समस्या सोडवा उद्योजक बना



स्टार्टअप म्हणजे काय ते आपण मागच्या आठवडय़ात बघितलं. पण मग स्टार्टअप नेमकं कशाला म्हणायचं? अनेक जण वेगवेगळे प्रयत्न तर करत असतातच, पण त्यातल्या कुणाच्या प्रयत्नाला स्टार्टअप म्हणायचं?
दिलशुकनगरपासून हैदराबादला जाण्यासाठी रोज बसची दीर्घकाळ वाट पाहण्याचा कंटाळा.. शिवाय टॅक्सीचा पर्याय महागडा. ही समस्या फक्त चार-पाच जणांचीच नाही तर टेकसिटीला प्रवास करणाऱ्या अनेकांची. तेव्हा रोजच्या कटकटीवर उपाय म्हणून काही तरुणांनी एकत्र येत मोबाइल एॅप्लिकेशनद्वारे सप्टेंबर २०१५ ला ‘कम्युट’ ही किफायतशीर मिनीबस शटल सíव्हस सुरू केली. पहिल्या काही दिवसांत तीन हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. बघता बघता हा पसारा वाढत गेला आणि ‘कम्युट’चा १७ बसेसचा ताफा सज्ज झाला. आज दिवसाला २५० प्रवाशांची नोंदणी आणि त्यातही ६० टक्क्यांहून अधिक स्त्री प्रवाशांचा समावेश.. ‘कम्युट’चा आलेख प्रतिदिन चढता आहे. दैनंदिन प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र त्यातील समस्या हीच संधी मानत त्याला उद्योगाचं रूप देणारं ‘कम्युट’ हे स्टार्ट अपचं प्रातिनिधिक उदाहरण.
पण स्टार्ट अपचा प्रवास नेमका सुरू कुठून होतो? अर्थातच एक चांगली कल्पना (idea) स्टार्ट अपच्या यशाचे मूळ आहे. यासाठी त्या कल्पनेवर खूप विचार करणं गरजेचं आहे. एखादी चांगली कल्पना सुचणं ही त्यातील पहिली पायरी आहे. मात्र त्यानंतर आपल्या कल्पनेत उद्योग होण्याची किती क्षमता आहे, याचा सखोल विचार स्टार्ट अप उद्योजकाने केलेला असावा. आपल्याला येता-जाता अनेक कल्पना सुचत असतात. त्यांपकी कित्येक कल्पना आपण कदाचित हसण्यावारी नेत असू किंवा त्याबद्दल थोडाफार विचारही करत असू. मात्र त्या विचाराला फारच थोडे डोकेबाज लोक पुढे घेऊन जात असतात. मात्र मुळातच ही कल्पना नेमकी सुचते कशी?
दैनंदिन समस्या –
दैनंदिन आयुष्यात अनेक लहानसहान समस्या आपल्याला दिसत असतात. त्यामुळे अनावश्यक ताण येतो, चिडचिड होते. आपल्या आजूबाजूच्या इतरांनाही तीच समस्या छळत असते. त्यावर पटकन उपाय सापडावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. ‘हे ना असं असायला हवं होतं!’ हे वाक्यही आपण बोलत असतो. मात्र त्या समस्येवर नेमका उपाय सुचत नसतो. खरं तर या समस्याच आपल्या डोक्याला ‘वैचारिक खाद्य’ पुरवतात अर्थात् एखादी चांगली कल्पना सुचवतात. मुंबईच्या प्रवासाचं उदाहरण घेऊ. ‘लोकल’ ही मुंबईची ‘लाइफलाइन.’ तिचं वेळापत्रक, तिन्ही मार्गावरचा प्रवास, स्थानकं याची माहिती देणारं छोटं पुस्तक अनेक जण यापूर्वी बाळगत होते. फक्त लोकलच नाही तर मुंबईची बससेवाही तितकीच विस्तारित आहे. बसक्रमांक, स्थानकं यांचं जाळं लक्षात ठेवणंही कठीण. काहींच्या डोक्यात असाही एक विचार आला असेल की ही सगळी माहिती एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळाली तर! त्याच दरम्यान सचिन टेके या कल्पक तरुणाने ‘एम् इंडिकेटर’ हे मोबाइल एॅप्लिकेशन सुरू केलं आणि तेच एॅप्लिकेशन पूर्ण शहराच्या प्रवासाचा ‘गाइड’ ठरलं. आज त्यात रिक्षा-टॅक्सीचं दरपत्रक, मेट्रो, मोनोरेल, फेरीबोट्स यांची वेळापत्रकं, मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, नाटक-चित्रपट, नोकरीसंदर्भातील जाहिराती इत्यादी माहिती मिळते आणि ती अद्ययावत होत असते.
दुसरं एक उदाहरण बघू या. समजा एखाद्याला शहरात स्वत:च्या मालकीचे किंवा भाडय़ाचे घर घ्यायचे आहे. मात्र त्यासाठी वणवण करायला अजिबात वेळ नाही. अशी समस्या फक्त एकटय़ाची नाही तर अनेकांची असेल. अशा वेळी घरांबद्दलची सगळी माहिती एका वेळी, एका ठिकाणी मिळायची सोय झाली तर! यावरून असे लक्षात येईल की, दैनंदिन समस्येवर उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांतून एखाद्याला स्टार्ट अप उद्योग प्रत्यक्षात आणण्याची कल्पना सुचू शकते.
यशस्वी कल्पनांची नक्कल –
प्रत्येक वेळी नवीन कल्पना सुचेल असे नाही. मग काहीजण निरीक्षणाच्या जोरावर एखाद्या प्रचलित, लोकप्रिय उद्योगाच्या कल्पनेची नक्कल करतात. काही वेळेस जशीच्या तशी कल्पना उचलली जाते. उदाहरणार्थ स्वच्छता सेवा, कारवॉश इत्यादी. ही संकल्पना परदेशी आहे. आज मॉलमध्ये फिरायला गेलं की दोन-तीन तास सहज जातात. त्याच वेळेत जर एखाद्याला त्याची गाडी स्वच्छ करून मिळाली तर कोणाला नाही आवडणार? कारण कारवॉिशगसाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. त्याचे मॉलमधील काम होईपर्यंत गाडी स्वच्छ होऊन आलेली असेल. यात त्या ग्राहकाचा आणि उद्योजकाचाही फायदाच आहे. ग्राहकांच्या वेळेची बचत होईल, त्याला सहज सेवा मिळेल आणि त्या उद्योजकाला असंख्य ग्राहक मिळतील. ‘ओला’, ‘फ्लिपकार्ट’ हे स्टार्ट अप्सदेखील ‘उबर’, ‘अ‍ॅमेझॉन’ या उद्योगांची देशी आवृत्ती म्हणता येतील. जशी मूळ कल्पनेची बिनबोभाट नक्कल केली जाते तसे त्यात काही बदलही करतात. असे बदल करताना स्थानिक बाजारपेठेनुसार, स्थानिक ग्राहकांनुसार आपल्या उद्योगात काही आवश्यक बदल करतात. यासाठी स्थानिक बाजारपेठेत पाय रोवताना त्यांना ग्राहकांना आकर्षति करण्याच्या क्लृप्त्या शोधाव्या लागतात. परदेशी बर्गर्सच्या साखळी उद्योगाची संकल्पना घेत आपल्याकडेही देशी बर्गर्सचा उद्योग सुरू झाला. उदाहरणार्थ गोली वडापावचा साखळी उद्योग. त्यात परदेशी उद्योग संरचनेनुसार आधुनिक यंत्रांचा वापर करण्यात आला. पावाऐवजी काटेकोरपणे कापलेला बन देण्यास सुरुवात झाली.
प्रचलित ट्रेंड-
सध्या आजूबाजूला जे ट्रेंड्स सुरू आहेत, त्यावरूनही एखाद्याला स्टार्ट अपची कल्पना सुचू शकेल. सध्याचा ट्रेंड आणि त्याच्या आधारे पुढच्या तीन-पाच वर्षांत काय बदल होतील, त्यासाठी आपण काय करू शकतो. जर आपण तसा उद्योग आता सुरू केला तर येत्या वर्षांत तो उद्योग कुठे असेल, त्याचे भविष्य काय असेल, याचा सखोल विचार करून एखाद्याला नवीन सुरुवात करता येईल. सध्या आपल्याकडे सेल्फीस्टिकचा ट्रेंड आहे; पण येत्या काही वर्षांत तिचं रूप कसं पालटेल? तिच्यात कोणते सोयीस्कर बदल आवश्यक आहेत? याचा विचार करून एखादा डोकेबाज त्यातून स्वत:चा उद्योग सुरू करू शकतो. उद्या कदाचित तोच उद्योजक एक नवा ट्रेंड रूढ करेल किंवा त्याच्या सुधारित उत्पादनाला अमाप लोकप्रियता लाभेल.
फक्त कल्पना सुचून चालणार नाही तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही प्रश्न विचारणंही गरजेचं आहे.
माझी कल्पना एखाद्या प्रश्नावर अपेक्षित उत्तर किंवा उपाय सुचवत आहे का?
त्या कल्पनेमुळे काही आमूलाग्र बदल होणार का?
त्या कल्पनेत मोठी झेप घेण्याची क्षमता आहे का?
गुंतवणूकदार कसे आकर्षति होतील?
उत्तम कल्पना जरी असेल तरी नफा कसा मिळेल?
माझ्या कल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे का?
मी ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कितपत सज्ज आणि झपाटलेलो आहे?
या प्रश्नांची जर सकारात्मक उत्तरं मिळाली तर नक्कीच योग्य दिशेने पावलं उचलण्याची तत्परता दाखवावी. तेव्हा भरपूर विचार करा. जे सुचतंय ते लिहून काढा. त्या कल्पनेचं सामथ्र्य ओळखा.
आज स्टार्ट अप्सना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी आवश्यक ती मदत संस्थात्मक पातळीवरून सुरू आहे. इंटरनेट तर आधुनिक मार्गदर्शकाच्या रूपाने चोवीस तास उपलब्ध आहे. अशाच काही संकेतस्थळांची यादी ज्यामुळे नवोन्मेषी उद्योजकांना माहिती आणि नेटवìकगसाठी मदत मिळेल.
chaturideas.com – तुमच्याकडे जर एखादी मस्त कल्पना असेल तर या संकेतस्थळाला भेट द्यायलाच हवी. त्यावर सातत्याने चर्चा सुरू असतात. त्यात सहभाग घेता येईल. चांगल्या कल्पनेत असलेल्या उद्योगाची संभाव्यता, क्षमता जाणून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. शिवाय ऑनलाइन स्पर्धाच्या माध्यमातून बीजभांडवल (seed capital) मिळवण्याची संधी मिळू शकते.
startups.in – या संकेतस्थळावर आपले अनुभव मांडता येतील, इतरांकडून सल्ला, काही tips मिळू शकतील. तुमचा उद्योग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळेल. शिवाय संपर्क वाढल्यास business partner मिळण्याची शक्यता वाढते.
mumbai.startups-list.com – हे संकेतस्थळ म्हणजे मुंबईतील स्टार्ट अप उद्योग, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांची ऑनलाइन डिरेक्टरीच आहे. गुंतवणूकदारांच्या यादीमुळे त्यांच्याशी थेट संपर्क करण्याची सोय आहे.
याशिवाय लिंक्डइन किंवा फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कीग साइट्सवर स्टार्ट अप ग्रुप्स (मराठीसुद्धा) तयार झाले आहेत. याचा संपर्क वाढवण्यासाठी निश्चितच फायदा होईल.

-ओंकार पिंपळे
response.lokprabha@expressindia.com
----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

