा भांडवलात बनलेला माल खूपच कमी होता. शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते, तेथे फ्री टेबल मिळणार कळल्यावर केवळ १-१ रुपयांची आवळा कॅन्डीची पाकिटे बनवली. एवढीशी आवळा कॅन्डी टेबलावर दिसणारसुद्धा नाही म्हणून शेतातला हरभरा, कांदे, वाळलेली बोरे, आदी गावरान मालही विकायला ठेवला. आवळा कॅन्डी बनवल्यावर जो पाक उरला होता, त्याचे सरबत ५ रुपये ग्लासप्रमाणे विकले. सगळा माल विकून झाल्यावर १२०० रुपये मिळाले. ‘कच्चा माल मातीच्या भावे, पण पक्का माल मात्र चार पटीने घ्यावे’ याची प्रचीती आली. जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कमीतकमी भांडवलातसुद्धा व्यवसाय करता येतो हे पटले.’’पहिल्याच विक्रीत मिळालेले १२०० रुपये घरखर्चाकरता न वापरता त्यांनी भांडवल म्हणून वापरले. आवळा कॅन्डीबरोबर, आवळा सुपारी, आवळा सरबत, आवळा चूर्ण, आवळा मुरंबा, आवळा ज्यूस, आवळा लोणचे, आदी पदार्थ बनवून वेगवेगळ्या प्रदर्शनांत विक्री सुरू केली. हल्लीच त्यांनी आवळा-गुलाब गुलकंद बनवलाय, व तो औषधी असल्याने लोकांच्या पसंतीस उतरलाय. अत्यंत दर्जेदार उत्पादने बनवणाऱ्या सीताबाईंच्या या उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली.
आणि त्यांनी कारखाना काढण्याचं धाडस त्यांनी केलं. बँकेकडून २५-३० लाख रुपयाचं कर्ज घेतले आणि ‘भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योगसंस्था’ उभारली. या कामात त्यांना त्यांच्या पतीचा सक्रिय पाठिंबा आहे. रोपवाटिकेचा विस्तार करून पेरू, डाळिंब, लिंबे, मोसंबी, आंबा, चिकू, अंजीर, पपई, आदी फळांची रोपे सेंद्रिय पद्धतीने बनवण्यासाठी ‘अनसुया फळ रोपवाटिका’ सुरू केली. येथे लोक ऑर्डर देऊन रोपे घेऊन जातात. पर्यावरणाचे जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या सीताबाईंनी पतीच्या मदतीने गांडूळ कल्चर, गांडूळखत व गांडूळ व्हिर्मिवॉश आदी उत्पादने बनवणारा ‘भोलेश्वर बायोअॅग्रोटेक प्रकल्प’ सुरू केलाय. त्यांच्या कामाचा आवाका आणि झपाटा पाहून आपण स्तंभित होतो. वर्षभर महाराष्ट्रभर भरणाऱ्या प्रदर्शनात सीताबाई यांच्या उत्पादनांचा स्टॉल असतोच, पण आता मोठय़ा शहरातील मॉलमध्ये किंवा मोठय़ा दुकानांमध्ये माल पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या सर्व उत्पादनांना वर्षभर टनावारी मागणी येत असते, एकामागे एक ऑर्डर पूर्ण होत असतात. त्यांच्या कारखान्यात व रोपवाटिकेत एकावेळी ३० ते ३५ मजुरांचा राबता असतो. अति मोठी ऑर्डर आल्यास आणखी काहींना हंगामी कामावर घ्यावे लागते व तरच ऑर्डर वेळेत पूर्ण करता येते.
