भवरलालजी जैन यांच्या जाण्याने आपण देशातील प्रागतिक विचारांचा उद्योजक, शेतकरी गमावला आहे. भवलालजी जैन म्हटले म्हणजे जळगाव आणि त्यांची कर्मभूमी ठरलेली जैन हिल्स असे एक सूत्रच झाले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती कुठे नेऊ शकतो व त्यातून देशाला कशा प्रकारे विदेशी चलन मिळवून समृध्दी आणू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. सध्याच्या काळात शेतकरी आत्महत्या करतो आहे. खरे तर या शेतकर्यांपुढे सरकारने भवरलालजींचा आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे ठेवण्याची गरज आहे.
त्यांनी केलेले कृषी क्षेत्रातले काम प्रेरणादायी तर आहेच शिवाय शून्यातून शेतीतले साम्राज्य कसे उभारता येईल हे त्यांनी दाखवून दिले. जैन यांनी खानदेशासारख्या रखरखीत भागात म्हणजे आपल्या गावात राहून शेतीत ही प्रगती करुन दाखविली. कमीत कमी पाण्यात शेती करण्यासाठी ठिबक सिंचन पध्दती किती फायदेशीर आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी इस्त्रायलमध्ये जाऊन अभ्यास केला. आपल्याकडे हे तंत्रज्ञान सुधारित पध्दतीत कसे वापरले जाऊ शकेत याची आखणी केली. सरकारला हे पटवून दिले व त्यासाठी सबसिडी देण्याचा आग्रह धरला. जैन इरिगेशन ही कंपनी त्यासाठी स्थापन केली व आपल्याकडे ठिबक सिंचन पध्दतीचा पाया रचला. हे सर्व काम करणे काही सोपे नाही, परंतु भवरलालजींनी हे करुन दाखविले.
जळगाववर त्यांचे खरे प्रेम. त्यांचा जन्मही याच गावातला. त्यांनी आपल्या कंपन्या येथेच स्थापल्या, शेतीचे सर्व प्रयोग येथेच केले व ते पाहाण्यासाठी जगाला येथे आमंत्रित केले. मुळातच ते शेतकरी असल्यामुळे त्यांच्यातला शेतकरी नेहमीच जागा असे. विदेशात गेल्यावर तेथील तंत्रज्ञान आपल्या शेतकर्यांना कसे उपलब्ध होईल हे त्यांनी सतत पाहिले. सुरुवातीला त्यांनी शेतीला लागणार्या म्हणजे खते, बी-बियाणे, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स यांच्या जोडीला रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचा व्यापार केला. या उद्योगात त्यांनी चांगले पायही रोवले होते. परंतु त्यांचे मन काही यात रमेना. त्यांना शेतीतले प्रयोग करुन आपल्या शेतकर्यांना जागतिक पातळीवर नेण्याची खुमखुमी होती. त्यासाठी त्यांनी एकेकाळी उजाड असलेल्या व पाण्याची वानवा असलेला डोंगर घेतला. याचे नामकरण जैन हिल्स असे झाले. येथे त्यांनी शेतकर्यांसाठी विविध नवीन प्रयोग सुरु केले.
शेतकरी हा उद्योजकही असला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. त्यांनी हे स्वत: करुन दाखविले. कांदा निर्जलीकरणाची अन्नप्रक्रिया करून त्यांच्या गराची, रसांची, अर्काची निर्यात वाढवली. कराराच्या शेतीने क्षितिज आणखी रुंदावले. शेतकर्यांच्या मालाला हमीभाव आधी जाहीर केला. शेतीउत्पन्नातील जुगार थांबवायला प्रत्यक्ष कृती केली. फळांची निर्यात थेट सुरू केली. उती संवर्धनाने केळी पिकाला नवसंजीवनी दिली, तर सौरबंब आणि जैन ज्योत या उत्पादनांनी सौरऊर्जेवरील उत्पादनांमध्ये नवे दालन उघडले. शेतकर्यांसाठी त्यांनी शास्त्रशुध्दरित्या जलसंधारण, मृद्संधारण, बांधबंदिस्ती, बंधारे, शेततळी, विहिर पुनर्भरण हे विषय प्रत्यक्ष राबवून त्यांमध्ये आश्चर्यकारक यश मिळवून दाखवले. शेतीमध्ये आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने विचार करून अद्ययावत प्रयोग शाळेची निर्मिती केली. ग्रॅण्डनैन नावाची उतीसंवर्धित केळी रोपांची नवी जात व्यापारी तत्त्वार वितरित करण्याचा पहिला मान भवरलाल जैन यांच्याकडे जातो. ताज्या पक्व केळीची निर्यात करून देशाच्या संपत्तीत मोलाची भरत तर पडते शिवाय शेतकर्यांच्या उत्पन्नात थेट भर पडते हे त्यांनी करुन दाखविले.
शेतावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके प्रशिक्षण आणि विस्तार केंद्र, पडिक जमिनीचा विकास, नापिक जमीन लागवडीखाली आणणे, मृदसंधारण, डोंगराळ व खडकाळ जमिनीवर लागवड करणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, जलसंधारणाचे व्यवस्थापन, खतपाणी, हरितगृहे व त्याच बरोबर सेंद्रीय आणि जैव खते तसेच जैव-कीटकनाशके हे सर्व एका छत्राखाली असलेले पाहण्यासाठी दर वर्षी किमान २५ ते ३० हजार शेतकरी ङ्गजैन उच्च तंत्र शेती संस्थानाफस भेट देतात आणि प्रेरणा घेऊन जातात.
भवरलालजींच्या उद्योगामुळे जळगावमध्ये सुमारे साडेचार हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्या या कामाची दखल केवळ देशानेच नाही तर विदेशातही घेतली गेली. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले तसेच उत्तर महाराष्ट्र, उदयपूर आणि कोकण कृषी विद्यापीठ तसेच तमीळनाडू कृषी विद्यापीठांनी भवरलालजींना सन्माननीय डी.लिट, डी.एस्सी या पदव्या दिल्या. त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचा विस्तार केवळ देशात नाही तर विदेशातही झाला. शून्यातून निर्माण होणार्या काही मोजक्या उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश करता येईल. जैन यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ उद्योजक नव्हते तर ते शेतकरीही होते व त्यांनी आपला उद्योग हा शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केला. हेच त्यांचे वैशिष्ट्य ठरावे.
- प्रसाद केरकर
--------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/
--------------------------
Source : http://