तुम्ही पण चालू करा ऑनलाईन किराणा दुकान


महाराष्ट्र टाईम्स दि. २७ फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप्स म्हणजे ‘ई-कॉमर्स’ – आणि वेबसाईट व मोबाईल द्वारे वस्तू विकणे हे समीकरणं सध्या झालेल आहे. ई-कॉमर्स’ मागची तांत्रिक संकल्पना एकसारखी वाटली तरी त्यां प्रत्येकाचं बिझिनेस व रेव्हेन्यू मॉडेल हे वेगवेगळ आहे. नवनवीन वस्तू, आकर्षक ब्रॅण्ड व पॅकेजिंग, आक्रमाक व इनोव्हेटीव्ह मार्केटिंग, स्टोरेज व डिलिव्हरी आणि मोठ मोठे सेलिब्रेटिज म्हणुन ब्रॅण्ड अ‍म्बॅसेडअर्स हे प्रत्येकाचे काही ठरलेले हुकमी एक्के आहेत. या प्रत्येकाचा नीट अभ्यास होण गरजेच आहे.
किराणा सामान एक अगदीच रटाळ खरेदी – पण ही दैनंदिन आयुष्यातील एक महत्वाची आणि अटळ जबाबदारी आहे. घरगुती किराण्याचं गणित आणि त्याची यादी करून ते घरी आणण्यापर्यंतचा ‘भार’ पेलताना गृहिणीना याआधी मोठी कसरत करावी लागायची. पण आता ही जबाबदारी नुसतीच ‘हलकी’ नाही तर फारच सोपी झाली आहे. याचे कारण घरगुती किराणा ‘ऑनलाईन’ उपलब्ध झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान एका जाहिरातीत झळकताना आपल्याला दिसतोय. त्याच्या घरातील किराणा सामान संपलय आणि नवीन सामान कसं आणायचं या विचारात असताना तो सगळं सामान एका क्लिकसरशी घरी मागवतो. आठवलं का? शाहरुखच्या या जाहिरातीत दाखवलेला किराणा सामानाची ऑनलाईन सेवा पुरवणारा स्टार्ट अप म्हणजेच www.bigbasket.com.
भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन सुपरमार्केट अशी या संकेतस्थळाची ओळख आहे. सध्या पुणे, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, म्हैसूर, चेन्नई आणि दिल्ली यांसारख्या शहरात त्याची सेवा उपलब्ध असून येत्या काही काळात देशातील अन्य २७ मुख्य शहरे आणि निमशहरी भाग व्यापण्याचा ‘बिग बास्केट’चा विचार आहे.
व्ही. एस. सुधाकर, हरी मेनन, विपुल पारेख, अभिनय चौधरी आणि व्ही. एस. रमेश हे उच्चशिक्षित तरुण मित्र काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्याने एकत्र आले आणि त्यांनी १९९९ साली ‘फेबमार्ट डॉट कॉम’ या नावाने देशातील पहिल्यावहिल्या ऑनलाईन उद्योगाची सुरुवात केली. पुढे २००१ मध्ये फेबमार्टचा भाग असलेला ऑनलाईन किराणा उद्योग विभाग सुरु केला. त्यानंतर या मित्रांनी दक्षिण भारतात किरकोळ विक्री केंद्राची एक साखळी स्थापन केली. ही मात्र ऑनलाईन नव्हती तर प्रत्यक्षातील दुकाने होती. पण नंतर ती एका मोठ्या उद्योग समूहाला विकून टाकली. ‘मोअर’ या ब्रॅण्डने प्रसिद्ध झालेली बिर्ला या बलाढ्य उद्योगसमूहाची किराणा विक्रीची ही साखळीकेंद्रे मुळची ‘फेबमार्ट’चीच. मात्र ऑनलाईन किराणा विक्रीच्या संकल्पनेने झपाटून गेलेले आणि त्यावर विश्वास असलेले हे मित्र पुन्हा एकत्र आले. त्यातूनच डिसेंबर २०११ साली ‘बिग बास्केट डॉट कॉम’चा जन्म झाला.
एक हजार ब्रॅण्डच्या १४ हजारांहून अधिक उत्पादनांनी बिग बास्केटचा ‘कॅटलॉग’ भरलेला आहे. त्यात ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, मसाले, ड्रायफ्रुट, चॉकलेट, शीतपेये यांशिवाय फ्रेश मीटचाही समावेश आहे. ऑर्डर नोंदवल्यापासून काही तासाच्या आत सर्व सामान ग्राहकाच्या घरी हजर. या ‘फ्री डोअर डिलिव्हरी’मुळेच बिग बास्केटची निवड करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हकाभिमुखता, उत्पादनांचे वैविध्य आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाविन्य जपणे या त्रिसूत्रीवर ‘बिग बास्केट डॉट कॉम’चा डोलारा उभा आहे आणि त्यातच त्यांचे यश सामावले आहे. सुमारे एक हजार हातांना काम देणाऱ्या या कंपनीच्या ग्राहकांची संख्या पाच लाख इतकी आहे आणि दरमहा २० टक्के वेगाने ही संख्या वाढतच आहे. बिग बास्केटची टीम दिवसाला २० हजार ऑर्डर्स पूर्ण करते. २०१४ या वर्षात सुमारे २५० कोटींची विक्रमी उलाढाल करणाऱ्या ‘बिग बास्केट’ने भविष्यात याहून मोठे लक्ष्य आपल्यासमोर ठेवले आहे.
ऑनलाईन ऑर्डर ‘बुक’ करत घरपोच मालाची सेवा पोहोचवणे हे काम व्यापक फायदा मिळवून देणारे असले तरी त्यातील आव्हाने तितकीच मोठी आहेत. कारण या क्षेत्रातील प्रोडक्ट विशेषतः भाजीपाला, फळे ही लवकर नाशवंत पावणारी असल्याने ती ग्राहकांपर्यंत पोहोचवताना त्यांचा ताजेपणा टिकवणं, त्यांच्यावर डाग पडू न देणं यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. एकाचवेळी बास्केटमध्ये हवाबंद, बर्फात गोठवलेले, नाशवंत द्रव अशा वेगवेगळ्या पदार्थांची व्यवस्थित मांडणी करून त्याची निगा राखत वेळेवर ग्राहकांकडे पोहोचवणं हे तसे आव्हानात्मक आहे. त्यात दिरंगाई करणे म्हणजे सरळसरळ नुकसान आणि ग्राहकांची नाराजी ओढवून घेणं. हे सगळं विनासायास व्हावं म्हणून प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळावर कंपनीने विशेष भर दिला आहे.
सामानाची होमडिलिव्हरी कमीत कमी वेळेत करता यावी म्हणून कंपनीने अलीकडेच बंगळूरस्थित ‘डिलिव्हर’ हा फूड डिलिव्हरी स्टार्ट अप विकत घेतला. या क्षेत्राचे भविष्य आणि संधी लक्षात घेता अनेक गुंतवणूकदार आपले पैसे ‘बिग बास्केट’मध्ये टाकायला तयार झाले आहेत. त्याच्या आधारावर कंपनीने मोठ्या संख्येने शीतकेंद्रांची उभारणी करण्याचे नियोजन सुरु केले आहे.
आज भारतातील किरकोळ किराणा क्षेत्राची उलाढाल ३५० बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी असून ती वर्षाला १० टक्के दराने वाढते आहे. त्यापैकी ऑनलाईन किराणा उद्योगाची उलाढाल येत्या चार वर्षात १० बिलिअन अमेरिकी डॉलर्स इतकी होण्याची शक्यता आहे. आजमितीला दुध ते किराणामाल असे अनेक लोकल बनिया आणि फार्म टू किचन असे सेवापुरवठादार या क्षेत्रात असताना ग्राहकांना सर्वोत्तम आणि वेगवान सुविधा देत ‘बिग बास्केट’ने या क्षेत्रातील आघाडी टिकवून ठेवली आहे.
तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर विश्वासार्ह ठरत असलेल्या ‘बिग बास्केट डॉट कॉम’ या स्टार्ट अपचा हा ‘ऑनलाईन’ प्रवास ‘ऑफलाईन’ मार्गाने व्यवसाय करणाऱ्या किराणा दुकानदारांसाठी तसेच इतर वस्तू विकानार्यांसाठी देखील उद्बोधक असाच आहे. पण या यशाच्या सरळसोपा वाटणारा या उद्दोगाच्या मागे प्रचंड अंग मेहनत आहे हे आपण विसरता कामा नये.
- नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर.
संस्थापक, मॅक्सेल फाऊंडेशन
https://www.facebook.com/nitin.potdar.90
----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
source : http://www.myniti.com/2016/03/blog-post.html

पुणेकरांना घरपोच भाज्या पुरवणारे स्टार्टअप


खास पुणेकरांसाठी ताज्या आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या माफक दरात घरपोच उपलब्ध करुन देणारे स्टार्टअप म्हणजे 'पुणेसब्जी'. त्यामुळे पुणेकरांना आता भाजी खरेदीसाठी मंडईत किंवा बाजारात जाण्याची गरज नाही. फक्त एका क्लिकवर ताज्या आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या तसेच फळे त्यांना घरपोच मिळू शकतात. आदर्श केदारी (https://www.facebook.com/adarsh.kedari) यांनी हा स्टार्टअप सुरू केला असून, गेल्या तीन वर्षांपासून तो यशस्वीरित्या कार्यरत आहे. २०१२ साली पदवीपर्य़ंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदर्श यांनी एका कंपनीत सहा महिने कामाचा अनुभव घेतला. तेव्हादेखील कायम त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करायचा विचार घोळत होता. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडल्या. तेव्हा आदर्श यांच्या लक्षात आले की, ई-कॉमर्स क्षेत्राला खूप मोठे आणि उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांनी या क्षेत्रात व्यवसाय करण्याचे निश्चित केले. आदर्श केदारी, वृशाल कापडनीस (https://www.facebook.com/vrushal.kapadnis) आणि प्रविण पोखरकर (https://www.facebook.com/pravin.a.pokharkar), हे स्टार्टअपचे सह-संस्थापक आहेत.
एक सजग आणि जबाबदार उद्योजक या नात्याने ग्राहकांना किरकोळ आणि घाऊक माध्यमातून फळे आणि भाजीपाल्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, हे या स्टार्टअपचे ध्येय आहे. तसेच सर्वोत्तम दर्जाचा आणि ताजा भाजीपाला, फळे ग्राहकांना घरपोच उपलब्ध करुन देणे, हा या स्टार्टअपचा गाभा असल्याचे आदर्श सांगतात. मॅकेनिकल अभियांत्रिकीचे पदवीधर आदर्श हे एका बड्या ऑईल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत होते. पगारातील फक्त दहा हजार रुपयांच्या बचतीद्वारे त्यांनी पुणेसब्जी स्टार्टअप सुरू केला. पुणेसब्जीचा प्रवास २०१३ सालापासून सुरू झाल्याचे आदर्श सांगतात. भाज्यांच्या आणि फळांच्या किंमतीत पारदर्शकता राखून प्रत्येकाच्या घरोघरी मार्केट उपलब्ध करुन द्यायचे, असा विचार आदर्श यांनी केला आणि जन्म झाला तो पुणेसब्जी स्टार्टअपचा. आपला प्रवास विस्तृतपणे उलगडताना आदर्श सांगतात की, 'मला एक असा ई-प्लॅटफॉर्म सुरू करायचा होता, जो ग्राहकांना ताजे आणि सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन घरपोच उपलब्ध करुन देईल. आणि त्यातही त्या उत्पादनांच्या किंमतीत पारदर्शकता असेल तसेच त्यांना त्या उत्पादनांची खरेदीदेखील सुकर पद्धतीने करता येईल. पुणेसब्जी हा पहिला असा स्टार्टअप बनला, ज्याने शेल्फ लाईफ कमी असलेली उत्पादने (नाशवंत) ही ऑनलाईन बाजारपेठेद्वारे उपलब्ध करुन दिली. पहिल्याच महिन्यात आमच्या स्टार्टअपला एवढे यश मिळाले की, आमच्या सेवेमुळे समाधानी झालेले शंभर ग्राहक आमच्याशी आपसूकच जोडले गेले. या प्रवासादरम्यान प्रवीण पोखरकर आणि वृषाल कापडनीस जे माझ्या महाविद्यालयात शिकत होते आणि मला ज्युनियर होते, ते माझ्या या स्टार्टअपसोबत सह-संस्थापक म्हणून जोडले गेले. एक टीम म्हणून पुढचा प्रवास साकारत असताना पुणेसब्जीने कोणत्याही मोठ्या विपणन पद्धतीचा वापर केला नाही. जाहिरातीकरिता त्यांनी फक्त वर्तमानपत्राद्वारे पत्रके वाटणे, एसईओ यांचा वापर केला. मात्र त्यांना सर्वाधिक फायदा झाला तो मौखिक प्रसिद्धीचा. आमची सेवा आणि उत्पादनाचा दर्जा पाहून आमची मौखिक प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणावर होत होती. २०१३ सालापासून ते २०१४-१५ पर्य़ंत आम्ही ऑफलाईन मार्केटींगवरच अधिक प्रमाणात भर दिला होता. सुरुवातीला आम्ही बेसिक संकेतस्थळ सुरू केले, ज्यावर आम्ही कोणतीही ऑफर देत नव्हतो. फक्त भाज्यांच्या किंमती दाखवत होतो. स्थानिक भाजीविक्रेत्यांकडूनच आम्ही ग्राहकांना पुरवठा करत होतो. २०१५ साली आम्ही अद्ययावत संकेतस्थळ सुरू केले आणि ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतींने ग्राहकांच्या ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली. आमचे अकाऊंट्स, लॉजिस्टिकदेखील व्यवस्थित सुरू केले.'
या स्टार्टअपच्या उभारणीच्या काळात आलेल्या अडचणींबद्दल बोलताना आदर्श सांगतात की, 'पुणेसब्जीला सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. फळांची तसेच भाज्यांची शेल्फ लाईफ ही फार कमी असते. ज्यामुळे स्टार्टअपसाठी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत होता. मात्र आमच्या टीमने अनेक तंत्र वापरुन त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुचाकी वाहनांचे एक नेटवर्क तयार केले, ज्यामुळे उत्पादने ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येतील. या साध्या सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करुन आम्ही हजारो ग्राहकांशी जोडले गेलो.' पुणेसब्जी स्टार्टअप यशस्वी होत असताना तिन्ही संस्थापकांच्या मनात एकच प्रश्न उद्भवत होता. त्याबाबत अधिक बोलताना आदर्श सांगतात की, 'दशकांपूर्वी गुलटेकडी बाजार सुरू झाला होता, जो लाखो पुणेकरांना सेवा पुरवत होता. गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. मात्र शेतीउत्पादनाकरिता तोच आणि तेवढ्याच परिसरातील बाजार स्त्रोत होता आणि अजून काही वर्षे राहिलदेखील. हीच परिस्थिती प्रत्येक शहरात आहे. एवढा लहानसा बाजार शेतीउत्पादनाची वाढती मागणी आणि पुरवठ्याशी कशाप्रकारे झुंजत असेल?, पुरवठा साखळीत नवनव्या प्रकारची संशोधने त्या बाजारात कशाप्रकारे होत असतील?, असे प्रश्न आमच्यासमोर उभे राहिले होते. त्यामुळे एक उद्योजक म्हणून आम्ही या प्रश्नांची उत्तरे विविध पैलूंचा विचार करुन शोधत होतो. बाजार अधिक कार्यक्षम बनवण्यापेक्षा आम्ही एक ऑनलाईन बाजारपेठ बनवण्याचे ठरविले, जेथे शेतकरी, किरकोळ तसेच घाऊक व्यापारी, ई-कॉमर्स संकेतस्थळे, स्थानिक दुकाने आपल्या उत्पादनांची विक्री करू शकतात आणि ग्राहक या उत्पादनांची खरेदी करू शकतात. या व्यासपीठाकरिता आम्ही प्रयत्न करत असून, लवकरात लवकर आम्ही तो उपलब्ध करुन द्यायचा प्रयत्न करू.'
पुणेसब्जीबाबत अधिक बोलताना आदर्श सांगतात की, 'ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केटींगशिवाय आम्ही 'बिझनेस टू बिझनेस' एक्सेसदेखील सुरू केला आहे. भाज्यांचे घरपोच वितरण करण्याशिवाय आम्ही हेल्थी पुणे नावाचा एक उपक्रमदेखील हाती घेतला आहे. त्यात आम्ही काही कंपन्यांशी संपर्क साधला असून, त्यांच्या कार्य़ालयात जाऊन आम्ही तेथील कर्मचाऱ्यांना सकाळच्या नाश्त्याचे महत्व पटवून देतो. त्यापैकी काही कंपन्यांना आम्ही सकाळचा नाश्ता पुरवण्याचे काम करतो. याशिवाय आम्ही हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या काही कंपन्यांशी टायअप केले असून, त्यांनादेखील आमच्याशी जोडून घेतले आहे. एक गोष्ट विशेष, ती म्हणजे अद्यापही आमची मौखिक प्रसिद्धी होत आहे आणि आमच्या जाहिरातीत तिचा महत्वाचा वाटा आहे.' पुणेसब्जीमध्ये सध्या ११ लोक कार्यरत असल्याचे आदर्श सांगतात. पुणेसब्जीचे सध्याचे संकेतस्थळ हे मोबाईल पोर्टेबल आहे. तरीही जून-२०१६ मध्ये पुणेसब्जीचे मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात येणार असल्याचे आदर्श सांगतात.
पुणेसब्जीवरुन तुम्ही चार माध्यमातून फळे तसे भाज्यांची ऑर्डर देऊ शकता. टेलिफोनद्वारे, ई-मेलद्वारे, सोशल मिडियाद्वारे तसेच संकेतस्थळावरुन तुम्ही ऑर्डर देऊ शकता. याशिवाय पुणेसब्जी संकेतस्थळावर तुम्हाला पैसे चुकते करण्यासाठी ऑनलाईन तसेच कॅश ऑन डिलिव्हरी असे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. पुणेसब्जी संकेतस्थळावर ग्राहक फक्त उत्पादनांना घरपोच करण्याची तारीखच नाही तर वेळदेखील निश्चित करू शकतो. तसेच तीन दिवस पूर्वीदेखील एखाद्या उत्पादनाची ऑर्डर देऊन ठेऊ शकतो, असे आदर्श सांगतात. ते पुढे सांगतात की,'आम्ही उत्पादनांची खरेदी शेतकरी किंवा स्थानिक बाजारातून करतो. त्यातही आमचा कल अधिकाधिक शेतकऱ्यांकडून उत्पादने खरेदी करण्यावर असतो. एखादे उत्पादन ग्राहकांकडे पाठवण्यापूर्वी आम्ही त्याची पडताळणी करुन त्यातील सर्वोत्तम उत्पादन ग्राहकांना पाठवतो. आम्ही विविध प्रयोग करुन एक सोपी आणि स्वच्छ प्रक्रिया निर्माण केली आहे. आम्ही उत्पादनांचे पॅकिंग स्वतः करतो, ज्यात उत्पादने सुरक्षित आणि ताजीतवानी राहतात.'
आपल्या भविष्यातील योजनांबद्दल आदर्श सांगतात की, 'सध्या पुणेसब्जी हे पुण्यात सक्रीय असून, आम्हाला गर्व आहे की आम्ही पुणेकरांना आमची सेवा पुरवत आहोत. पुणेकर नागरिक हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाकरिता प्रसिद्ध आहेत आणि ते आम्हाला आमच्या सेवेबद्दल कधीच चुकीची प्रतिक्रिया देणार नाहीत. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे आम्हाला फायदा होतो. आमच्या काही चुका आम्हाला समजतात. त्यानुसार आम्ही आमच्या यंत्रणेत योग्य ते बदल करुन ती सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो. इतर शहरांमध्ये काम करण्याचा सध्यातरी आमचा विचार नाही. पुण्याकरिताच भाज्या आणि फळांची विक्री करणारी एक आदर्श वितरण साखळी आम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर इतर शहरे ही आहेतच. फक्त महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील इतर शहरांचादेखील त्यानंतर विचार करता येऊ शकतो.' अधिक माहितीकरिता तुम्ही http://www.punesubji.com/store/home या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, असे आदर्श सांगतात.
- रंजिता परब
https://www.facebook.com/parab.ranjita
----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
source : http://marathi.yourstory.com/…/pune-home-delivery-of-vegeta…

