ऐन दुष्काळात 10 गुंठ्याच्या शेतीत तब्बल लाखाचं उत्पन्न!



बीड : मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने फक्त 10 गुंठ्यात तब्बल एक लाखाचं उत्पन्न घेतलंय. एकूणच मराठवाड्यात सततच्या दुष्काळामुळे पारंपरिक शेतीमधील उत्पादनात घट होत आहे. या आपत्तीवर मात करत आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथील रवींद्र देवरवाडे या तरुण शेतकऱ्याने फक्त १० गुंठ्यातील शेतीमध्ये एक लाख रूपयांच्या सिमला मिरचीचं उत्पादन घेतलंय. कमी पाण्यात येणारं पीक म्हणून रविंद्र देवरवाडेंनी शेडनेटमध्ये ढब्बू मिरचीचा पर्याय निवडला.

10 गुंठ्यात लाखाचं उत्पन्न देणारं शेडनेट
आंबेजोगाईतील रविंद्र देवरवाडे समाजसेवेत पदव्युत्तर शिक्षण (एमएसडब्यू) घेतलंय. शिक्षण झाल्यावर त्यांनी काही अहमदनगरच्या स्नेहालयमध्ये काही महिने नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीला राम राम ठोकून गावी परतले. देवरवाडे २०११ पासून वडिलोपार्जीत शेती कसत आहेत. त्यांना ३० एकर शेती आहे. एकत्र कुटुंब विभक्त झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला सहा एकर शेती आली, सुरवातीला ते आपल्या शेतात पारंपरिक म्हणजे ऊस आणि सोयाबीन अशी पिके घ्यायचे. मात्र पाण्याची कमतरता असल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाची जोड शेतीला देऊन पिक पद्धतीमधे बदल केला.

शेडनेेटमधील फायद्याची शेती
शेडनेट शेतीतील जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेडनेटमधील पिकांचा पर्याय निवडला. 10 गुंठ्यांमध्ये शेडनेटची उभारणी केली. शेडनेटमध्ये सुरवातीला टोमॅटोचं पीक घेतलं. मात्र भाव स्थीर नसल्याने म्हणावा असा फायदा झाला नाही. मात्र त्यामुळे निराश न होता, त्यांनी ढोबळी मिरचीची लागवड करण्याचा पर्याय निवडला.

त्यासाठी त्यांनी सांगलीच्या एका नर्सरीतून तब्बल साडेतीन हजार रोपं आणली. ड्रिप आणि मल्चिंगचाही वापर केला. रोपं, खते, मजुरी असा सर्व एकत्रित खर्च हा 30 हजार रूपयांपर्यंत आल्याचं देवरवाडे सांगतात.

रविंद्र देवरवाडे यांना शेडनेटच्या उभारणीसाठी साडेतीन लाखांचा खर्च आला तर ढोबळीच्या लागवडीसाठी आठ हजारांचा खर्च आला. दिवसभरातील तापमानाचा अंदाज घेऊनच शास्त्रीय पद्धतीने ते मिरचीला पाणी देतात.

बाजारभावाचा अभ्यास करून त्यांनी ढोबळी मिरचीच्या पिकाची निवड केली. आतार्यंत त्यांनी तब्बल सहा टन मिरचीची विक्री स्थानिक बाजारात आणि लातूरला करतात. त्यांच्या मिरचीला सरासरी रूपये १५ ते २० रुपये भाव मिळाला. सहा टनाचे त्यांना जवळपास एक लाख पंधरा हजार रूपये मिळालेत. त्यांना आणि आणखी सात टन उत्पादन निघेल अशी आशा आहे. बाजारभाव फार पडले नाहीत तर त्यांना एक लाख रुपयांचं निवळ उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीसाठी पायपीट करण्याऐवजी शेतीतच काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय योग्य असल्याची खात्री आता सर्व देवरवाडे कुटुंबाला पटलीय.

उच्च शिक्षण घेतलेले ग्रामीण भागातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरात भटकंती करतात. मात्र नोकरीलायक शिक्षण असूनही शेतीतच लाखोंचं उत्पन्न घेता येतं तसंच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुष्काळातही आर्थिक समतोल कसा टिकून राहतो याचं उदहारण रवींद्र देवरवाडे यांनी घालून दिलंय.
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा
https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611862/
------------------------------------------
Source : http://abpmajha.abplive.in/maharashtra/success-story-of-beed-farmer-206080
------------------------------------------