सीताबाईंच्या यशाचे गमक त्यांच्या मार्केटिंगच्या कौशल्यात आहे. उत्पादन करणं फार अवघड नसतं पण मार्केटिंग ही प्रत्येक महिला उद्योजिकेपुढची मुख्य समस्या असते. पण सीताबाईंचा मार्केटिंगचा फंडा छोटय़ा मोठय़ा उद्योजिकांना विचार करायला लावणारा. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर मार्केटिंगचे गणित अगदी सोपे. ‘शेजाऱ्याकडून सुरुवात करा, शेजाऱ्याकडून गावाकडे, गावाकडून तालुक्याकडे, तालुक्याकडून जिल्ह्य़ाकडे, जिल्ह्य़ाकडून राज्याकडे असे मार्केटिंगचे जाळे पसरावे.’ त्या सांगतात, ‘मी जिथे जाईन तिथे माझी उत्पादने घेऊन जाते. रेल्वे, बस प्रवासात, बचत गटाच्या सभांना, हळदीकुंकवाला, अगदी लग्नकार्यातसुद्धा माझा माल विकून येते. सुरुवातीला तर मी जालना ते औरंगाबाद बसने व कधी ट्रेनने प्रवास करून बसमध्ये-ट्रेनमध्ये माल विकत असे. आपण लोकांपर्यंत गेल्याशिवाय लोकांना माल कळणार कसा? महिन्यातले काही दिवस कलेक्टर कचेरी, जिल्हा परिषदा, टेलिफोन ऑफिस, आदी मोठमोठय़ा ऑफिसांत अगदी तारखेनुसार वेळापत्रक बनवून माल विकला. त्यानंतर ऑफिसचे लोक कारखान्यात येऊन माल घेतल्यास २० टक्के सवलतीच्या दराने मिळणार याची खात्री पटताच कारखान्यात येऊन माल घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला घरोघरी जाऊन मार्केटिंग केले. दुपारच्या वेळेत महिला गप्पा मारत बसतात, तेथे जाऊन माल विकला. एका महिलेला कळले की दहा महिलांपर्यंत ती माहिती पोहोचते.
पण सीताबाईंनी आणखी एक फंडा वापरला तो उधारी वसुलीसाठीचा. बचतगटाच्या सभांमध्ये माल विकला जायचा, पण उधारी वाढू लागली. मग या वसुलीसाठी त्यांनी त्यांच्यातल्याच एका भांडखोर महिलेकडे ही जबाबदारी सोपवली. तिच्या नादी कोण लागणार या विचारानं उधारी तर वसूल होते. पण त्या भांडणामुळे दुखावलेल्या महिलांची समजूत तर घालायला पाहिजे कारण पुढची ऑर्डर मिळायला हवी मग त्या त्यांच्यातल्याच एखाद्या गोडबोल्या बाईला त्यांच्याकडे पाठवतात. आणि बिझनेस सुरू रहातो.’
कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना आज सीताबाई महाविद्यालये व उद्योजक परिषदांमध्ये ‘मार्केटिंग’, ‘उद्योगाची गुरुकिल्ली’ अशा विषयांवर आत्मविश्वासाने बोलतात. यशस्वी उद्योजकांची अनेक सूत्रे त्या बचतगटातल्या महिलांनासुद्धा सांगतात. आता तर महिन्यातले १०-१५ दिवस त्या व्याख्यानासाठी फिरतीवर असतात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. भल्याभल्या व्याख्यात्यांना जमणार नाही अशा खणखणीत आवाजात, आत्मविश्वासाने त्या आपलं म्हणणं मांडतात. ‘‘उद्योग करायचा तर वाहून घ्यावं लागतं. उद्योग करायचा तर लाज बाळगू नका, जाल तिथे उत्पादन विका, दर्जा महत्त्वाचा, दर्जा टिकवा, दर्जा वाढवला तरच किंमत वाढवा, गिऱ्हाईक सांभाळा, डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवा. उद्योगातील प्रत्येक काम शिका, प्रत्येक मशीन वापरायला शिका, उद्योजकाला प्रत्येक कामाची माहिती पाहिजे, कामगार एखादे दिवशी आले नाहीत तर उत्पादन थांबता कामा नये. सर्व कामांची सवय ठेवा. नियमितपणा, शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास, धडाडी, आदी गुणांमुळेच माझी वाटचाल प्रथम सायकल-लूना-मोटारसायकल ते बोलेरो गाडीपर्यंत झाली आहे. आणि हे कुणालाही शक्य आहे.’’
सीताबाईंच्या यशाची पावती म्हणजे २००५ साली त्यांना पहिला ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर आतापर्यंत त्यांना एकूण ७५ पुरस्कार मिळाले आहेत. पण २००७ साली मिळालेला ‘जिजामाता कृषीभूषण पुरस्कार’, २००९ सालचा मिटकॉनचा ‘महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार’, २०११ सालचा ‘दूरदर्शन सह्य़ाद्री कृषीसन्मान पुरस्कार’ यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले गेले. त्यांचे पती रामभाऊ मोहिते रोपवाटिकेचं बरेचसं काम बघतात, त्यांनासुद्धा महाराष्ट्र कृषी विभागाचा २००२ सालचा ‘शेती मित्र पुरस्कार’, २००४ सालचा ‘समता भूषण पुरस्कार’ व २००५ सालचा ‘कृषी भूषण पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं आहे.