हातगाडीने सुरवात करणारा राष्ट्रीय उद्योजक




केवळ सोळाशे रुपयांची हातगाडी आणि पाच हजार रुपये ऑफिसचे डिपॉझिट भरून व्यवसायाची सुरवात करणाऱ्या भाऊसाहेब चौधरी यांची हायड्रोजन गॅस सप्लायरच्या क्षेत्रात संपूर्ण भारतात "मोनोपॉली' आहे. 
----------------------------------------
नाव : भाऊसाहेब पंढरीनाथ चौधरी
https://www.facebook.com/bhausaheb.chaudhari.7 )
वय : 41 वर्षे
शिक्षण : बी.कॉम
क्षेत्र : हायड्रोजन गॅस सप्लायर
कौटुंबिक पार्श्‍वभूमी : भाऊसाहेब चौधरी हे मध्यमवर्गीय कुटुंबातच वाढले. सध्या ते डोंबिवलीत पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. व्यवसायामुळे अनेकदा घरापासून दूर राहावे लागते, तेव्हा पत्नी घरची जबाबदारी सांभाळते.

यशाकडे वाटचाल कशी झाली?
नाशिक येथे बी. कॉमची डिग्री घेतल्यानंतर आपल्या मुलाने सर्वसामान्यांसारखी नोकरी करून संसार थाटावा, अशी घरच्यांची अपेक्षा होती. यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना नातेवाइकांकडे मुंबईत पाठविण्यात आले. शाळेत असल्यापासून व्यवसायच करायचा, असे त्यांच्या मनात होते. त्यामुळेच मुंबईत आल्यानंतरही आपल्याला कोणता व्यवसाय करता येईल, याचेच विचारचक्र सुरू असायचे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काही महिने काम केल्यानंतर त्यांनी काम बदलण्याचा निर्णय घेतला आणि बॉम्बे ऑक्‍सिजन कंपनीत नोकरी सुरू केली. त्याचवेळी याच क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले आणि अत्यंत कष्टाने चिकाटीच्या जोरावर यश मिळविलेसुद्धा. नोकरी करताना अचानक त्यांनी कंपनीची डीलरशिप घेतली आणि घरातून मिळालेल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर व एका मित्राच्या सहकार्याने डोंबिवलीत उद्योगाची सुरवात केली. तेव्हा सोळाशे रुपयांची हातगाडी आणि पाच हजार रुपये डिपॉझिटवर घेतलेले ऑफिस, हीच त्यांची डोंबिवलीतील संपत्ती होती.

ऑक्‍सिजनबरोबरच कंपन्यांना लागणारे वेगवेगळे गॅस चौधरी त्यांना उपलब्ध करून देऊ लागले. मिळालेल्या ऑर्डर्स काहीही करून वेळेत पूर्ण करायच्या, हे त्यांनी काटेकोरपणे पाळले. ऑर्डर्स मिळविण्यासाठी अनेकदा सायकलवरून प्रवास केला. कामगार उपलब्ध न झाल्यास प्रसंगी स्वत: हातगाडीवरून मालाची डिलिव्हरी पोचवली. आपल्या कामातून आणि मागणीनुसार वेळेत ऑर्डर्सप्रमाणे गॅस पुरवून त्यांनी कामावरची निष्ठा सिद्ध केली. या कालावधीत एकदा वाहतूकदारांनी चार दिवस संप केला होता; मात्र ऑर्डर्स पोचविणे गरजेचे होते. अशा वेळी हिंमत न हरता त्यांनी मित्रांच्या चार चाकी गाड्या भाड्याने घेतल्या. त्यातून गॅसची वाहतूक केली आणि कंपन्यांना गॅस वेळेपूर्वी पोचवलादेखील. या वाटचालीत घरातून आणि मित्रमैत्रिणींकडून वेळोवेळी मदत मिळाली त्यामुळेच हे यश मिळाल्याचे चौधरी सांगतात.

संघर्ष काय करावा लागला?
व्यवसायात उतरल्यानंतर सुरवातीला स्वतःचा खर्चही निघत नव्हता. यामुळे घरातून आणि मित्रमंडळींकडून व्यवसायाला विरोध झाला; मात्र त्यांनी शांतपणे व्यवसाय सावरला. आज केवळ गॅस वितरणच नव्हे, तर त्यांच्या मॉडर्न इंडस्ट्रिअल कंपनीत ऑक्‍सिजन, मेडिकल ऑक्‍सिजन आणि नायट्रोजन गॅस बनविला जातो. मुंबई आणि मुंबईतील अनेक रुग्णालयात त्यांच्या कंपनीत तयार होणारा गॅस पुरविला जातो. मुंबई आणि शहराबाहेरील 10 ते 12 डीलर्सना हे गॅसेस विकले जात आहेत. गॅसचा व्यवसाय हा अतिशय धोकादायक व्यवसाय असल्यामुळे, प्रत्येक गॅसच्या वितरणासाठी आणि हा गॅस बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या एक्‍सक्‍ल्युझिव्ह डिपार्टमेंटची परवानगी घेणे आवश्‍यक असते. हे कार्यालय नागपूरला आहे. त्यामुळे परवानगी घेण्यासाठी अनेकदा नागपूर वाऱ्या कराव्या लागल्या. सरकारी यंत्रणेकडून परवाने मिळविणे हे फार मोठे दिव्य आहे, असे ते सांगतात.

यशाची कथा
यशाचे गमक काय असे विचारल्यावर चौधरी यांनी सांगितले, " कंपन्यांसाठी वेळ अतिशय महत्त्वाचा असतो. कंपनी कामगारांना वेळेसाठी पैसा मोजत असते; अशा वेळी त्यांना वेळेत किंवा वेळेपूर्वी कच्चा माल मिळाल्यास त्यांचे आर्थिक नुकसान वाचू शकते. याचे भान ठेवून ऑर्डर्स वेळेपूर्वी किंवा वेळेत पोचविण्यावर मी अधिक भर दिला. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली."

सुरवातीला त्यांच्या कंपनीतून ऑक्‍सिजन, नायट्रोजन, मिक्‍स्चर गॅसेस, स्पेशालिटी गॅसेस, अल्ट्रा हाय प्युअरिटी गॅसेस पुरवले जात होते; पण बाजाराचा अभ्यास केला असता त्यांच्या लक्षात आले, की सर्वांत जास्त मागणी हायड्रोजन गॅसला आहे. हा गॅस वाहून नेणे अत्यंत जोखमीचे काम आहे; पण व्यवसायात यश मिळवायचे, तर हे आव्हान स्वीकारावेच लागणार होते. ते स्वीकारून 2000मध्ये मी हायड्रोजन गॅस पुरवठा करण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.'' आज मुंबईतील गोदरेज, नोसील, लिबर्टी ऑइल सर्व नामांकित कंपन्यांबरोबरच जमशेदपूर येथील टाटा कंपनी, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेशची जर्मन कंपनी यासारख्या सर्व नामांकित कंपन्यांना लागणारा हायड्रोजन गॅस चौधरी यांच्या मॉडर्न इंडस्ट्रिअल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉडर्न गॅस एजन्सी या कंपन्यांमार्फत पुरविला जातो आहे. 50 कर्मचारी, 20 वाहने आणि दोन कंपन्या असा त्यांनी आपल्या व्यवसायाचा व्याप वाढविला आहे. आज कंपनीचा टर्न ओव्हर दहा कोटींहून अधिक आहे. संपूर्ण भारतात हायड्रोजन गॅस सप्लायर म्हणून त्यांची मोनोपॉली आहे. जमदेशपूरच्या टाटा स्टील कंपनीतही मॉडर्न इंडस्ट्रिअल गॅस प्रा.लि.मधूनच गॅस पुरवठा केला जातो. आपल्या व्यवसायाचा आवाका प्रत्येक अडचणीवर मात करून वाढवायचा, हा ध्यास घेतलेल्या भाऊंनी आपले स्वप्न साकार केले असले, तरी त्यांना व्यवसायाने अपेक्षित उंची गाठली नसल्याची जाणीव आहे. गॅस पुरवठा व्यवसायात अग्रेसर होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

पुढील नियोजन काय?
आपल्या मालकीचा "गॅस हब' तयार करण्याच्या कल्पनेने त्यांना झपाटले असून मागणीनुसार सर्व प्रकारचे गॅसेस आपल्याला पुरविता यावेत, यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे. मुरबाडमध्ये मोठी जागा घेऊन या ठिकाणी "गॅस हब' तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. द्रवरूप गॅस मोठ्या प्रमाणात तयार करून तो डीलरमार्फत कंपन्यांना पुरविण्यासाठीची सक्षम यंत्रणा उभारण्याचा त्यांचा मानस आहे. यादृष्टीने त्यांनी काम सुरू केले असून व्यवसायात कितीही अडचणी आल्या, तरी त्या पार करून यश मिळवायचे यासाठीची त्यांची धडपड खरोखरच उल्लेखनीय आहे.

तरुणांना संदेश
"तरुणांनी वेळेच नियोजन आणि साध्य करण्याची जिद्द ठेवली, तर व्यवसायात यश नक्‍की मिळू शकते. यासाठी नकारात्मक भावना मनातून काढून टाकायला हवी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळतेच.''

