केवळ चौथी पास असलेल्या मच्छिंद्र नारायणराव कांडनगिरे या तरुणाने ग्रामीण शेती तंत्रज्ञानात घेतलेली झेप थक्क करणारी आहे. गेल्या पंधरा वर्षात सुमारे 750 लोखंडी बैलगाडय़ा बनवून त्याने एक विक्रमच प्रस्थापित केला आहे. त्याची ही यशोगाथा कोणाही बेरोजगारांनी प्रेरणा घ्यावी अशीच आहे.
अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद जवळच धाकटीवाडी हे मच्छिंद्र कांडनगिरेचे गाव. वडील नारायणरावांना थोडीशी कोरडवाहू शेती. त्यामुळे त्यांना मजुरीवर जावे लागे. कुटुंबाची परिस्थिती यथातथाच. त्यांना गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ व जालींदरनाथ ही तीन मुले. मोठा मुलगा गोरखनाथने दहावीनंतर आयटीआयचा फिटरचा कोर्स करून शिरुर ताजबंदला नाथ स्टिल इंडस्ट्रिजची सुरुवात केली. त्यावेळी मधला मच्छिंद्र शाळेत जात होता. त्याला शाळेची आवड होती,मात्र परिस्थितीमुळे गुरंही राखावी लागायची. यामध्ये त्याची ओढाताण सुरु झाली. चवथीची परिक्षा दिल्यानंतर त्याने शाळेला रामराम ठोकला. पूर्ण वेळ तो गुरं राखू लागला. त्याबद्दल त्याला कोणी रागावण्याऐवजी त्याचं कौतुकचं झालं. चार-पाच वर्षे गुरं राखण्याचे हे काम त्याने उत्तम पद्धतीने केले.
दरम्यान, गोरखचा धंद्यात बर्यापैकी जम बसला होता. त्याने सुरू केलेलं लोखंडी बैलगाडय़ाचं उत्पादन लोकप्रिय होत होते. त्याला हाताखाली माणसाची गरज भासत होती. मजुरीवरची माणसं गैरहजर राहिली की, कामाचा खोळंबा व्हायचा. त्यामुळे त्याने मच्छिंद्रला कामासाठी बोलावून घेतले. पुस्तकी ज्ञानात फारशी गती नसलेल्या मच्छिंद्रला तांत्रिक कामात खूपच गती होती. भावाने तयार केलेल्या लोखंडी वस्तूंना रंग देत देत मच्छिंद्र एक एक तांत्रिक काम शिकून घेऊ लागला. चार वर्षे भावाच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर तो सर्व प्रकारची कामे करण्यात निष्णात बनला. भाऊ सगळी कामे करतोय हे लक्षात आल्यानंतर गोरखने दुकानाची जबाबदारी मच्छिंद्रवर सोपविली व स्वतःचा लाईफ इन्शुरन्सचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.एकटय़ाच्या बळावर काम सरू केल्यानंतर मच्छिंद्रने शेतीतील अवजारे अधिक लोकप्रिय केली. मच्छिंद्रला शेतीतील अनुभव होताच, शिवाय विविध शेतकर्यांशी चर्चा करून त्यांच्या सोयीचे काय आहे हे लक्षात घेऊन तो अवजारे बनवू लागला. साहजिकच ही अवजारे शेतकर्यांच्या जास्तीत जास्त पसंतीला उतरू लागली. त्याने बनवलेल्या कोळपी, तिफणी व नांगरांना अधिकाधिक मागणी येऊ लागली.
बैलगाडीमध्येही त्याने व्यवहार्य सुधारणा केल्या. साडे तीनशे ते पावणेचारशे किलो वजनाची मच्छिंद्रने बनविलेली लोखंडी गाडी शेतकर्यांना आवडू लागली. गाडीच्या फळ्या, जू व आकरी फक्त लाकडाची. बाकी सामान लोखंडी. गाडीच्या दांडय़ा काहीजण लोखंडी वापरतात तर काही जण लाकडाच्या. बैलाला गाडीचे अनावश्यक ओझे होऊ नये, गाडी ओढताना त्यांना कष्ट पडू नयेत, हा विचार ही गाडी तयार करताना मच्छिंद्रने अंमलात आणला आहे. सुरुवातीच्या काळात खूपच स्वस्त असलेली ही गाडी आज 25 हजारांच्या आसपास आहे. इतर वस्तुंच्या वाढलेल्या किमती पाहिल्या तर ही किंमत तशी कमीच म्हणावी लागेल. मच्छिंद्र उद्योजक असूनही तो स्वतःला कारागीरच मानतो. त्यामुळे प्रत्येक कामात तो फक्त त्याच्या मजुरीचेच पैसे लावतो. त्यामुळेच नाथ स्टिल इंडस्ट्रिजमधून आजपर्यंत 750 पेक्षा अधिक बैलगाडय़ा विकल्या गेल्या आहेत. आजूबाजुच्या कुठल्याही गावात आपण गेलो तर मच्छिंद्रने बनविलेली बैलगाडी हमखास पहायला मिळते. नांदेडपासून बिदरपर्यंत ही बैलगाडी पोहचली आहे. एकदा बिदरचा लाकूड कटाई मशीन चालविणारा गृहस्थ कारने शिरुरवरून चालला होता. त्याने सडकेच्या कडेला उभी असलेली बैलगाडी पाहून कार थांबवली. बैलगाडीची किंमत विचारून व पैसे देऊन ती त्याने बिदरला लगेच पाठविली. असे अनेक किस्से मच्छिंद्रजवळ आहेत. त्याचा ग्राहक हाच त्याचा जाहीरातदार आहे. त्याचे उत्पादनच ग्राहकांना आकर्षित करते.
