तीस हजार महिला झाल्या स्वयंसिद्धा

Small idea BIG MONEY's photo.

कोल्हापूर आणि परिसरातील तब्बल तीस हजार महिला आज स्वयंरोजगार, गृहउद्योग, शेती, बचतगट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. स्वतःला हतबल, परावलंबी मानणाऱ्या महिलांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या, त्या क्षमतांना ठिणगी देणाऱ्या कांचनताई परुळेकर आणि त्यांच्या स्वयंसिद्धाhttp://www.swayamsiddhakop.org या संस्थेविषयी.
-----------
पतीच्या अकाली निधनामुळे खचलेल्या बिस्मिल्ला मुजावर आज पर्स, पिशव्या विकून आपला संसार समर्थपणे चालवत आहेत. भिशीचे पैसे बुडाले म्हणून आत्महत्या करायला निघालेल्या अंजना घाडगे आता महिन्याला हजारो रुपयांचे अनारसे विकतात. मुलगी मतिमंद आहे म्हणून हताश झालेल्या आपटेबाई केटरिंगच्या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल करतात.
कोल्हापूरसारख्या परंपरावादी शहरातील हजारो महिलांच्या जीवनाला गेल्या वीस वर्षांपासून एक नवीन मार्ग मिळाला आहे. यात अडल्या- नडल्या गोरगरीब स्त्रिया आहेत, परंपरेच्या चौकटीचा उंबरठा कधीच न ओलांडणाऱ्या गृहिणी आहेत, शाळा सोडून घरी बसलेल्या मुली आहेत आणि निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा या चिंतेत असणाऱ्या प्रौढाही आहेत. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतो, हा विश्‍वास या महिलांना मिळाला आहे तो स्वयंसिद्धा या संस्थेच्या पाठबळामुळे. या क्रांतीमागची प्रेरणा आहेत कांचनताई परुळेकर. "स्वयंसिद्धा'च्या पुढाकाराने तब्बल तीस हजार महिलांच्या कर्तृत्वाला आज नवे धुमारे फुटले आहेत.
कोल्हापुरातील हरिजन सेवक संघाचे कार्यकर्ते बाळकृष्ण परुळेकर हे कांचनताईंचे वडील. सेवाभावी वृत्तीचे बाळकडू कांचनताईंना त्यांच्याकडूनच मिळाले; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वडिलांइतकाच प्रभाव पडला तो ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक व्ही. टी. पाटील यांचा! श्री. पाटील यांनी परंपरावादी कोल्हापूर शहरात स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली होती. बंडखोर; पण विचारी व्यक्तिमत्त्वाच्या कांचनताईंकडे पाटील यांचे लक्ष गेले. पाटील यांना मूलबाळ नव्हते; त्यांनी कांचनताईंनाच आपली मुलगी मानले. पाटील यांचा उदार; पण कणखर स्वभाव, समाजकारणात सक्रिय सहभाग असल्याने त्यांच्या घरी सर्व स्तरांतील लोकांचा राबता असे. त्याचाही प्रभाव कांचनताईंवर पडला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर कांचनताईंनी आधी ताराराणी विद्यापीठात आणि नंतर बॅंक ऑफ इंडियात नोकरी केली; पण हे काही आपले काम नव्हे, याची खोल जाणीव त्यांच्या मनात सतत जागी असायची. बॅंकेतील कामामुळे त्यांचा अनेक महिलांशी संबंध यायचा. पैसा जवळ असेल, तरच बाईला घरातील निर्णयप्रक्रियेत स्थान मिळू शकते, हे त्यांना कळत होते आणि त्यामुळे त्या अस्वस्थ होत होत्या. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे, असे त्यांना मनापासून वाटायचे; पण त्यासाठी काय करायचे हे मात्र स्पष्ट होत नव्हते.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुशिक्षितांच्या रोजगाराच्या संधीही कमी होत असताना ज्यांच्यापाशी पैसा, शिक्षण, अनुभव यापैकी काहीच नाही अशा महिलांना रोजगार मिळवून द्यायला हवा, त्यांना उद्योजक बनवायला हवे आणि त्यातून पुढे आणखी रोजगारनिर्मितीही व्हायला हवी, असे त्यांच्या डोक्‍यात घोळत होते. त्यांचे मानसपिता व्ही. टी. पाटील यांचे स्त्रीसक्षमीकरणाचे कामच त्यामुळे आणखी एक पाऊल पुढे जाईल, असे कांचनताईंना वाटत होते.