-राजलक्ष्मी पुजारे

----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
source : http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20110924/5709280917124447062.htm

स्टीव जॉब्ज यांच्या यशाची सात मुख्य सूत्रं


स्टीव जॉब्ज इतकं यशस्वी व्हायचंय.? त्याच्याइतकं इनोव्हेटिव्ह व्हायचंय.? जगून पहायचंय त्याच्या इतकं समृद्ध आयुष्य.? मग फक्त एवढंच करा.
स्टीव जॉब्ज यांच्या यशाची सात मुख्य सूत्रं.
स्टीव जॉब्ज यांच्या यशाची खर्याु अर्थानं एकूण सात मुख्य सूत्रं आहेत. जॉब्ज यांच्या जगण्यात, त्यांनी जगलेल्या किंवा वेळोवेळी सांगितलेल्या तत्त्वज्ञानात आणि अर्थातच व्यवसायांतही हीच सूत्रं वापरली. ती सूत्रं कुणाही सामान्य माणसानं स्वीकारली आणि जगण्याचा प्रयत्न केला तर स्टीव जॉब्जने कमावलेल्या यशाच्या मार्गानं काही पाऊल टाकून पाहता येतील.
१) आवडतं तेच करा!
किती सोपं वाटतं हे वाक्य. वाटतं जो उठतो तो हेच सांगतो, जे मनाला आवडेल तेच करा.! पण हे वाक्य नुसतं ऐकणं सोपंय, वाचणं तर फारच सोपंय. पण करणं फार अवघड. एक दिवस ठरवून, स्वतला आवडेल ते, आणि फक्त तेच करण्याची हिंमत करून पाहा. स्टीव जॉब्ज सांगत की, त्यांच्या यशाची खरी ताकद हीच आहे की त्यांनी जे स्वतला आवडलं तेच केलं. आणि तेही कायम. आयुष्यभर. एकदा जॉब्जना कुणीतरी थेट आणि स्पष्टच विचारलं की, हल्लीच्या तरुण मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल, यशस्वी करिअर करायचं असेल तर काय करायला हवं.? ते म्हणाले, ‘खरं सांगू, उठा आणि हमाली करा. किंवा असं काहीतरी शोधा जे काम करण्यासाठी तुम्ही जिवाचं रान करू शकता. ते पॅशन तुम्हाला शोधता आलं तर तुमचं करिअर यशस्वी होईल. नाही तर हमाली केली तरी काही बिघडत नाही. आपल्याला जे आवडतं तेच करण्यासाठी आपल्या आवडण्यावरच निष्ठा लागते. ती नसेल तुम्ही यशस्वी होण्यासाठी वाटेतले अडथळे कसे पार करणार.?’ आवड-पॅशन आणि प्रसंगी ऑबसेशन या वाटेनं प्रवास करता आला तर त्या आवडण्याला काही अर्थ आहे.
आपल्याला जमेल हे.? का नाही. आपल्याला नक्की काय करायला आवडतं याचं उत्तर शोधणं एवढं अवघड आहे का.? अजिबात नाही. असं कोणतं काम आहे, जे ‘उद्यापासून’ नाही तर आज आत्तापासूनच करू. असं तुम्हाला वाटतं.? या प्रश्नाचं खरं उत्तर ही तुमची आवड असू शकेल.
२) जगाला ‘गरज’ कसली?
पॅशन म्हणजे रॉकेटमधलं इंधन. पण रॉकेट कोणत्या दिशेनं उड्डाण करणार.? या प्रश्नाचं उत्तर स्टीव जॉब्जनं शोधलं. त्याला स्वतला काय आवडतं हे जसं कळत होतं तसंच आपल्यासारख्याच जगातल्या इतर माणसांची गरज काय.? आज काय आहे.? भविष्यात काय आहे हेसुद्धा कळत होतं. त्याला हे कळलं होतं की, कॉम्प्युटर नावाचं हे तंत्रज्ञान माणसांचं जगणंच बदलून टाकेल. म्हणून तर ती गरज आणि बदलत्या जगण्याची मागणी लक्षात घेऊन स्टीव जॉब्जने स्वतचंच स्वप्न मोठं केलं. स्वतसह सार्याज जगासाठी एक स्वप्न पाहिलं. आपल्याला हे जमेल.?
आपल्याला काय आवडतं आणि आपल्या अवतीभोवतीची गरज काय हे आपल्याला शोधताच आलं पाहिजे. आपल्या आवडीतून आपण करत असलेलं काम माणसांच्या, समाजाच्या हिताचं कसं आहे, हे आपल्याला इतरांना पटवून देता आलं पाहिजे. आणि ते तसं असलंही पाहिजे.
३) डोक्याला ताप द्या.
फुकट, डोकं न वापरता कसं काय नवीन सुचेल.? स्टीव जॉब्जसाठी ही क्रिएटिव्हिटी म्हणजे ‘कनेक्टिंग डॉट्स’ची थिअरी. जॉब्ज असं मानत की आपल्या अनुभवातूनच आपल्याला शहाणपण येतं, फक्त ते शहाणपण योग्य ठिकाणी वापरता आलं पाहिजे. आपण जे शिकलो त्याचा योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापर करणं म्हणजेही क्रिएटिव्हिटी. जॉब्जला त्याच्या कामातूनच नाही तर अन्य गोष्टीतूनच अनेक प्रेरणा मिळाल्या. त्यानं शिकलेली कॅलिग्राफी, त्याचा विश्वातस असलेलं झेन तत्त्वज्ञान, त्याच्या अनेक भारत भेटी, त्यातले अनुभव हे सारे कोणत्या ना कोणत्या प्रॉडक्टमध्ये वापरले गेले. तो नेहमी म्हणत असे की आपण जे शिकलो त्याची संगती लावून योग्य वापर करता आला तर उत्तम क्रिएटिव्ह काम करता येऊ शकते. आपल्याला हे जमेल?
जमेल. पण त्यासाठी स्वतला माणसांशी आणि समाजाशी जोडून घ्यावं लागेल. आपल्या अवतीभोवती कसं सारंच भकास, भंगार आहे असं ज्याला वाटतं त्याला नवीन काही सुचू शकत नाही, नवा विचार करता येत नाही. कारण त्याला स्वतचं जगच नीट कळलेलं नसतं. घराबाहेर पडा. माणसांशी बोला, समजून घ्या, ऐका. पाहा नीट अवतीभोवती, प्रवास करा, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी दिसायला लागल्या तर जमेल कदाचित नवीन काही करणं.
४) स्वप्न विका, वस्तू नाही!
आपण बाजारात उभे आहोत, इथे प्रत्येक गोष्टीला पैशात किंमत आहे, आपली वस्तू आणि ग्राहक यांच्यातला दुवा म्हणजे पैसा असं वाटणं साफ चूक. स्टीव जॉब्ज नेहमी म्हणायचा, ‘जे लोक ‘अँपल’ची उत्पादनं खरेदी करतात, ते फक्त ग्राहक नसतात. ती माणसं असतात, अशी माणसं. ज्यांच्या डोळ्यात अनेक स्वप्नं आहेत, मनात महत्त्वाकांक्षा आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून ती माणसं अँपल वापरतात. त्यांचं आयुष्य समृद्ध करण्याचं एक माध्यम म्हणजे आपलं उत्पादन. ’ वस्तू विकून नफा कमवण्याइतकंच महत्त्वाचं आहे मन जिंकून माणसं जोडणं. असं स्टीव जॉब्ज वारंवार सांगत असे. आपल्याला हे जमेल?
तुम्ही ज्या माणसांसाठी काम करता, त्या माणसांच्या गरजा तुम्हाला माहिती हव्या. करायचं म्हणून काम करण्यापेक्षा आपण जे काम करतो त्यातून इतरांचं आयुष्य समृद्ध कसं होईल याचा विचार करता यायला हवा. आपला प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा.
५) १,000 गोष्टींना ‘नाही’ म्हणायला शिका.
स्टीव जॉब्ज एकदा म्हणाला होता, "I'm as proud of what we don't do as I am of what we do." म्हणजे जे काम मी केलं त्याचा जेवढा मला अभिमान आहे, तेवढाच अभिमान जी कामं मी केली नाही, ती न करण्याचाही आहे. स्टीव जॉब्जची कमिटमेण्ट त्याच्या कामाशी, त्याच्या सिम्पल, सहज वापरता येऊ शकणार्याा प्रॉडक्टशी होती. आपण काय करणार आणि काय अजिबात करणार नाही हे त्याला पं माहिती होतं म्हणून तर तो स्वतच्या कामावर फोकस करू शकला. जे केलं नाही ते मी करणारच नाही, करणारही नव्हतो, हे तो म्हणूनच अभिमानानं सांगू शकतो. कारण काय करायचं आणि काय करायचं नाही याची निवड त्यानं स्वत केली होती. आपल्याला हे जमेल.?
का नाही.? लोक काय करतात.? कुठल्या दिशेनं धावतात.? अमुक गोष्टच हल्ली चालते असा विचार करून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा जे आपल्याला आवडतं तेच आणि तसंच करण्याची हिंमत आपण दाखवू शकतो. पण प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तशी या हिमतीची आहे. त्यामुळे आपल्याला करायच्या एका कामासाठी अनेक गोष्टींना नाही म्हणावे लागेल आणि ते त्यावर ठामही रहावे लागेल.
६) मेक अ बिग डिफरन्स.
हजार गोष्टींना नाही म्हणून जर आपण एखादं काम स्वतला आवडतं म्हणून निवडत असू, तर मग ते काम करण्याचा आपला ‘अनुभव’ही तसाच रसरशीत असायला हवा. त्या कामाला आणि अनुभवाला आपल्याला भिडता यायला हवं. ते काम करण्यातला आनंद उपभोगता यायला हवा. आपण जे काम करतोय ते इतरांपेक्षा कित्येक पट वेगळं आणि सरस असायला, दिसायला हवं. स्टीव जॉब्जला हे जमलं. त्याच्या प्रत्येक प्रॉडक्टच्या वेळी जगभरच्या लोकांना ही उत्सुकता असायची की आता हा वेगळं, नवीन काय घेऊन येतोय. पुन्हा दर्जा आणि कमावलली विश्वाेसार्हता ही आणखी एक त्याची जमेची बाजू. आपल्याला हे जमेल.?
तुम्ही जे काम करता, ते सर्वोत्तम तर असायलाच हवं. पण तुम्ही ज्यांच्यासाठी करता त्यांनाही ते सर्वोत्तमच वाटायला हवं. तुमचं काम हा त्यांच्यासाठी प्रत्येकवेळी एक नवा, समृद्ध अनुभव ठरायला हवा.
७) छा जाओ.! वाजवा तुमचं खणखणीत नाणं.!
तुम्ही मरमर मेहनत करता, तुमच्या डोक्यातून वारेमाप सुपीक आयडिया निघतात, त्याचा काहीच उपयोग नाही.! कधी.? जर तुम्हाला ती आयडिया नीट प्रेझेण्ट करता आली नाही. स्वतचं महत्त्व इतरांना पटवून देता आलं नाही. आपण जे काम करतो, त्यासाठीचा घसघशीत नफा कमावता आला नाही आणि जे कमावलंय ते पुन्हा योग्य रीतीने जगासमोर मांडता आलं नाही तर तुमच्या ढोर मेहनतीला काही अर्थ नाही. स्टीव जॉब्ज हा जगातला ग्रेटेस्ट कार्पोरेट स्टोरीटेलर म्हणायला हवा. त्यानं केलेलं प्रत्येक काम हे त्यानं तितक्याच इनोव्हेटिव्हपणे जगासमोर मांडलं. म्हणून तर त्याची एक इमेज जगभरातल्या माणसांच्या मनात तयार झाली. आपल्याला हे जमेल.?
का नाही.? फक्त त्यासाठी आपला नव्या तंत्रावर हात हवा. प्रेझेण्टेशन स्किल्स शिकून घ्यायला हवी. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक गोष्टी प्रभावीपणे सांगता यायला हव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा विचार डोक्यातून काढून टाकायला हवा की माझ्या कामाचं मार्केटिंग मीच काय करायचं.? ते तुम्ही केलं नाही तर तुमच्यासाठी दुसरा कुणीच ते कधीच करणार नाही. आपण काय आहोत, हे जगाला उत्तमरीतीने सांगता यायलाच हवं.

