बुटपॉलिशवाला ते उद्योजक



घरच्या प्रतिकूल परिस्थिती-मुळे वयाच्या आठव्या वर्षी त्याला बूटपॉलिश करून, स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागत होता. हे काम करता करताच तो शिकतही होता. त्याला कोणत्याही श्रमाची-कामाची लाज नव्हती. पण, आपण जगातला मोठा उद्योजक अशी कीर्ती मिळवायची जिद्द होती. निर्धाराने त्याने त्या दिशेने वयाच्या 20 व्या वर्षीच पहिले पाऊल टाकले आणि यशही मिळवले. त्याने काही ख्यातनाम विद्यापीठातून एम. बी. ए. ची पदवी मिळवलेली नाही. व्यवसाय आणि उद्योगात तो यशस्वी झाला, तो स्वत:च्याच व्यवस्थापनाच्या तंत्राची अंमलबजावणी करूनच! 50 वर्षांपूर्वी बूटपॉलिश करणारा हा मुलगा जगातल्या ख्यातनाम "आयमॅक्स' (https://en.wikipedia.org/wiki/IMAX_Corporation ), या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. या यशस्वी उद्योजकाचे नाव रिच गेलफॉंड (Richard Gelfond) !
परिश्रमाच्या बळावर जागतिक कीर्तीचा उद्योजक झालेल्या रिचने जीवनात अनेक उद्योग केले. त्यातही यशही मिळवले. न्यूयॉर्कमध्ये येऊन वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी स्वत:च्या मालकीचे वृत्तपत्रही त्याने सुरू केले होते. त्याचा खपही 25 हजाराच्या आसपास होता. त्यानंतर त्याने आणखी काही व्यवसायही केले. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक आणि संपर्काच्या तंत्रात आमूलाग्र क्रांती झाली. सारे जग जवळ आले आणि त्याला हे क्षेत्र खुणवायला लागले. मोठ्या पडद्यावर सुरेख प्रतिमांचे प्रक्षेपण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पडद्यांची आणि सूक्ष्म कॅमेऱ्याची निर्मिती करणारी आयमॅक्स ही कंपनी त्याने 1994 मध्ये विकत घेतली. ही कंपनी संग्रहालये आणि वैज्ञानिक प्रयोगशाळात मोठ्या पडद्यावर वैज्ञानिक विषयाशी संबंधित असलेले चित्रपट प्रदर्शित करायचा व्यवसाय करीत होती. रिचला या कंपनीचे हे तंत्र जगभर न्यायचे होते. त्याने ब्राईड वेशलर यांच्या सहाय्याने ही कंपनी घेतली आणि आयमॅक्स कंपनीचा चित्रपट व्यवसायाशी संबंध जोडला जावा, यासाठी प्रयत्नही सुरू केले. हॉलिवूडसह जगातल्या चित्रपट गृहात नव्या तंत्राने चित्रपट दाखवण्याची पद्धतच त्याने अंमलात आणेपर्यंत सुरू झाली नव्हती. हॉलिवूडचा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक जॉर्ज लूक्स याच्या समोर त्याने याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यांनाही हे नवे तंत्र लोकांना आवडेल याची खात्री नव्हती. पण त्यांनी रिचचा प्रस्ताव मान्य केला. हॉलिवूडचे चित्रपट आयमॅक्सच्या तंत्राने दाखवायला सुरुवात झाली. रिचने चित्रपटांच्या चित्रीकरणातही नवे तंत्र अंमलात आणायला सुरुवात केली. त्रिमिती (थ्री डायमेन्शन) तंत्राने चित्रपट निर्मिती केल्यास प्रेक्षकांना ते आवडेल, असा विश्वास त्याला होता. वॉरन ब्रदर्सच्या पोलर एक्स्प्रेस या चित्रपटाचे या नव्या तंत्राने त्याने चित्रीकरण करायला लावले. "डिस्नी फॅंटसी', "पोलर एक्स्प्रेस' आणि "अवतार' या तीनही चित्रपटांच्या निर्मितीत रिचचा सहभाग होता. या तीनही चित्रपटांनी त्याला अब्जावधी डॉलर्स मिळवून दिले. आयमॅक्सच्या 150 चित्रपट गृहांची संख्या आता सातशेच्यावर गेली आहे. ही कंपनी आता जागतिक झाली आहे.
- वासूदेव कुलकर्णी
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://dainikaikya.com/20130628/5248542733345831977.htm
------------------------------------------