नोकरीचा राजीनामा दिल्यावर त्यांनी बाजारपेठेचा, विविध उद्योगांशी संबंधित संस्थांचा आणि त्यांच्या प्रशिक्षणकामाचा अभ्यास केला. तो अभ्यास पूर्ण झाल्यावर 1992च्या एप्रिल महिन्यात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली ः "ज्या महिलांना फावल्या वेळात काही काम करायचे आहे, त्यांनी येऊन भेटावे.''
या जाहिरातीला 136 महिलांनी प्रतिसाद दिला. तसेच, कोल्हापुरात छोटे उद्योग करणाऱ्या काही महिलांशीही कांचनताईंनी संपर्क साधला आणि या सर्वजणींचा एक मेळावा घेण्यात आला. बॅंक ऑफ इंडिया आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या महिलांना मार्गदर्शन केले. हा पहिलाच अनुभव या महिलांना खूप उत्साह देणारा ठरला. त्यांना काहीतरी करायचे होते आणि त्यासाठी कांचनताईंनी त्यांना एक हक्काचे व्यासपीठ दिले होते, "स्वयंसिद्धा'च्या रूपाने!
या महिलांपाशी अंगभूत असलेल्या कौशल्यांना पुढे आणण्यापासून "स्वयंसिद्धा'ची वाटचाल सुरू झाली. ज्या महिला काही उत्पादने करत होत्या त्यांची विक्री कशी होईल, यासाठी कांचनताईंनी प्रयत्न सुरू केले. ओळखीच्या लोकांच्या घरांमधून अशा वस्तूंचे स्टॉल्स लावण्यापासून या कामाची सुरवात झाली. मग एखाद्या समारंभाच्या ठिकाणी, तर कधी दिवाळीसारख्या उत्सवांच्या निमित्ताने विक्रीच्या नव्या जागा शोधण्यात येऊ लागल्या. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत गेला आणि "स्वयंसिद्धा'चे नाव व काम वाढू लागले. "महिलांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देणारी संस्था' अशी तिची ओळख झाली. काहीतरी करू पाहणाऱ्या महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून "स्वयंसिद्धा'ने आपले वेगळे अस्तित्व तयार केले; पण केवळ तिथवर मर्यादित न राहता महिलांची माणूस म्हणून समृद्ध वाढ होण्यासाठी, त्यांनी जगण्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, यासाठीही ही चळवळ नकळत काम करते आहे.
प्रशिक्षण संस्था म्हणून "स्वयंसिद्धा'चे कामही व्यापक आहे. उत्पादन तयार करण्यापासून ते विकण्यासाठीचे प्रशिक्षण महिलांना येथे देण्यात येते. दर बुधवारी संस्थेच्या आवारात या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचा बाजार भरवला जातो. घरगुती समारंभ, छोटे-मोठे मेळावे, प्रदर्शने यात विक्रीचा अनुभव गाठीस बांधलेल्या या महिला आज दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी जाऊनही विविध प्रदर्शनांत आपल्या उत्पादनांची आत्मविश्‍वासाने विक्री करत आहेत; पण कांचनताईंनी या महिलांना केवळ उद्योजक बनणे आणि काही पैसे कमावणे एवढ्यापुरते मर्यादित ठेवले नाही. एक व्यक्ती म्हणून व व्यावसायिक म्हणूनही त्यांची जडणघडण व्हावी, यासाठीही त्यांनी विशेष लक्ष पुरवले आहे. यातूनच या महिलांनी चांगले लिहावे म्हणून "स्वानंद सखी फीचर्स' ही लेखन कार्यसंस्था त्यांनी सुरू केली. त्यांना चारचौघांत चांगले बोलता यावे यासाठी "वाणीमुक्ती प्रकल्प'ही त्यांनी सुरू केला आहे. याशिवाय, दहावी नापास मुलींसाठी "स्वयंसिद्धा स्कूल', कायदेशीर सल्ला देण्यासाठी "सांगते विचारा', भाजी विकणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी "आरोग्यम्‌ धनसंपदा प्रकल्प', शालेय मुलींना लैंगिक शिक्षण देण्यासाठी "कळी उमलताना' आणि मुलांसाठी "वसंत फुलताना' असे प्रकल्प संस्थेतर्फे चालवण्यात येतात. ""महिलांनी फक्त आपल्यापुरता विचार न करता माझी गल्ली, माझे गाव, माझे राज्य, माझा देश इथपर्यंत विचार केला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकीने आपले काही तरी योगदान द्यायला हवे, तरच स्त्रीसक्षमीकरणाला खरा अर्थ येईल,'' असे कांचनताई मानतात.