Source : https://www.facebook.com/pcmchomes/posts/1000980943273486:0

सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष


नाव - अरुणाचलम् मुरुगनंतम्. वय - ५२ वर्षं. राहणार - पप्पनैकेनपुदुर, कोईमतूर, तमीळनाडू.
‘जगातल्या शंभर सर्वांत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक’ असा 'टाईम मॅगझिन'नं ज्यांचा गौरव केला, त्या अरुणाचलम् मुरुगनंतम् यांची बाहेरच्या जगात ओळख आहे ती ‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ अशी. अनेक वर्षं हालअपेष्टा सोसून, कष्ट उपसून मुरुगनंतम् यांनी सॅनिटरी नॅपकिन तयार करण्यासाठी यंत्राची निर्मिती केली. हे नॅपकिन बाजारात मिळणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेल्या नॅपकिनांपेक्षा एक-दशांश किमतीत तयार होतात. मुरुगनंतम् यांच्या यंत्रामुळे आज भारतातल्या तेवीस राज्यांमधल्या आणि तेरा देशांमधल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया पाळीसाठी स्वच्छ नॅपकिन्स वापरू शकल्या आहेत, स्वत: ती तयार करून, विकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकल्या आहेत. अरुणाचलम् मुरुगनंतम् (https://www.facebook.com/amuruganantham) यांच्या कामाची थक्क करणारी ही खरी कथा.
***
१९९८ सालच्या उन्हाळ्यातली गोष्ट. दुपारी जेवायला मुरुगनंतम् घरी आले. लग्न होऊन जेमतेम महिना झाला होता. घरात या दोघांशिवाय मुरुगनंतम्‌ची म्हातारी आई. कोणाच्या तरी शेतावर मजूर म्हणून काम करणारी. जेमतेम दोन खोल्यांचं कच्चं घर. त्यामुळे दुपारच्या वेळी आई घरी नसतानाच काय तो एकांत त्या दोघांना मिळे. त्या दिवशी दुपारी घरात पाऊल टाकल्यावर चुलीजवळ जेवण करणारी त्यांची बायको त्यांना दिसली नाही. मुरुगनंतम् ज्या घरात राहायचे, त्याच्या मागच्या बाजूला नारळाच्या झावळ्यांचं न्हाणीघर होतं. तीन बाजूंनी तट्ट्याच्या भिंती, समोरून पोतेर्‍याचा पडदा. वर मोकळं. त्यांना बायको न्हाणीघराजवळ मातीत काहीतरी पुरताना दिसली. मुरुगनंतम् चक्रावले. चोराचिलटांपासून लपवून ठेवावं असं त्या घरात काहीच नव्हतं. ‘काय करत होतीस?’ असं सहज विचारल्यावर बायकोनं उत्तर देणं टाळलं आणि पदराखाली काहीतरी लपवलं. पुन:पुन्हा विचारल्यावर शेवटी एकदाचं तिनं चाचरत काय ते सांगितलं. तिची पाळी सुरू होती, या काळात वापरण्यासाठी तिनं काही फडकी गोळा करून, लपवून ठेवली होती आणि आता वापरल्यानंतर खराब झालेली फडकी ती मातीत पुरून ठेवत होती. ‘इतकं कळकट फडकं वापरतेस तू? फरशीसुद्धा पुसायच्या लायकीचं नाही हे’, मुरुगनंतम् तिला म्हणाले. ‘सगळ्याजणी अशीच फडकी वापरतात, दर महिन्याला चांगली कापडं वाया घालवायला कशी परवडायची?’, तिनं उत्तर दिलं. मुरुगनंतम्‌च्या धाकट्या दोन बहिणींची लग्नं झाली होती. बहिणी घरी होत्या तोपर्यंत मुरुगनंतम्‌ना न्हाणीघराजवळ अधूनमधून रक्ताचे डाग असलेली मळकी, फाटकी फडकी दिसत. एकदा कधीतरी त्यांनी त्यांच्या आईला आणि बहिणींना त्याबद्दल विचारलंही होतं. तिघींकडूनही ‘तुला काय करायच्या नसत्या चौकश्या?’ असं ऐकून घ्यावं लागलं होतं. त्या डागाळलेल्या कापडांचा संबंध घरातल्या स्त्रियांच्या शरीरधर्माशी असू शकतो, असं त्यांच्या मनातही आलं नव्हतं. रोजच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न जास्त बिकट होते.
ती घाणेरडी फडकी पाहून मुरुगनंतम् अक्षरश: थक्क झाले. पूर्वी सॅनिटरी नॅपकिन नव्हते, तेव्हा फडकी वापरणं ते समजू शकत होते. पण आता कोईमतूरमध्ये जागोजागी त्यांना सॅनिटरी नॅपकिनांच्या जाहिराती दिसत. ते वापरायला काय हरकत होती? बायकोला विचारलं, तर ती म्हणाली, बाजारातले नॅपकिन वापरले, तर आपल्याला दूध आणि साखर असे दोन्ही खर्च झेपणारे नाहीत. त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा हा संवाद झाला दुपारच्या जेवणाच्या वेळी. लग्न नुकतंच झालं होतं. मुरुगनंतम् यांनी ठरवलं, बायकोला एक मस्त भेटवस्तू देऊन खूश करायचं. भेटवस्तू काय? तर बायकोनं कधीही न वापरलेला, तिच्या दृष्टीनं अतिशय महाग असलेला आणि म्हणून अप्राप्य असा सॅनिटरी नॅपकिन. गावाजवळचं औषधांचं दुकान त्यांच्या घरापासून दोनएक मैल लांब होतं. तिथेच जाणं भाग होतं, कारण घराजवळ असलेल्या वाण्याच्या लहानशा दुकानात उत्तम सॅनिटरी नॅपकिन मिळणार नाही, असं त्यांना वाटलं.
मुरुगनंतम् पायी चालत दुकानात पोहोचले तेव्हा दिवेलागणीची वेळ होती. त्यांनी दुकानदाराला म्हटलं, ‘मला बायकोसाठी सॅनिटरी नॅपकिन विकत घ्यायचा आहे. कुठल्या कंपनीचा चांगला आहे?’ दुकानदार सटपटला, त्यांच्याकडे काही क्षण बघत राहिला. मग पटकन आत जाऊन त्यानं दोनतीन जुनकट पुडकी आणली आणि काऊंटरवर ठेवली. आत्ता या क्षणी कोणी दुकानात आलं, आणि त्यानं आपल्या हातात ही असली वस्तू पाहिली तर काय, ही भीती त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. हेही मुरुगनंतम् यांच्यासाठी कोडं होतं. रात्री नऊनंतर औषध दुकानाची पायरी चढणारे ग्राहक काँडम विकत घेण्यासाठीच आलेले असतात, असा समज गावात रूढ होता. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर कोणी औषधांच्या दुकानात जायला धजावत नसे. काँडम विकत घ्यायला जाणारेही लपूनछपून जात. पण सॅनिटरी नॅपकिन विकत देतानाही तो दुकानदार घाबरला होता, याची मुरुगनंतम्‌ना मजा वाटली.



‘तुझ्या बायकोनं तुझ्यावर करणी केलेली दिसते, लग्नाला महिना झाला नाही आणि तू तिची कामं करतोस?’, भीतीचा भर ओसरल्यावर त्यानं खवचटपणे विचारलं. गावात पुरुषानं काम करणं, हे कमीपणाचं समजलं जाई. क्वचित एखादा पुरुष नदीवर कपडे धुताना दिसलाच, तर अगदी अनोळखी स्त्रियाही ‘अण्णा, आणा ते कपडे धुऊन देते, बाईचं काम तुम्ही का करता?’ म्हणत त्याचे कपडे धुऊन देई. एक अनोळखी स्त्री आपले कपडे धुते आहे, याबद्दल काडीची लाज न वाटून घेता तो बाप्या झाडाखाली सावलीत बसून राही. आणि आता मुरुगनंतम् दुकानात सॅनिटरी नॅपकिन विकत घेत होते. तो वापरणार होती त्यांची बायको. तेसुद्धा मासिक धर्माच्या वेळच्या स्वच्छतेसाठी. मासिक पाळी, त्यावेळी होणारा रक्तस्राव यांबद्दल गावात कोणीही बोलत नसे. अर्थात हे काही मुरुगनंतम् यांच्या लहानशा गावापुरतंच मर्यादित नव्हतं. शतानुशतकं, प्रत्येक देशात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात मासिकधर्माच्या जोडीनं किळस आणि लाज या दोन भावना कायम आल्या आहेत. मासिकधर्माभोवती गुंफल्या गेलेल्या मिथकांमुळे असेल हे कदाचित. मासिक पाळी आली की बाई अपवित्र होते, तिनं देवाची उपासना किंवा स्वयंपाक करता कामा नये, तिनं तुळशीच्या रोपाजवळ जाऊ नये, तिनं लोणच्याच्या बरणीला हात लावू नये असे कितीतरी समज सर्वत्र प्रचलित आहेत. त्यामुळे या विषयाबद्दल मुलीशी मनमोकळं बोलणं, तिला स्वच्छता कशी राखायची याची कल्पना देणं, या गोष्टी अजिबात घडत नाहीत. खुद्द स्त्रियाच याबद्दल बोलायला तयार नसतात, तिथे पुरुषांना कितीसा दोष देणार?
त्यामुळे मुरुगनंतम्‌ची कृती त्या गावासाठी एक क्रांतिकारी घटना होती. समोर ठेवलेल्या पाकिटांपैकी सर्वांत जास्त रंगीत पाकिट मुरुगनंतम् यांनी निवडलं, दुकानदारानं इकडेतिकडे बघत एका वर्तमानपत्रात घाईघाईनं ते गुंडाळून त्यांच्या हातात दिलं. ते दुकानाबाहेर पडले आणि थोडं पुढे जाऊन त्यांनी ते पाकीट उघडलं. दुकानदारानं एवढं घाबरत पुडक्यात नक्की काय बांधून दिलं, हे बघण्याची उत्सुकता त्यांना होती. पाकिटात साधारण आठ इंच लांबीची, कापसाच्या बँडेजासारखी दिसणारी एक वस्तू होती. त्यांनी वजनाचा अंदाज घेतला. साधारण दहा ग्रॅमचा तो नॅपकिन होता. त्यांनी हिशेब केला. तेवढ्या कापसाची १९९८ साली किंमत होती दहा पैसे. त्यांनी तो विकत घेतला होता चार रुपयांना. म्हणजे चाळीसपट किमतीला. तेवढ्याशा कापसाची किंमत इतकी कशी, हे त्यांना कळेना. उत्पादनाचा, वितरणाचा, जाहिरातीचा खर्च जमेस धरला, तरी त्या नॅपकिनची किंमत बरीच जास्त होती. आपण यापेक्षा कमी किमतीत असाच नॅपकिन तयार करू शकू का? मुरुगनंतम् यांच्या डोक्यात विचार सुरू झाला.
मुरुगनंतम् यांचे वडील वीणकर होते. त्यांचा स्वत:चा हातमाग होता. आपल्या मुलानं शाळा शिकताशिकता इतर अनेक विषयांचं ज्ञान मिळवावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुरुगनंतम्‌ना हातमाग चालवायला शिकवला, सुट्ट्यांमध्ये शेतावर जायला लावलं. एक हुशार विद्यार्थी म्हणून मुरुगनंतम् यांची ख्याती होती. विज्ञान आणि गणित हे त्यांचे आवडते विषय. सलग दोन वर्षं त्यांना जिल्हास्तरीय विज्ञानस्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं होतं. स्पर्धेत एका वर्षी त्यांनी कोंबडीची अंडी कृत्रिमरीत्या उबवण्यासाठी अतिशय स्वस्त असं इनक्यूबेटर तयार केलं होतं. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्या या प्रकल्पाची नोंद घेतली होती. इंजिनीयर होऊन स्वत:चं वर्कशॉप काढण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. पण अचानक त्यांच्या वडलांचं निधन झालं आणि शाळा सुटली. त्यांची आई, दोन बहिणी आणि ते दुसर्‍याच्या शेतात मजुरी करू लागले. पैसे पुरेनात तेव्हा त्यांनी कोईमतूर शहरात पेपराची लाईन धरली, भाजी विकली. पण या कामांत त्यांचं मन रमेना. त्यांना व्हायचं होतं इंजिनीयर. ते काही आता शक्य नव्हतं. गावात एक लहानसं वर्कशॉप होतं. बंगल्यांचे, इमारतींचे मोठे लाकडी आणि लोखंडी दरवाजे या वर्कशॉपमध्ये तयार होत. मुरुगनंतम् तिथे नोकरीला लागले. अंगभूत कसबामुळे लवकरच त्यांनी या कामात नैपुण्य मिळवलं. आता ते स्वतंत्रपणेही ऑर्डरी घेऊ लागले.
त्यांनी बायकोला तो सॅनिटरी नॅपकिन दिला, एवढी महागाची वस्तू आणली, म्हणून बायकोकडून रागावून घेतलं. पण आपणही असा नॅपकिन तयार करावा, हा विचार काही त्यांना स्वस्थ बसू देईना. दोनतीन दिवसांनी संध्याकाळी ते दुकानात जाऊन पांढरं कापड, कापूस घेऊन आले आणि विकत आणलेल्या नॅपकिनसारखा नॅपकिन त्यांनी तीनचार तास खपून तयार केला. मग एका चांगल्याशा कागदात गुंडाळून त्यांनी तो बायकोच्या हाती दिला. हा घरगुती नॅपकिन कितपत काम करतो, याची चाचणी करण्यासाठी उपलब्ध असलेली एकमेव स्वयंसेवक म्हणजे बायको. ‘हा मी तयार केलेला नॅपकिन आहे, वापरून सांग कसा आहे ते’, ते बायकोला म्हणाले. बायकोनं मान डोलावली. मग दुसर्‍या दिवशी त्यांनी बायकोला विचारलं, ‘वापरलास का नॅपकिन?’ तेव्हा बायकोनं ‘पाळी दर महिन्याला येते, रोज किंवा सिनेमासारखी दर शुक्रवारी येत नाही, पाळी आली की सांगेन नॅपकिन कसा आहे ते, तोपर्यंत सारखंसारखं विचारून त्रास देऊ नका’, असं त्यांना सुनावलं. आपण नॅपकिनाचं उत्पादन करायचं ठरवलं आहे खरं, पण त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, या विचारानं ते खंतावले. पण विचारणार कोणाला आणि सांगणार कोण?