२००९ चा महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्काराचं स्वरूप म्हणजे एक सुवर्णपदक व थायलंडची सहल असं होतं. सीताबाईंना थायलंड हा देश आहे व तो बघायला आपण जाणार हेसुद्धा माहीत नव्हतं. पण या पुरस्काराच्या प्रक्रियेदरम्यान व थायलंड सहलीमध्ये आलेल्या अनुभवांनी त्यांना खूप समृद्ध केलं. मिटकॉनतर्फे घेण्यात येत असलेल्या या पुरस्कारासाठी ७०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील १३० प्रवेशिका निवडण्यात आल्या व त्यातून मुलाखती घेऊन चार सुवर्णपदकांसाठी व चार रजतपदकांसाठी निवड होणार होती. मुलाखत म्हणजे परीक्षा असे त्यांना सांगितल्यावर ती लेखी का तोंडी हा त्यांचा पहिला प्रश्न होता. लेखी असल्यास देणार नाही, कारण लिहिता येत नाही असे त्यांनी प्रामाणिकपणे मुलाखतीच्या पॅनेलला सांगितले. त्यांचा ग्रामीण वेश, डोक्यावरून पदर पाहून इतर उद्योजिका त्यांच्याबद्दल कुजबुजत होत्या. मुलाखतीनंतर स्टेजवरून उद्योगाविषयी माहिती देण्यास सांगितली गेली. सीताबाईंनी आत्मविश्वासाने, निर्भयपणे, ग्रामीण भाषेत स्वत:चा उद्योग कसा वाढवला ते सांगितले. सगळ्या शहरी ‘हायफाय’ उद्योजिका चकित झाल्या. मनोगत संपताच आधी त्यांच्याबद्दल कुजबुजणाऱ्या स्त्रियांनी अभिनंदनाचा वर्षांव केला व निकाल जाहीर होण्याआधीच तुम्हीच खऱ्या विजेत्या असा किताब बहाल केला. पुरस्कार मिळाला, दहा दिवसांत पासपोर्ट बनवायला सांगितले. तेही दिव्य सीताबाईंनी मोठय़ा कौशल्यानं पार पाडलं. पासपोर्टसाठी जन्मतारखेचा दाखला पतीने ग्रामपंचायतीतून मिळवला. इतर कागदपत्रे गोळा केली, दिवस फारच कमी होते. सीताबाई थेट कलेक्टरना भेटल्या व त्यांचे शिफारसपत्र मिळवले. त्यांच्या विभागातल्या लोकांना नागपूरहून पासपोर्ट मिळतात, त्यामुळे नागपूरला पोहोचल्या. तेथे पासपोर्टला ४५ दिवस लागणार असं कळालं. पण सीताबाई डगमगल्या नाहीत. त्या थेट पासपोर्ट ऑफिसच्या उच्च महिला अधिकाऱ्यांना भेटल्या त्यांना अडचण समजावून सांगितली. आणि सीताबाई संध्याकाळी ५ वाजता तिथून बाहेर पडल्या ते पासपोर्ट घेऊनच.
थायलंडचा अनुभवही असाच. पर्यावरणाबाबतही सीताबाई जागरूक आहेत. सेंद्रिय पद्धतीने रोपे बनवणे, झाडे लावणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग इ. पर्यावरणपूरक कार्य चालू असते. त्यांनी केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेमुळे दरवर्षी दोन लाख लिटर पाणी जमा होते. त्यांच्या या यशाचे श्रेय त्या आपल्या पतीला देतात. पतीचा सक्रिय पाठिंबा व सहकार्याची भूमिका याचा त्यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्या सगळ्या महिलांना सांगू इच्छितात, ‘प्रत्येकाला नोकरी मिळेलच असे नाही, नोकरीत लोक रिटायर होतात, पण उद्योगात निवृत्ती नसते. नोकरी केल्याने केवळ एकच कुटुंब चालते, पण उद्योगाने १०-१५ कुटुंबे चालतात. त्यामुळे प्रत्येकीने उद्योगव्यवसायाचा विचार करावा.’
सीताबाईंकडे ना होतं शिक्षण ना पुरेसं भांडवल. पण अनुभवातून त्या शिकत गेल्या. नावीन्यपूर्ण उत्पादनं काढत गेल्या. (अलिकडेच त्यांनी आवळा दंतमंजन हे नवं उत्पादन आणलं आहे.) अपार मेहनत, चिकाटी, नवीन शिकण्याची ऊमी व आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी उद्योगाच्या रूपाने आयुष्यातला नवा अध्याय लिहिला. जो अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
- प्रा.शैलजा सांगळे
chaturang@expressindia.com
--------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/
--------------------------
Source : http://