गूळ बनविण्यासाठी लागणार्या कलई व त्या उचलण्यासाठीचे जॅक तयार करण्याचे कामही मच्छिंद्रने मोठय़ा प्रमाणात केले आहे. त्यासाठी अनेकदा तो शेतावर जाऊन काम करतो. त्याच्या या तंत्रज्ञानामुळे कलई हाताने उचलण्याचे कष्टाचे काम बंद झाले आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे बनवत असतानाच गेल्या दोन वर्षांपासून लोखंडी दरवाजे, खिडक्या, गेट व ग्रीलची कामेही त्याने सुरू केली. अचूकता हे मच्छिंद्रच्या कामाचे वैशिष्टय़ आहे. त्याच्या कामात शोधूनही दोष सापडत नाहीत. त्यामुळेच शेतकरी मोठय़ा विश्वासाने त्याने बनविलेली अवजारे खरेदी करतात. शेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या सोयीची अवजारे बनवण्याकडे त्याचा कल आहे. तीन फणी,चार फणी, पाच फणी तिफण व जोड कोळपेही मच्छिंद्रने शेतकरीप्रिय केले आहे. बाजारात अनेक स्वयंचलित तिफणी आल्या आहेत. या तिफणीद्वारे बियाणे व खत एकाचवेळी जमिनीत पडते. मात्र या तिफणी सदोष आहेत. यातील काही तिफणींचे फण योग्य प्रकारचे नव्हते. मच्छिंद्रने ते बदलून देऊन काम सोपे केले आहे. शेतकर्यांना हव्या त्या पद्धतीने बियाणे व खतं सोडणारी एक निर्दोष स्वयंचलित तिफण बनविण्याचा मच्छिंद्रचा प्रयत्न सुरू आहे. येत्या पेरणीपूर्वी अशी तिफण तयार होईल याची त्याला खात्री आहे. ही तिफण शेतकर्यांसाठी वरदान ठरेल यात शंका नाही.
एक कारागीर, तंत्रज्ञ म्हणून मच्छिंद्र श्रेष्ठ आहेच. परंतु माणूस म्हणूनही त्याचे तेवढेच मोल आहे. कारागीरांना असणार्या सर्व व्यसनांपासून तो दूर आहे. तंबाखूसारखं `साधं’ म्हणून ओळखलं जाणारं व्यसनही त्याला नाही. शब्दाला तो पक्का आहे. काम केव्हा होईल ते तो सांगतो. वेळ लागणार असेल तर तसे स्पष्टपणे सांगतो. टोलवा-टोलवी, थापेबाजी त्याला मान्य नाही. त्याच्या तोंडात साखर आहे. वागण्यात सभ्यता आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेला माणूस आपोआप जोडला जातो.
मच्छिंद्रच्या या कामाबद्दल त्याचे बंधू गोरखनाथ यांना निश्चितच अभिमान वाटतो. मच्छिंद्र मात्र आपल्या या यशाचे सर्व श्रेय गोरखनाथ यांना देतो. सध्या छोटा भाऊ जालिंदरनाथही मच्छिंद्रच्या मदतीला आहे. तोही चांगला तयार झाला आहे. त्यामुळे त्याच्या कामाची गती अधिक वाढली आहे. शनिवार, रविवार किंवा सण-समारंभाच्या दिवशीही सुट्टी न घेता काम करणारा मच्छिंद्र खर्या अर्थाने ग्रामीण भारताचा `आयडॉल’ म्हणावा लागेल.
चौथीच्या पुढे शिक्षण न घेतल्याबद्दल वाईट वाटते का? असं विचारल्यानंतर हसत हसत मच्छिंद्र म्हणाला, गेल्या दहा-बारा वर्षात माझ्या हातून झालेलं काम पाहिलं तर वाटतं, शिकलो नाही तेच बरं झालं. नोकरी लागली असती का नाही तेही माहीत नाही. लागली असती तर अधिक पैसे मिळाले असते मात्र कामाचं समाधान मिळालं नसतं. असा कष्टाचं महत्त्व सांगणारा मच्छिंद्र आजही आहे हे या देशाचे भाग्यच म्हणावे लागेल.
- महारुद्र मंगनाळे
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611…
------------------------------------------
Source : http://navshakti.co.in/aisee-akshare/39742/
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611…
------------------------------------------
Source : http://navshakti.co.in/aisee-akshare/39742/
------------------------------------------