यथावकाश पुढच्या महिन्यात त्यांच्या बायकोनं त्यांना त्यांनी तयार केलेला नॅपकिन अजिबात चांगला नसल्याची आणि म्हणून ती पूर्वीप्रमाणेच तिनं जमा करून ठेवलेली कापडं वापरणार असल्याची बातमी दिली. मुरुगनंतम् मग पुन्हा कामाला लागले. यावेळी त्यांनी दहाबारा नॅपकिन तयार केले आणि आपल्या बहिणींनाही ते दिले. बहिणी संकोचल्या, पण भावाला काय बोलणार? त्यांनी निमूट मान डोलावली. पुढचे सहाआठ महिने ते बायकोला, बहिणींना स्वत: तयार केलेले नॅपकिन पुरवत राहिले. त्यांचे अभिप्राय विचारत राहिले. पण त्या तिघीही ‘चांगला नाही’ या पलीकडे एक शब्दही बोलत नसत. आपल्या मासिकधर्माबद्दल नवर्‍याशी, भावाशी कसं बोलणार? मुरुगनंतमांच्या प्रश्नांना उत्तरही मिळत नसत. बायकोला, बहिणींना खोदूनखोदून विचारलं तर त्या तिथून निघून जात. प्रत्येक खोलीत देवादिकांच्या तसबिरी असत. देवांसमोर मासिक पाळीबद्दल कसं बोलणार? मग शेवटी बहिणींच्या नवर्‍यांनी मुरुगनंतम्‌ना तंबी दिली. पुन्हा आमच्या घरांत असल्या घाणेरड्या वस्तू दिल्या, भलतेसलते प्रश्न विचारले, तर तुमच्याशी संबंध तोडू, असं सांगितलं. त्यांच्या बायकोलाही नवर्‍यानं असं बहिणींना नॅपकिन देणं, त्यांना प्रश्न विचारणं पसंत नव्हतं. तिनं आपली नाराजी दोनतीनदा बोलून दाखवली होती.
आता काहीतरी वेगळा मार्ग शोधणं भाग होतं. मुरुगनंतम्‌ना एकच हक्काची बायको आणि तिलाही महिन्यातून एकदाच पाळी येणार. उत्पादन बाजारात आणायचं तर ते उत्तम दर्जाचं हवं. ते अनेक कसोट्यांवर खरं उतरायला हवं. त्यासाठी भरपूर चाचण्या घ्यायला हव्या. पण एकट्या बायकोच्या भरवश्यावर हे काम कसं जमणार? शिवाय ती ‘चांगलं नाही’ याखेरिज काही बोलतही नाही. मासिक पाळीबद्दल मोकळेपणानं कोण बोलू शकेल? डॉक्टर. मग डॉक्टरांना हे नॅपकिन वापरायला दिले तर? गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावर मेडिकल कॉलेज होतं. दुसर्‍याच दिवशी ते कॉलेजच्या बाहेर असलेल्या बसथांब्यापाशी गेले. तिथे मुलींचा एक घोळका होता. त्यांच्यापाशी जाऊन त्यांनी आपलं काम सांगितलं. या मुलींनी त्यांचं बोलणं पुरतं ऐकूनही घेतलं नाही. दिवसभर थांबून मग मुरुगनंतम् यांनी कसंबसं वीस मुलींना स्वयंसेवक म्हणून तयार केलं. या मुली त्यांनी तयार केलेले नॅपकिन वापरून अभिप्राय द्यायला तयार झाल्या. पुढचे तीन महिने एका ठरावीक तारखेला मुरुगनंतम् स्वत: तयार केलेले साठ नॅपकिन घेऊन कॉलेजपाशी जायचे. त्या मुलींना ते नॅपकिन देऊन आधीच्या नॅपकिनांबद्दल विचारायचे. पण इथेही निराशाच पदरी पडली. या भावी डॉक्टरणीही ‘हो-नाही’ यांपलीकडे काही बोलायला तयार होईनात. मग त्यांनी एक प्रश्नपत्रिका तयार केली. त्यात नॅपकिन वापरण्याच्या अनुभवाबद्दल, नॅपकिनाच्या गुणवत्तेबद्दल दहाबारा प्रश्न होते. मुलींनी त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची होती. हे काम सहज जमण्यासारखं आहे, असं मुरुगनंतम्‌ना वाटलं. पहिले दोन महिने उत्तरपत्रिका मिळाल्यावर त्यानुसार त्यांनी नॅपकिन तयार करण्याची पद्धत बदलली. अगदी मुंबईहून कापूस मागवून नॅपकिन तयार केले. तिसर्‍या महिन्यात नवीन नॅपकिन द्यायला आणि उत्तरं गोळा करायला ते कॉलेजात गेले, तर एका झाडाखाली तीन मुली एकमेकींच्या वह्यांमध्ये बघत घाईघाईनं उत्तरं लिहिताना त्यांना दिसल्या. मुरुगनंतम्‌ना खूप वाईट वाटलं. इथेही प्रामाणिक उत्तरं त्यांना मिळणार नव्हती. अजिबात ऐपत नसताना ते हे नॅपकिन तयार करत होते आणि ते वापरून प्रामाणिकपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय देणारं त्यांना कोणी सापडत नव्हतं. त्या दिवशी मुलींना न भेटताच ते परतले.
दुसर्‍या दिवशी त्यांनी एक लहान चेंडू विकत आणला. त्याला एक छिद्र पाडलं. त्यांचा एक मित्र खाटिक होता. त्याच्याकडे जाऊन बकरीचं रक्त घेतलं. एका रक्तपेढीत काम करणार्‍या मित्राकडून रक्तात गुठळ्या होऊ न देणारं अँटिकोअॅग्युलंट त्यांनी अगोदरच आणलं होतं. हे रसायन त्यांनी रक्तात योग्य त्या प्रमाणात मिसळलं, मग ते रक्त त्या चेंडूत भरलं, चेंडूच्या छिद्राशी एक नळी जोडली आणि तो चेंडू आपल्या दोन जांघांमध्ये व्यवस्थित राहील, असा बांधला. वरून सॅनिटरी नॅपकिन घातला. असा नॅपकिन घालणारे कदाचित ते पहिले पुरुष असावेत! आता चालताना, बसताना चेंडूवर दाब आला की नळीतून रक्त बाहेर येई. आपण तयार केलेला सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थित काम करतो की नाही, हे आता त्यांना कळणार होतं. पण अनेकांनी त्यांना ‘असा विचित्र का चालतोस?’ असं विचारून भंडावून सोडलं. काय उत्तर देणार प्रत्येकाला? त्या दिवशी ते दुपारी जेवायला घरी आले, तेव्हा जरा वैतागलेलेच होते. घरी आले, तर बायकोचे डोळे रडून लाल. घरात शिरताना त्यांनी चेंडू काढून ठेवायची दक्षता घेतली होती आणि गावातले पुरुष ती एकटी घरात असताना येऊन चहाडी करणं शक्य नव्हतं. मग ही का रडत असावी?



‘तुमचं मेडिकल कॉलेजातल्या मुलींबरोबर प्रेमप्रकरण आहे, असं सगळे गावात म्हणतात’, असं तिनं रडत सांगितल्यावर त्यांची ट्यूब पेटली. त्यांना त्या मुलींबरोबर बोलताना कोणीतरी पाहिलं होतं आणि हळूच ही प्रेमप्रकरणाची पुडी सोडली होती. ‘प्रेमप्रकरण वगैरे काही नाही, कॉलेजचे दरवाजे दुरुस्त करायचे होते, म्हणून मी तिथे जात होतो, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस’, असं समजावून सांगूनही बायकोची खात्री पटेना. नवर्‍याकडून कबुलीजबाब येत नाही बघून तिनं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं - ‘मला आत्ताच्या आत्ता माहेरी नेऊन सोडा’. मुरुगनंतम् विचारात पडले. बायकोची खात्री पटवून देणं, तिला खरं सांगणं शक्य नव्हतं. मेडिकल कॉलेजातल्या मुलींना आपण नॅपकिन देतो, त्यांना प्रश्न विचारतो, हे बायकोपासून त्यांनी लपवून ठेवलं होतं. त्या मुलींच्या घरीही हे माहीत नव्हतं. आपलं संशोधन करायला मुरुगनंतम् यांनी न्हाणीघरापलीकडे एक लहानशी खोली बांधून घेतली होती. ते बाहेर असले की या खोलीला कुलूप असायचं. ‘मला दरवाजे तयार करण्यासाठी एक मोठं कंत्राट मिळालं आहे, त्यासाठी मी काम करतोय, मी त्या खोलीत असताना तुम्ही तिथे यायचं नाही’, असं त्यांनी आईला, बायकोला बजावलं होतं. बायकोला भलताच संशय आल्यावर तिला खरं काय ते सांगितलं असतं, तर ती अजूनच भडकली असती. अनोळखी स्त्रियांच्या मासिकधर्माबद्दल नवरा त्यांच्याशी बोलतो, हे कळल्यावर तिनं त्यांना घटस्फोट द्यायला कमी केलं नसतं.
तशी घटस्फोटाची नोटिस त्यांना बायको माहेरी गेल्यावर महिनाभरात मिळाली. तिला अर्थातच मुरुगनंतमांच्या प्रयोगांबद्दल अजूनही काही माहीत नव्हतं. पण आपल्या नवर्‍यानं ‘बाहेरख्याली’पणा थांबवावा, म्हणून वापरलेलं हे दबावतंत्र आहे, आपल्या बायकोचं आपल्यावर निरतिशय प्रेम आहे, तिला घटस्फोट वगैरे काही नको आहे, याची मुरुगनंतम्‌ना खात्री होती. त्यांनी शांतपणे ते कागद बाजूला ठेवले. बायको नक्की घरी परतणार होती, पण ती येईपर्यंतच्या वेळात त्यांना शक्य तितके जास्त प्रयोग करायचे होते, निरीक्षणं नोंदवायची होती. बायको घरात नसल्याच्या संधीचा पूर्ण फायदा घ्यायचा होता. ती नसल्यानं लपवाछपवीचे कष्ट थोडे वाचणार होते. आई घरात असल्यानं जेवणाची काळजी नव्हती आणि आपला मुलगा त्याच्या कामाच्या खोलीत असताना तिथे जायचं नाही, हे तिला ठाऊक होतं.
दुसर्‍या दिवशीपासून ते दुप्पट जोमानं कामाला लागले. चेंडू दिवसभर बांधून ठेवायचं त्यांनी ठरवलं. रोज बदलता यावेत, म्हणून भरपूर नॅपकिन तयार करून ठेवले. हे नॅपकिन वेगवेगळ्या दर्जाच्या कापसापासून, कापडापासून तयार केले होती. त्यांची जाडीही वेगवेगळी होती. मात्र चेंडू अशा अवघड जागी बांधून वावरणं अजिबात सोपं नव्हतं. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासूनच त्यांना त्रास व्हायला लागला. नाजूक जागी धक्का लागला की बराच वेळ पोट दुखत राही. पायात गोळे येत. पाचव्या दिवशी त्यांना ताप आला. वेदना सहन न झाल्यानं शरीरानं दिलेला तो इशारा होता. नाईलाजानं ते एका डॉक्टरकडे गेले. त्यांना खरा प्रकार काय तो सांगितला. सगळं ऐकून डॉक्टर थक्कच झाले आणि मग बराच वेळ हसत बसले. त्यांच्याकडून औषध घेऊन मुरुगनंतम् खालमानेनं बाहेर पडले. हे डॉक्टर आपल्याला चाचण्या घेण्यासाठी मदत करतील, स्वयंसेवक मिळवून देतील अशी अंधुकशी आशा त्यांना वाटत होती. पण ‘असले उपद्व्याप करू नकोस’ असं खिदळत सांगण्यापलीकडे त्या डॉक्टरानं काहीच केलं नाही, याचं त्यांना वाईट वाटलं. मुरुगनंतम् प्रामाणिकपणे संशोधन करत होते. लोकांची साथ मिळत नसल्यानं आता निराशा दाटू लागली होती. त्या डॉक्टरनं बजावूनही मुरुगनंतम् चेंडू वापरायचं थांबले नाहीत. जवळजवळ महिनाभर ते चेंडू आणि सॅनिटरी नॅपकिन बांधलेल्या अवस्थेत दिवसभर राहिले. शेवटी शरीर अगदीच साथ देईना, तेव्हा त्यांनी हा प्रयोग थांबवला.



