हजारो फोटोग्राफरांना कोट्यावधीचा व्यवसाय देणारे उद्योजक



अलीकडे प्रत्येकजन बालदिन साजरा करतो. फेसबुक आणि व्हॉट्सऍप वर अनेकजण बालदिनी आपल्या लहानपणीचा फोटो पिक्चर प्रोफाईल किंवा डिपी (डिपी म्हणजे डिस्प्ले पिक्चर) म्हणून ठेवतात. फोटोमधली प्रत्येकाची भावमुद्रा पाहण्यासारखी होती. प्रत्येकाच्या डोळ्यांतून आपला फोटो फोटोग्राफर काढतोय याचंच कुतूहल ओसंडून वाहत होतं. ‘फोटोग्राफर’, अलीकडच्या काळातला इतिहासजमा झालेला एक कलाकार. आजकाल याचं अस्तित्व निव्वळ लग्नापुरतं आणि फोटोस्टुडिओपुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. मोबाईल मध्ये कॅमेरा आल्याने आणि त्यामध्ये भर म्हणजे स्मार्ट फोनवाल्यांनी त्यात फोटो एडिट करण्याची सुविधा दिल्याने फोटोग्राफर नावाचा प्राणी जवळपास अस्तंगतच झाला आहे. हातात मावणाऱ्या मोबाईलपुढे २५ हजार ५१६ कोटी रुपयांची उलाढाल असलेली कोडॅक सारखी अवाढव्य कंपनी देखील दिवाळखोरीत निघाली. काही फोटोग्राफर्स आजही आपल्याला गेट वे ऑफ इंडिया किंवा चौपाटीवर दिसतात. पण त्यांची संख्या तशी नगण्यच आहे.
आज फोटोग्राफर्स वर एवढं सारं लिहीण्यामागचं कारण ‘फ्लॅटपेबल’ (http://www.flatpebble.com). या कंपनीने खऱ्या अर्थाने फोटोग्राफर्सना परत लाईमलाईट मध्ये आणलं. फक्त एवढंच नव्हे तर त्यांना रोजगार मिळवून दिला. मलेशियाच्या मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करणाऱ्या प्रणव मेहता आणि वेंकी शेषाद्री या दोन तरुणांना काहीतरी आगळंवेगळं करायचं होतं. आपण नोकरीसाठी नव्हे तर उद्योजकतेसाठीच जन्माला आलोय अशी पक्की खूणगाठ या दोघांनी आपल्या मनाशी बांधली होती. पण उदयोग नेमका कोणता करावा याविषयी यांच्या मनात साशंकता होती. असाच विचार करत असताना या दोघांच्या मनात एक कल्पना आली. आपण या फोटोग्राफर्सना त्यांच्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविलं तर? अजून थोडा अभ्यास केल्यानंतर त्यांना आढळून आलं की बहुतांश फोटोग्राफर्स हे त्यांना मिळालेल्या कामावरच आपला उदरनिर्वाह करतात. आणि यामध्ये देखील जे काम मिळण्याचे मार्ग आहेत ते अगदीच तुटपुंजे आहेत.
प्रणव आणि वेंकी या जोडगोळीने वेळ न दवडता कामाला सुरुवात केली आणि फ्लॅटपेबलचा उदय झाला. गेल्या वर्षाच्या सरत्या महिन्यात म्हणजे २०१३ च्या डिसेंबर मध्ये कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आणि निव्वळ एका वर्षांत १२ कोटी रुपये मूल्यांचा रोजगार आतापर्यंत या कंपनीने दिला. १८१५ पेक्षा अधिक फोटोग्राफर्स फ्लॅटपेबलच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहे. या फोटोग्राफर्सनी थेट केलेली उलाढाल आहे तब्बल १ कोटी ४० लाख रुपये. आज कंपनीचं मुख्य कार्यालय जरी हैदराबाद येथे असलं तरीसुद्धा ४२५ हून अधिक शहरात मात्र फ्लॅटपेबलचं जाळं पसरलेलं आहे. स्थिरचित्रणासोबतच व्हिडीओग्राफी, थेट प्रक्षेपण आदी दृक स्वरुपातील सेवा कंपनी आपल्या ग्राहकांना देते.
लग्न म्हटलं की कुणाचं बजेट १० हजार असतं, कुणाचं ५० हजार तर कुणाचं अगदी १.५ लाख. या प्रत्येक ग्राहकाला आम्ही निराश करत नाही. त्याच्या बजेटमध्ये बसेल असा फोटोग्राफर आम्ही मिळवून देतो. फोटोग्राफरला देखील त्याचा लक्ष्यित ग्राहक मिळतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दर्जाच्या बाबतीत मात्र कुठेच तडजोड केली जात नाही. कधी कधी फोटोग्राफर ऐनवेळी मिळत नाही ही सामान्यांची व्यथा आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. भारतात ढोबळमानाने पाहिल्यास तब्बल ११ हजार ७९६ कोटी रुपयांची लग्नाच्या फोटोग्राफीची एवढी प्रचंड बाजारपेठ आहे. मात्र असंघटीत आणि अव्यवस्थित स्वरुपामुळे ही बाजारपेठ अजूनदेखील दुर्लक्षित आहे. भारतातील ५०० शहरांमध्ये आजमितीस २.५ लाख व्यावसायिक फोटोग्राफर कार्यरत आहेत. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की ही बाजारपेठ काबीज करायला अजून कितीतरी फोटोग्राफर्सची आवश्यकता आहे.
अपयशाला न भिता सतत नवनवीन प्रयोग करत रहाणे आणि त्यातून नवीन गोष्टी शोधून काढणे हे सूत्र आपल्या यशाचं रहस्य आहे असं प्रणव मेहता आणि वेंकी शेषाद्री ही जोडगोळी मानते.
एखादी नवीन आणि जगावेगळी कल्पना तुम्हांला कुठल्या कुठे नेऊन पोहोचविते याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्लॅटपेबल. फ्लॅटपेबलची ही यशोगाथा पाहून भूषण अकोलकर या फोटोग्राफर मित्राची टॅगलाईन आठवली आणि मला खात्री आहे की कॅमेरा पाहिला की तुमच्या देखील ओठांवर ही टॅगलाईन आपसूक येईल. ‘वी कीप युअर मेमरीज अलाईव्ह’.
https://web.facebook.com/flatpebble
---
प्रमोद सावंत
८१०८१०५२३२
https://web.facebook.com/prasawant
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://yuktiudyogachi.blogspot.in/2015/07/blog-post_15.html
------------------------------------------