कांचनताईंनी आपल्या कामाची व्याप्ती केवळ कोल्हापूर शहरापुरती मर्यादित न ठेवता राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी अशा तालुक्‍यांपर्यंत वाढवली. या गावांमध्ये फिरताना त्यांना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे बचत गटांची हलाखीची स्थिती. इथे असे गट मोठ्या प्रमाणात होते; पण त्यातून म्हणावे असे काही तयार होत नव्हते. नेमके काय करायचे या विवंचनेत असलेल्या या गटांना कांचनताईंनी योग्य मार्गदर्शन केले. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या बचत गटांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान देण्यास सुरवात झाली. ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक शेतीची किचकट भाषा समजणार नाही, याची कल्पना आल्यावर त्यांनी त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवायला सुरवात केली. एकदा तिला हे तंत्र समजले, की ती इतरांनाही शिकवते. बचत गटांच्या सभांमध्ये बोलणे जास्त आणि काम कमी होत असल्याने अशा सभांमध्ये नेमके काय करायचे याचा एक आराखडाच त्यांनी ठरवून टाकला. बचत गटाने केवळ आपल्यापुरते पाहायचे नाही, तर आपल्या परिसराचा, गावाचा विचार करायचा, आरोग्य- शिक्षण- स्वच्छता यावरही लक्ष ठेवायचे, याची जाणीव त्यांनी या महिलांना करून दिली. त्यामुळे एकीकडे उद्योग व शेतीच्या माध्यमातून बचत गटांची प्रगती होत असतानाच गावातही अनेक सुधारणा घडत होत्या. राधानगरी तालुक्‍यातील मल्लेवाडी येथील लक्ष्मी बचत गट हे अशा बचत गटांचे एक यशस्वी रोल मॉडेल मानता येईल. शेतीच्या, उद्योगाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मल्लेवाडीच्या महिलांनी केवळ आपल्या घराचाच नव्हे, तर गावाचाही चेहरामोहरा बदलून टाकला आहे. एवढेच नाही, तर पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये आता आधुनिक तंत्राची शेती करण्यात येत आहे.
बॅंका, शासकीय, निमशासकीय अशा सर्व स्तरांवरील संस्था, कांचनताईंना बचत गट, तसेच सामाजिक संस्थांमधील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलावतात. तेही फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर छत्तीसगड, त्रिपुरा अशा राज्यांमध्येही. "स्वयंसिद्धा'च्या ऐंशी प्रशिक्षण केंद्रांमधून आज विविध व्यवसायांचे आणि कार्मिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातच तीन हजाराच्या जवळपास महिला उद्योजिका यातून प्रशिक्षण घेऊन तयार झाल्या आहेत.
चर्चेत गुंतून पडण्यापेक्षा व्यवहार्य तोडगे काढण्यासाठी महिलांना उद्युक्त करण्यावर कांचनताई भर देतात. काय झाले पाहिजे, यापेक्षा हे असे करता येते, असे प्रात्यक्षिकासह उदाहरण ते त्यांच्याकडे येणाऱ्या महिलांसमोर ठेवतात. त्यांच्याकडे येणाऱ्या महिला परिस्थितीने गांजून निराश झालेल्या असल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे, हे कांचनताईंसमोरचे पहिले आव्हान असते. प्रश्‍नांमध्ये अडकून राहण्यापेक्षा उत्तरांकडे चला, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळेच केवळ महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यापुरते "स्वयंसिद्धा'चे काम मर्यादित नाही; तर जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलणे, समृद्ध जगण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, ही खरी या कामामागची ओढ आहे. "स्वयंसिद्धा'मधून आत्मविश्‍वास घेऊन बाहेर पडलेली बाई केवळ स्वतःचा विचार न करता इतर महिलांना सोबत घेऊन जाण्याचा विचार करते, यापेक्षा एखाद्या कामाचे वेगळे यश ते काय असू शकते?
-प्रिया आमोद
(युनिक फीचर्स)
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक कराhttps://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://www.saptahiksakal.com/…/2011…/5403336738838122233.html
------------------------------------------