हाती फारसं काही लागत नाही म्हटल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रयोगाचा आढावा घेतला. बाजारात मिळणारे नॅपकिन कापसापासून तयार केले आहेत, हे त्यांना नक्की ठाऊक होतं. पण बाजारात मिळतो तो, किंवा हातामागावर काम करणार्‍या विणकरांकडे असतो तो हा कापूस नाही, हे आता त्यांना कळलं होतं. विकतच्या नॅपकिनांमधला कापूस आणि ते वापरत असलेला कापूस नक्की वेगळा होता. हा कापूस कुठला, हे कळलं तर काम सोपं होईल. पण हे सांगणार कोण? सॅनिटरी नॅपकिनांचा संपूर्ण उद्योग एकदोन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती एकवटला होता. ‘तुम्ही नॅपकिन कसे तयार करता हो?’ असं विचारल्यावर उत्तर येणं अशक्य होतं. ते कशाला कोणाला आपलं ट्रेड सिक्रेट सांगतील? म्हणजे प्रयोगांना पर्याय नव्हता. त्यांनी मग दोन वेगवेगळ्या ब्रॅण्डांचे नॅपकिन विकत आणले आणि त्यांतला कापूस चेन्नई आणि हैद्राबाद इथल्या दोन प्रयोगशाळांकडे रासायनिक पृथक्करणासाठी पाठवला. हे खर्चिक काम होतं, पण इलाज नव्हता. या प्रयोगशाळांकडून उत्तर यायलाही वेळ लागणार होता.
दरम्यानच्या काळात प्रयोग थांबून चालणार नव्हतं. ते पुन्हा मेडिकल कॉलेजात गेले. आता कॉलेजात मुलींची नवी बॅच आली होती. या मुलींना गाठून त्यांनी त्यांना आपली सगळी कहाणी ऐकवली. प्रयोगात सहभागी होण्याची विनंती केली. वीस मुली तयार झाल्या. या सगळ्या मुली कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहणार्‍या होत्या. यावेळी मात्र मुरुगनंतम् निरीक्षणांसाठी इतरांवर अवलंबून राहणार नव्हते. त्यांना आपण नक्की कुठे चुकतो हे स्वत: बघायचं होतं. त्यांनी साठ नॅपकिन स्वत: तयार केले आणि तितकेच विकत आणले. प्रत्येक मुलीला तीन स्वत:चे आणि तीन विकतचे असे नॅपकिन दिले. सोबत प्लॅस्टिकच्या तीन पिशव्या होत्या. त्या मुलींनी हे दोन्ही प्रकारचे नॅपकिन वापरून ते कचर्‍यात न फेकता त्या काळ्या पिशव्यांमध्ये जमा करायचे होते. प्रत्येक नॅपकिनावर वेगवेगळ्या रंगांत वेगवेगळ्या खुणा केल्या होत्या. कुठला नॅपकिन कुठल्या मुलीनं वापरला हे या रंगीत खुणांमुळे मुरुगनंतम्‌ना कळणार होतं. वापरलेले नॅपकिन गोळा करून निरीक्षणं नोंदवणं, हे कठीण काम होतं. भयानक दुर्गंधी, इन्फेक्शन होण्याची भीती हे लक्षात घेऊनही मुरुगनंतम् यांच्या दृष्टीनं हा प्रयोग अत्यावश्यक होता.
पुढचे दोन महिने दर आठवड्याला कॉलेजात जाऊन मुरुगनंतम् त्या काळ्या पिशव्या गोळा करत राहिले. मुलींना संकोच वाटायला नको, म्हणून कॉलेजच्या दाराजवळच्या पोस्टाच्या पेटीमागे होस्टेलमधल्या मुली रात्री आपापली पिशवी ठेवून जात. भल्या पहाटे मुरुगनंतम् त्या घरी घेऊन येत. आपल्या नॅपकिनमधला कापूस योग्य प्रकारे द्रव शोषून घेत नाही, हे पहिल्या महिन्यात मुरुगनंतमांच्या लक्षात आलं. बायकोनं ‘तुमचा नॅपकिन चांगला नाही’ हे त्यांना सांगितलं होतं, पण आता त्यांच्यासमोर पुरावाच होता. स्वत: विकतचा नॅपकिन बांधूनही त्यांना अशी निरीक्षणं नोंदवता आली नव्हती. निरीक्षणांच्या बाबतीत तरी हा प्रयोग यशस्वी होत होता. दुसर्‍या महिन्यात मात्र पुन्हा एक संकट उभं राहिलं. मागच्या खोलीत नाकावर रुमाल बांधून वापरलेले नॅपकिन तपासताना मागे त्यांची आई येऊन उभी राहिली. आपला मुलगा रविवारच्या जेवणासाठी कोंबडं कापतोय, असं त्यांना वाटलं होतं. बराच वेळ झाला तरी तो घरात येत नाही पाहून त्या मागच्या दारी आल्या आणि समोरच दृश्य बघून हबकल्या. काहीही न बोलता त्यांनी आपली दोन पातळं एका पिशवीत भरली आणि त्या घरातून चालत्या झाल्या.
काही गावकर्‍यांनी मुरुगनंतम्‌ना नदीवर रक्ताळलेले कपडे धुताना पाहिलं होतं. मेडिकल कॉलेजातल्या मुलींबरोबरच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होतीच. आता त्यांच्या आईनं घर सोडल्यावर ‘मुरुगा ड्रॅक्युला आहे, तो बायकांचं रक्त पितो’ अशी वदंता गावात पसरली. ड्रॅक्युलाला घालवून देण्यासाठी दुसर्‍या दिवशी कोईमतूरमधून मांत्रिक आणायचं पंचायतीनं ठरवलं. झाडाला उलटं टांगून घेऊन मार खाण्याची मुरुगनंतमांची मुळीच इच्छा नव्हती. शिवाय महत्त्वाचं होतं संशोधन. ते थांबून कसं चालेल? त्यांनी रातोरात पैसे, काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन पळ काढला. कोईमतूर गाठलं.
बारा बाय बाराच्या एका लहानशा खोलीत इतर पाचजणांबरोबर ते राहू लागले. विद्यापीठात शिकवणार्‍या एका इंग्रजीच्या प्राध्यापकाकडे त्यांनी घरगडी म्हणून नोकरी धरली. एका वर्कशॉपमध्ये रात्री कामाला जाऊ लागले. प्रयोगशाळांकडून अजून उत्तर आलं नव्हतं. त्यांनी गावाहून बरोबर आणलेल्या काही वस्तू विकल्या आणि त्या पैशातून काही वितरकांना फोन केले, प्राध्यापकांच्या मदतीनं इंग्रजीत पत्रं लिहिली. बहुराष्ट्रीय कंपन्या नॅपकिन बनवतात, म्हणजे त्यांना कच्चा माल पुरवणारे वितरक असणारच. हे वितरक त्यांनी शोधले आणि त्यांच्याशी संपर्क साधला. ‘मी कोईमतूरमधला बडा उद्योजक आहे आणि मला माझा कारखाना सुरू करायचा आहे. तरी मला कच्च्या मालाचे नमुने पाठवा’ अशा अर्थाची ती पत्रं होती. महिन्याभरात दोनतीन वितरकांकडून त्यांच्या पत्त्यावर मोठाली खोकी आली. त्यांत ठिसूळ लाकडी ठोकळे होते. अडीच वर्षांपासून त्रास देत असलेलं एक मोठं कोडं सुटलं होतं. कापसाचा मुख्य घटक सेल्यूलोज. सॅनिटरी नॅपकिनांमधला कापूस हा एका विशिष्ट झाडाच्या सालीतल्या सेल्यूलोजपासून बनवला होता. म्हणूनच त्याचे गुणधर्म वेगळे होते. आता सेल्यूलोज हाती आल्यानं त्यांना हवा तसा कापूस मिळवणं कठीण नव्हतं. पण अजून एक समस्या होती. हा कापूस बनवण्यासाठी, कापसावर प्रक्रिया करून नॅपकिन तयार करण्यासाठी जे यंत्र उपलब्ध होतं, त्याची किंमत होती साडेतीन कोटी रुपये. इतकी रक्कम उभी करणं मुरुगनंतम्‌ना अशक्य होतं.



सॅनिटरी नॅपकिन बनवणं तर कुठल्याही परिस्थितीत आवश्यक होतं. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची बायको होती, बहिणी होत्या, मेडिकल कॉलेजातल्या मुली होत्या आणि चोरटं वाटून घेणारा तो दुकानदार होता. गावातल्या स्त्रियांनी नॅपकिन वापरणं हा मुख्य उद्देश होता. पण मशिन इतकं महाग असेल तर कसं जमायचं? मग आपणच एखादं स्वस्तातलं मशिन तयार केलं तर? हे मशिन गावातल्या स्त्रिया स्वत: वापरू शकतील, स्वत:साठी नॅपकिन बनवू शकतील. मग सुरू झाली नवं यंत्र बनवण्याची धडपड. साडेचार वर्षांच्या मेहनतीनंतर मुरुगनंतम् स्वत:चं यंत्र बनवण्यात यशस्वी झाले. यंत्र बनवण्याचा खर्च होता रुपये साठ हजार फक्त. राईट बंधूंच्या विमानासारखं दिसणारं हे यंत्र चार टप्प्यांमध्ये काम करतं. सर्वप्रथम स्वयंपाकघरत वापरतो तसा एक ग्राइंडर टणक सेल्यूलोजचं चोथा करतं. या चोथ्याच्या आयताकृती घड्या दुसर्‍या टप्प्यात केल्या जातात. तिसर्‍या टप्प्यात या घड्या एका पातळ कापडात गुंडाळल्या जातात. चौथ्या टप्प्यात अल्ट्राव्हायोलेट किरणांनी या नॅपकिनांचं निर्जंतुकीकरण केलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया एक तास चालते.
वापरायला अतिशय सोपं असं तंत्रज्ञान विकसित करणं, हे मुरुगनंतम् यांचं ध्येय होतं. खेड्यापाड्यांत राहणार्‍या स्त्रियांनी हे यंत्र सहकारी तत्त्वावर विकत घ्यावं आणि सॅनिटरी नॅपकिन तयार करून विकावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आईसारख्या, बहिणींसारख्या दिवसभर शेतात राबणार्‍या असंख्य स्त्रिया होत्या. या स्त्रियांना शाश्वत रोजगार मिळणं, त्यांचं आरोग्य जपणं हे महत्त्वाचं होतं. म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या यंत्राची रचना सुटसुटीत होती. लाकडापासून तयार केलेल्या त्या यंत्रात धातूंचा कमीत कमी वापर होता.
मुरुगनंतम् यांचं पहिलं यंत्र चेन्नईच्या आयआयटीत पोहोचलं ते मुरुगनंतम् ज्यांच्याकडे नोकरी करत होता, त्या प्राध्यापकांमुळे. हे यंत्र बघून आयआयटीतले प्राध्यापक आणि विद्यार्थी थक्क झाले. शाळा अर्धवट सोडलेला, इंग्रजीचा एकही शब्द न येणारा इतकं अफलातून यंत्र तयार करू शकतो, हे त्यांच्यासाठी नवलाचं होतं. तिथल्या प्राध्यापकांनी यंत्राच्या कसून चाचण्या घेतल्या, मुरुगनंतम्‌नंच हे यंत्र तयार केलं आहे, याची खात्री पटावी म्हणून दिवसच्या दिवस त्यांना प्रश्न विचारले. मुरुगनंतम् आणि त्यांचं यंत्र या कसोट्यांवर खरे उतरले. मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांना हे यंत्र टक्कर देऊ शकेल, याची जाणीव त्यांना झाली. अहमदाबादला ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’तर्फे नावीन्यपूर्ण कल्पनांची, यंत्रांची स्पर्धा भरणार होती. आयआयटी मद्रासनं मुरुगनंतम् यांचं यंत्र त्यांच्या नकळत स्पर्धेसाठी पाठवलं. एकूण नऊशे त्रेचाळीस प्रवेशिकांमधून या यंत्राला पहिलं पारितोषिक मिळालं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अरुणाचलम् मुरुगनंतम् यांनी ते स्वीकारलं.
दुसर्या दिवशी देशभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा फोटो होता. पंतप्रधानांनी खास पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं. त्यांच्या यंत्राची चौकशी करण्याकरता आयआयटीत अनेक फोन आले. पण मुरुगनंतम् यांच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाचा फोन होता तो त्यांच्या बायकोचा, शांतीचा. सात वर्षांत पहिल्यांदाच तिनं नवर्‍याशी संपर्क साधला होता. दुसर्‍या दिवशी ती परत आपल्या घरी आली. त्यांची आईही परत आली. गावकर्‍यांनी सत्कार केला. बैलगाडीतून मिरवणूक काढली.
पण मुरुगनंतम् यांचं काम अजून संपलं नव्हतं. हे यंत्र भारतभरात उपलब्ध होणं महत्त्वाचं होतं. त्यांनी भारत सरकारशी संपर्क साधला. उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या भेटी महत्प्रयासानं मिळवून त्यांना या यंत्राचं महत्त्व समजावून सांगितलं. पण अधिकार्‍यांच्या लेखी मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन हे चर्चेचे विषय नव्हते. गावातल्या स्त्रिया इतकी वर्षं काय ती काळजी घेत होत्या, तशी पुढेही घेतील, पुरुषांनी त्यात लक्ष घालण्याचं कारण नाही, असं त्यांचं म्हणणं पडलं. मुरुगनंतम् मग ‘निदान एक सर्वेक्षण करा, किती स्त्रिया नॅपकिन वापरतात हे तरी कळेल’ म्हणून त्यांच्या मागे लागले. ही मागणीही धुडकावली गेली. मुरुगनंतम् वास्तव जाणून होते. गावात मातीनं-तेलानं माखलेली फडकी, गवत, पालापाचोळा, राख मासिक पाळीच्या दिवसांत वापरणार्‍या स्त्रिया होत्या. पाळी आली म्हणून शाळा सोडणार्‍या मुली त्यांनी पाहिल्या होत्या. पाळीच्या वेळी स्वच्छता न राखल्यानं झालेले आजार त्यांनी पाहिले होते.
मुरुगनंतम् मग भारतभर फिरले. बिहार, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमधल्या खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी बचतगटांतल्या महिलांच्या भेटी घेतल्या. त्यांना यंत्राबद्दल समजवून सांगितलं. या यंत्राचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला. बहुतेक स्त्रियांना ते पटलंही. पहिलं यंत्र बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यात विकलं गेलं. दुसरं गेलं नक्षलग्रस्त दांतेवाडा भागात. मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे त्यांचा हुरूप वाढला आणि ‘जयाश्री इंडस्ट्रीज’ या उद्योगाची त्यांनी स्थापना केली. पुढच्या दीड वर्षांत त्यांनी अडीचशे यंत्रं विकली. या यंत्रांच्या अनेक नकला पुढे बाजारात आल्या. मुरुगनंतम् यांना कोणीही त्याचं श्रेय दिलं नाही.
मुरुगनंतम् यांनी ज्या सर्वेक्षणाचा आग्रह धरला होता, ते सर्वेक्षण २०११ साली निएल्सेन या कंपनीनं हाती घेतलं. २०१२ साली युनेस्कोनं जगभरात मासिकधर्म आणि सॅनिटरी नॅपकिन यांच्या वापराबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून सर्वेक्षण केलं. या दोन्ही सर्वेक्षणांचे निकाल गंभीर होते. ऋतुप्राप्ती झालेल्या शहात्तर टक्के मुलींना मासिक पाळी येईपर्यंत त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. दरवर्षी पन्नास लाख मुली मासिक पाळी आल्यानंतर शाळेत जाणं सोडतात. भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या फक्त सुमारे साडेअकरा टक्के स्त्रिया या सॅनिटरी नॅपकिनांचा नियमित वापर करतात. या सर्वेक्षणानंतर भारत सरकारनं ग्रामीण भागातल्या स्त्रियांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचा निर्णय घेतला. सरकारनं या कामात आपल्याला सहभागी करून घेतलं नाही, याचं मुरुगनंतम् यांना विलक्षण दु:ख झालं, पण त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.
मुरुगनंतम् यांच्याकडून बहुतकरून स्वयंसेवी संस्था आणि महिलांचे बचतगट यंत्र विकत घेतात. एका यंत्रामुळे दहा स्त्रियांना रोजगार मिळतो. एका दिवसात साधारण तीनशे नॅपकिन या यंत्रावर तयार करता येतात. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरुगनंतम् यांच्या यंत्राचा वापर करून तीन वेगवेगळ्या आकाराचे, जाडीचे नॅपकिन तयार करता येतात. प्रत्येक नॅपकिन जास्तीत जास्त दोन रुपयांना विकला जातो. आजवर मुरुगनंतम् यांनी तयार केलेली पाच हजारांहून अधिक यंत्रं विकली गेली आहेत. या यंत्रांवर तयार होणारे आठशे सदुसष्ट ब्रॅण्ड आज उपलब्ध आहेत. डेफ्री, सही, नारीसुरक्षा, सुखचैन, लाडली, मदरकेअर, नाईस, बी कूल, आशा, रिलॅक्स, सखी अशी नावं त्यांना दिली गेली आहेत. मुरुगनंतम् यांनी पाच राज्यांमधल्या हजारभर शाळांशी संपर्क साधून त्यांना सॅनिटरी नॅपकिनांच्या नियमित पुरवठ्याची सोय केली आहे. बांगलादेश, सौदी अरेबिया, केनिया, युगांडा, श्रीलंका अशा तेवीस देशांमध्ये ही यंत्रं आता पोहोचली आहेत. देशोदेशांमध्ये आपली यंत्रं पोहोचावीत अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. परदेशात आणि भारतातही अनेक स्वयंसेवी संस्था आता या यंत्रावर तयार झालेल्या नॅपकिनांचा प्रचार आणि प्रसार करतात. मुरुगनंतम् यांची बायको, शांती आता ऋतुप्राप्तीच्या वेळी होणार्या धार्मिक समारंभांमध्ये भेट म्हणून हे नॅपकिनच देते.

पाळीच्या काळात भिंतींवरून उडी मारणारी, बास्केटबॉल खेळणारी मुलगी, ऑफिसात धावत जाणारी गृहिणी हे ग्रामीण भागातलं वास्तव नाही. पण मुरुगनंतम् यांच्या प्रयत्नांमुळे आज निदान काही स्त्रिया आणि मुली आरोग्यपूर्ण आयुष्य जगत आहेत. अनेक कष्ट सोसले, अनेकांचा रोष ओढवून घेतला तरी ध्येयापासून विचलित न होण्याची प्रेरणा त्यांना कुठून आली असेल? शिक्षण पूर्ण झालेलं नसताना प्रॉक्टर अॅन्ड गॅम्बलसारख्या मोठ्या कंपनीच्या अधिकार्‍यांना ‘मी तुमची मोनोपॉली मोडून काढेन आणि स्वस्तात खेड्यांमधल्या बायकांना नॅपकिन उपलब्ध करून देईन’ हे ऐकवण्याचा आत्मविश्वास कुठून आला असेल?
आजही मुरुगनंतम् त्याच खेड्यात राहतात. घर मात्र दोन मजली आहे. यंत्र वाहून नेण्यासाठी एक जीप घेतली आहे. बाकी कष्ट तेच आणि ध्यासही तोच. अवघड जागी चेंडू बांधून ठेवल्यामुळे प्रकृतीवर मात्र आता परिणाम झाला आहे. पण त्यांच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नाही. मिळालेली अनेक बक्षिसंही बिनमहत्त्वाची. बायको आणि आई घरी परतल्यामुळे ते आता आनंदात आहेत. कधीतरी बिहारमध्ये गेल्यावर कुठल्यातरी गावात कोणी म्हातार्‍या आजी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या यंत्रानं त्यांना कसं जगवलं हे सांगतात. कधी उत्तराखंडातून फोन करून कोणी आई त्यांच्या यंत्रामुळं ती आपल्या मुलीचं शिक्षण करू शकली, हे सांगते. दारुड्या नवर्‍याच्या त्रासापासून - या यंत्रांमुळे मिळणार्या उत्पन्नानं - सुटका करून घेता आली, असं सांगणारी अनेक पत्रं येतात. मुरुगनंतम्‌ना मग आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. ‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा जगातला एकमेव पुरुष’ ही ओळख मग ते अधिकच अभिमानानं मिरवतात.
- चिन्मय दामले
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक


हळदीला दर नाहीत म्हणून खचून न जाता बारामती तालुक्‍यातील सतीश जगदाळे यांनी त्याचे विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले. त्यांना चांगला दर आणि बाजारपेठ मिळवली. बाजारात माल विकण्यापेक्षा प्रक्रिया वा मूल्यवर्धनाद्वारे तो अधिक दराने विकण्याची उद्योजकता या शेतकऱ्याने दाखवली.
---------------
चिरेखाणवाडी (ता. बारामती, जि. पुणे) हा अवर्षणग्रस्त भाग. येथील सतीश आनंदराव जगदाळे यांची पाच एकर शेती. पारंपरिक पिकांतून फारसा फायदा होत नसल्याने आले, हळदीकडे ते वळले. त्या वेळी या पिकांना चांगले दर होते. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील हळद लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. वाई येथील बाळासाहेब मांढरे यांच्या हळदीच्या शेताला भेट देऊन पिकाचे व्यवस्थापन समजून घेतले. त्यानंतर 10 गुंठे क्षेत्रावर हळदीचे सेलम आणि 30 गुंठ्यांत सातारी आले लावले. हळदीचे सहा तर आल्याचे 15 क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र उतरलेल्या दरामुळे हळद तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला. 

हाती पट्टी फक्त 300 रुपयांची!
हळद सांभाळून तरी किती ठेवणार हा प्रश्न होता. एके दिवशी पुणे मार्केटमधील व्यापाऱ्याला फोन करून 50 किलो हळद काढून विक्रीसाठी नेली. तेथे हाती पडले केवळ 300 रुपये. हळद काढणीचा खर्च होता 200 रुपये. वाहतूक व अन्य खर्च वजा जाता हाती काहीच पडले नाही. पिकात अपयश आल्याची भावना झाली. मनात साऱ्या व्यवस्थेविरुद्ध संताप येत होता. जगदाळे अनेकांशी चर्चा करीत होते.
...असे वळले प्रक्रियेकडे
चर्चेअंती हळदीवर प्रक्रिया हा नामी उपाय असल्याचे जगदाळे यांच्या समोर आले. मात्र सहा क्विंटलसाठी बॉयलर, अन्य सामग्री घेणे परवडणारे नव्हते. ते पुन्हा हताश झाले. कृषी सहायक प्रवीण माने यांनी त्यांना ओल्या हळदीचे लोणचे बनवून विकण्याचा सल्ला दिला. घरचा नमुना दाखवून लोणचे रेसिपीही आणून दिली. त्यातून ही गोष्ट आपल्याला जमू शकते असा विश्‍वास जगदाळे यांना आला. पत्नी शशिकला यांना मदतीला घेऊन ओल्या हळदीचे लोणचे थोड्या प्रमाणात बनवून पाहिले. शेजारीपाजारी, पाहुण्यांकडे नमुना देऊन गुणवत्तेचा आढावा घेतला.
विक्रीला सुरवात
ओल्या हळदीच्या लोणच्याचा नमुना घेऊन जगदाळे कृषी विभागाच्या कार्यालयात गेले असता प्रवीण माने आणि कृषी पर्यवेक्षक हिंदूराव मोरे यांनी कृषी विभागाच्या धान्य महोत्सवात भाग घेण्यास सांगितले. आता माघार घेऊन चालणार नव्हते. पत्नी तसेच गावातील दोन महिलांच्या मदतीने 50 किलो ओल्या हळदीचे लोणचे बनवले. मसाले व अन्य घटकांचे मापन करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वजनकाटा विकत आणला. अचूक प्रमाणात मसाले व घटक यांचे मिश्रण करून केले. 200 ग्रॅमची 250 पाकिटे तयार झाली. त्याचे लेबलिंग केले. प्रति पाकीट किंमत 40 रुपये ठेवली. धान्य महोत्सवात तीन दिवसांत 200 पाकिटे विकली गेली. ओल्या हळदीचे एक क्विंटल कंदही 50 रुपये किलो दराने विकले गेले. बाजारात ज्या हळदीपासून केवळ 20 रु. प्रति किलो असा दर मिळाला असता ती ओली हळद लोणच्याच्या स्वरूपात 200 रुपये दराने विकली गेली.
हुरूप वाढला.
अर्थशास्त्र प्रक्रियेचे (एक किलो हळद लोणच्यासाठी)
- एका किलो हळद किसणे, काप करणे यासाठी 30 रु. मजुरी, लिंबूरस 250 ग्रॅम (एक किलो लिंबातून हा रस मिळतो.) त्याचे 60 रुपये, लाल मिरची, मोहरी डाळ, हिंग, प्रिझर्वेटिव्ह, मीठ यांचे 30 रुपये, तसेच लेबल व लेबलिंग मजुरी पंधरा रुपये असे एकूण खर्च- 135 रुपये. ओली हळद बाहेरून खरेदी केल्यास खर्च 50 रुपये प्रति किलो. लोणच्याची विक्री 200 रुपये किलोप्रमाणे केली जाते. खर्च वजा जाता 15 रुपये निव्वळ नफा विक्रीच्या कौशल्यामुळे जगदाळे यांना मिळतो.
संवादातून समजल्या ग्राहकांच्या अपेक्षा
- जगदाळे प्रथमच प्रक्रिया करून शेतीमालाची विक्री करीत होते. त्यासाठी ग्राहकांशी बोलून हळदीच्या लोणच्याचे महत्त्व पटवून देत होते. ग्राहकांकडूनही हळदीच्या आरोग्य उपयुक्ततेविषयी माहिती मिळत होती. याविषयी मासिके, पुस्तकांतून माहिती संकलित केली. काही पुस्तके विकत आणली. पहिल्या दिवशी लोणचे विकत नेलेल्या ग्राहकांनी पुन्हा फेरी मारल्यावर तर आनंदाला पारावार राहिला नाही. तरीही धान्य महोत्सव संपताना 50 पॅकेट शिल्लक राहिली. त्यावर विचार सुरू केला.
ग्राहकांच्या गरजेनुसार सुधारणा
- ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोणच्यात सुधारणा सुरू केल्या. सुरवातीला हळद किसून लोणचे केले जायचे. त्यात तेल जास्त शोषले जाते. पाकिटात लोणचे कोरडे दिसते. त्याचाही विक्रीवर परिणाम होत असल्याचे जाणवले. लोणचे म्हटले, की डोळ्यांसमोर फोडी न येता तो कीस वाटत होता. लोणचे चमच्याने खाण्याची कल्पनाही लोकांना रुचत नसल्याचे जाणवले. पाकिटावरील लेबलही थोडे गडद रंगाचे होते. आकर्षक असले तरी लोकांवर त्याचा प्रभाव पडत नसल्याचे दिसले. तेलाचा किंचितही डाग लेबलवर असल्यास ग्राहक त्याला नापसंत करत असल्याचेही विक्रीवेळी लक्षात आले.
...अशा केल्या सुधारणा
- पॅकेट 200 ग्रॅमचे व किंमत 40 रुपये हे ग्राहकांना थोडे अधिक वाटले. त्यांच्यासाठी 100 ग्रॅमचे पॅकेट बनवले. मागणीनुसार विविध आकाराची पाकिटे बनविण्यास सुरवात केली.
- ओली हळद किसून लोणचे बनविण्याऐवजी काप करण्याविषयी गावातील सुनंदा वाबळे यांनी सूचना केली. त्या पद्धतीत तेल शोषणही कमी झाले. पॅकेटमध्ये कोरडे न राहता तेलकट राहू लागल्याने लोणच्याची आकर्षकता वाढली.
- काप किंवा चकत्या केल्याने लोणच्याच्या फोडीसारखा परिणाम दिसू लागला.
- फिक्कट रंगाचे, पण आकर्षक नवीन लेबल बनवून घेतले.
जगदाळेंकडे याही गोष्टी बनतात...
- ओल्या हळदीची पेस्ट, ओल्या हळदीची पावडर, दिवाळीसाठी उटणे.
-ओल्या हळदीच्या कापाचा वापर केलेली भजीही परिचितांत मोठ्या चवीने खाल्ली जातात. या भज्यांच्या विक्रीचा कायमस्वरूपी स्टॉल सुरू करण्याची जगदाळेंची इच्छा आहे.
सातत्यपूर्ण कष्टातून वाढवली विक्री
- औंध येथील अभिनव फार्मर्स क्‍लबच्या महोत्सवात 50 किलो ओल्या हळदीचे लोणचे दोन दिवसांतच विकले गेले. ओली हळद एक क्विंटल तर मागील महोत्सवातील शिल्लक 50 पाकिटेही विकली गेली.
- शेवटच्या दिवशी सुमारे 10 किलोच्या ऑर्डर मिळाल्या. त्या पुढे पूर्ण केल्या.
- सातत्याने विविध सरकारी खात्यांच्या कचेरीत जाऊन लोणच्याची विक्री केली. काही चांगल्या ऑर्डर मिळवल्या.
- मुर्टी गावात मंगळवारच्या आठवडी बाजारात लोणच्याची विक्री होते. पुढील टप्प्यात जेजुरी व अन्य बाजारांतही लोणचे ठेवले जाणार आहे.
आगामी नियोजन
- दिवाळीच्या उटण्यासाठी बारामती परिसरातील काही शेतकऱ्यांशी तोंडी करार करून शीतगृहातील ओल्या हळदीचे आताच बुकिंग केले आहे.
- ओली हळद (कच्चा माल) मिळविण्यासाठी पिकाला पाणी देऊनही ती ताजी ठेवण्याचा प्रयत्न आहे.
- 30 जून ते 5जुलै कालावधीत बारामतीत शेतकरी व महिलांच्या बचत गटांच्या स्टॉलमध्ये सहभाग घेतला आहे.
संपर्क - सतीश जगदाळे, 9730360110
-----------------------------------------
लेखक - सतीश कुलकर्णी
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------

आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक



घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. "जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या "फॅमिली'चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या "दास ऑफशोअर' कंपनीत झालाय.
वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत...कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं.....आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते...""सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती. सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील "त्या' पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, "राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.' वडिलांचे शब्द काळजाला भिडले,'' खाडे म्हणाले.
खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, ""रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन "दास ऑफशोअर'ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्‍न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला "दास' नाव दिले. नावसुद्धा "के. अशोक' असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.''
"दास' कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या (http://www.dasgroup.co.in) आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.
वारकरीवृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्‍वरीवर गाढा विश्‍वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीजजवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.
"दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते' हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.
मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. 'माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एकही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता "आबा' म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.''
अशोक खाडेंचा "गुरुमंत्र'
"जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद लक्षात ठेवा.
कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल.
आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.
-आशिष तागडे
ashish.tagade@esakal.com
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------